'भाजी आणणे' हा सर्वात बिकट प्रश्न होऊन राहिला आहे आमच्यापुढे आज ! कोणतीही महिला उठते व पुरुषवर्गाने आणलेल्या भाजीवर सडकून टीका करते. त्यामुळे टीका करावयाचा एकही विषय त्यानी शिल्लक ठेवला असेलसे वाटत नाही.
महिला वर्गाचे वैशिष्ट्य हेच बनले आहे की, भाजी शिजवता न का येईना नीट, परंतु पुरुषांनी चांगलीच भाजी मंडईतून आणली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो ! स्वत: मंडईतून भाजी आणणे तर दूरच राहिले, परंतु आणून दिलेली भाजीही मुकाट्याने गिळून टाकली जात नाही. वास्तविक भाजी निवडण्याचे कामही पुरुषांचे नाही, परंतु महिलांनीच 'भाजी आणणे' हा पुरुषांचा 'साईड बिजिनेस' बनवला आहे.त्यामुळे सायंकाळी हपीसातून येता येता किंवा सकाळी धोब्याच्या दुकानातून चक्कर टाकून वाटेतल्या मंडईतून भाजी आणण्याचे दिव्य पुरुषांनाच करावे लागते !
'अमकीच्या नवऱ्याला साधी तमकी भाजीही आणता येत नाही-' असा शेरा मारूनही वनिताविश्वात एकमेकींच्या नवऱ्याचा मोठेपणा आजमावला जातो ! ह्या गृहिणींचा खचितच असा समज झालेला असावा, नवऱ्याला हपिसात पगार मिळतो तो भाजी उत्तम आणण्याबद्दलच !
मंडईत जाऊन भाजी आणणे व तीही अगदी उत्तम, ताजी, स्वच्छ अशी ; हे खर म्हणजे ज्या पतीराजाला जमते, त्याची 'आदर्श पतिराज' म्हणून संभावना करण्यास काहीच हरकत नाही ! जो गृहिणीच्या सल्ल्याबरहुकूम भाजी आणून हजर करतो, तोच घरसंसार उत्तम चालवतो, असे खुश्शाल समजावे. अस्मादिकांना मात्र या जन्मी हे भाजी आणण्याचे कार्य कुशलतेने पार पाडता येत नाही, हे सांगण्यास आम्हाला फार खेद होतो.
पुष्कळदा वाटते की, 'कुटुंबा'ने सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी हवी असलेली भाजी आणून 'कुटुंबा'स चकित करावं ! पण होत काय की, मी मोठ्या अशा प्रचंड मंडईजवळ जाताच, दक्षिणा उपटणाऱ्या बडव्याप्रमाणे समस्त भाजीवाले चढाओढीने ओरडू लागतात. सगळेचजण आपली भाजी 'फस्कलास''बेष्टपैकी' असल्याची ग्वाही देऊ लागतात. माझ्या दोन कानावर सतराशेएकसष्ट भाज्यांची नावे, रटाळ वक्त्याच्या अंगावर कोसळणाऱ्या नासक्या अंडी-टोमाटोप्रमाणेच आदळू लागतात. या गोंधळातच मी घरी आणावयास सांगितलेल्या भाज्यांची नावे विसरतो. शेवटी 'ही घेऊ का ती घेऊ'च्या गडबडीत मी छान-छान फुले आलेली मेथीचीच भाजी पसंत करतो !
पण घरी या भाजीचे चांगले स्वागत व्हावयाचे नावच नको ! 'फुलं आलेली भाजी कोथिंबीर कध्धी आणू नका, म्हणून हज्जारदा सांगत्ये ! पण टाळकं कधी ठिकाणावर येणार देव जाणे !' हे स्वगत भाषण कानावर जोराने आदळते. मंडईत भाजीवाले व घरात आमचे 'कुटुंब' यांचा आरडा ओरडा ऐकण्याखेरीज माझ्या कानात दुसरे काही शिरत नाहीच ! उगीच नाही अभिमन्यू भाजीमार्केत सोडून चक्रव्यूहात पळाला ! 'स्त्रियांना फुलांची आवड असते' असे सांगणाऱ्या महाभागाच्याच शोधात आहे मी !
मार्केटात भाज्यांवर लेबले असतील तर शपथ ! आम्ही आणलेली मार्केटातील अंबाडीची भाजी कधी पालकाची भाजी बनते घरी येताच, तर पालकाची म्हणून आणलेली नेमकी चुक्याची पेंढीच निघते. तीच गत गवार, मुळे, मूग, घेवडा यांच्या शेंगांची ! अहो मी तर एकदा कमालच केली (-असे 'कुटुंब' वदति ). मला 'कोणत्याही शेंगा' भाजीसाठी आणायला सांगितल्या. मी मंडईत गेलो व सरळ एक किलो 'भुईमुगाच्या शेंगा' घरी आणल्या. यात माझ कुठ चुकल ? पण त्या दिवशी 'कुटुंबा'न आकाशपाताळ एक केलं पहा !
फ्लॉवर, नवलकोल, कोबी या भाज्यांच्या बाबतीतही नेहमीच बोंब ! यासाठी प्रत्येक भाजीवाल्याने आपल्या भाजीवर लेबल लावावेच, असा यूनोने ठराव पास केला पाहिजे ! प्रत्येक भाजी आढी शिजवूनच मग शिळी किंवा ताजी आहे ते तपासून विकण्यास मंडईत ठेवावी. कारण विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण मी मंडईतून आणलेली पाणीदार वांगी शिळीच निघतात. भेंड्या किडक्या असतात. मुळ्यात अळ्या शिरतात व कारली कडूच बनतात !
असे होऊ नये म्हणून मी पूर्वी त्या त्या भाजीतील 'स्पेशालिष्ट' मित्रास बरोबर नेत असे. परंतु प्रत्येक वेळी मित्रास भजी खाऊ घालणे खिशास परवडेना ! (त्या काळात 'आघाडी'वर तात्पुरती शांतता राखण्यात मी यशस्वी ठरलो होतो!) मग तोही नाद सोडून दिला.
साध्या कोथिंबिरीच्या बाबतीत माझी नेहमीच रड असते ! पुष्कळजण रुपयाची भाजी घेऊन भांडून दोन पैशाची कोथिंबीर फुकट उपटतात ! पण मी जेव्हा अठ्ठ्याण्णव पैशांची भाजी घेऊन कोथिंबिरीची फुकट मागणी करतो, तेव्हा त्या गडबडीत नेमके राहिलेले दोन पैसे मागण्यास विसरतोच!
हल्ली मी भाजी आणतही नसतो व खातही नसतो . याबद्दल 'कुटुंबां'ने शेजारच्या दोन मावश्यांकडे तक्रारअर्ज नेला. पण तो बहुमताने केराच्या टोपलीत टाकला गेला. कारण दोन्ही मावश्यांचे उत्तर असे आले- "अहो, आमचे 'हे' देखील भाजी आणतच नाहीत, मग ती खाणे तर दूरच राहिले!" (सगळे 'हे' झिंदाबाद !)
सकाळी-सायंकाळी काही व्यक्ती मंडईतून जेव्हा मजेत हसतखेळत हातातील हरतऱ्हेच्या भाज्यांच्या पिशव्या घेऊन चाललेल्या दिसतात, त्यावेळी त्या आदर्श पतीराजांकडे पाहून मी मनात मनोभावे नमस्कार करीत असतो ! त्या व्यक्तीना 'भाजी आणण्या'चे जे बाळकडू मिळालेले असते, त्याचा मला हेवा वाटू लागतो.
एवढे मात्र निश्चित की भाजी आणणे मला जमले नाही, यात माझा काहीच दोष नाही . भाजी आणणे ही एक कलाच आहे (-बहुधा पासष्टावी !). शाळेत फक्त "भाजी कसली खावी व का खावी ?", याचेच ज्ञान प्राप्त होते. मग भाजी आणण्याचे शिक्षण केव्हा कुणाला मिळणार ? श्वेतपत्रिकेत देखील कुणी "भाजी कशी आणावी ?" या विषयाकडे लक्ष दिलेले दिसत नाही.
भाजीबद्दल मी एकाच बजावून ठेवतो-
" सातासमुद्रापलीकडे जाऊन गुलबकावलीचे फूल आणावयास मला एकवेळ जमेल, पण सात पावलांवरील मंडईतून कोबीचे फूल चांगले बघून आणणे काही आपल्याला जमणार नाही बुवा ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा