एक आस उरली देवा - - -


सांग विठूराया मला तू रे पावणार कधी 
दु:ख यातना ह्या माझ्या साऱ्या संपणार कधी ..

आळवावे किती किती तुला स्मरावे मी किती 
दिवसरात्र ना पाहता तुला भजावे मी किती ..

उभा निवांत तू तेथे विटेवरती त्या समोरी 
दरसाली ना चुकते ती दुखऱ्या पायी माझी वारी ..

वाटे माझ्या रे मनाला नित्य भेटावे मी तुला 
पाहिल्याविना रे तुला चैन पडत नाही मला ..

जळी स्थळी पाषाणी मी तुला काष्ठीही पाहतो 
जमते तेव्हा मनातून तुला पूजत मी राहतो ..

थांबू किती काळ आता तुझ्या दर्शनासाठी मी 
प्रपंचाचे ओझे आणखी वाहू किती या पाठी मी ..

मुखी "विठ्ठल" "विठ्ठल" स्मरणी नेहमी गुंगतो 
प्रपंचात राहूनही कसा नामात दंगतो ..

एक आस उरली देवा, पंढरीत मी त्या यावे 
मूर्ती तुझी पाहताना डोळे सुखाने मिटावे ..
.

बंद करावे कविता करणे - - - ! -- [गझल]

मात्रावृत्त 
मात्रा- १६+१४ 
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
का मी आता लिहावी गझल सांगत कोणी बसेल का 
प्रयत्न माझा ती लिहिण्याचा पहिलावहिला रुचेल का ..

मतला मिसरा वृत्त काफिया नाही मज माहित काही 
गणमात्रा त्या मोजु कशा मी सहज मोजणे जमेल का ..

चारोळ्या अन दोनोळ्याही पातेलेभर लिहिल्या मी 
चमचाभर ती गझल पाडणे सोपे मजला असेल का ..

कितीतरी मी आजवरी हो प्रबंध निबंध मस्त खरडले 
ना चालवली लगावली मी झरणी माझी रुसेल का ..

रसिक दिसे का कुणी जाणता गझलेचाही खराखुरा 
बंद करावे कविता करणे छान कुणाला पटेल का ..
.

चार चारोळ्या -

पांघरून दुलई संपत्तीची 
निद्रानाशाची चिंता श्रीमंताला -
अंगावर वाकळ दारिद्र्याची 
ना कसली खंत गरिबाला ..
.

वर्षाव ऐकुन स्तुतीसुमनांचा
आत्माही त्याचा विस्मित जाहला -
एक शब्दही त्यास चांगला 
जिवंत असता कुणी न बोलला ..
.

गझल मैफिलीत तू सखे, 
नटूनथटून कशाला येतेस -
"गझल आणि तू"- एकाच वेळी 
मनाची तगमग किती करतेस ..
.

स्वत:ला ठेच लागली रे 
लागली की काहीजणांना-
नीट चालायचा उपदेश करायचा 
उत्साह येतो इतरांना !
.

जगण्यात रोज मरतो- [गझल]

वृत्त - विनोद 
लगावली - गागाल गालगागा 
मात्रा - 12
-------------------------------------------
जगण्यात रोज मरतो 
मरण्यास खास जगतो..

साधून संधि मीही 
मनसोक्त येथ चरतो ..

उत्कर्ष का कुणाचा 
पाहून आत जळतो ..

खड्ड्यात तोहि पडता 
का मी हळूच हसतो..

अपघात दूर दिसता 
मागे खुशाल पळतो..
.

गंमत मनुष्यस्वभावाची . .

इतरांची स्तुती करण्यात मी
आघाडीवर राहिलो तर,
लोक मला "खुषमस्कऱ्या"म्हणून
संबोधतात - 

इतरांची स्तुती करण्यात मी 
मागे राहिलो तर,
हेच लोक मला "मत्सरग्रस्त" 
म्हणण्यात आघाडीवर असतात !


इतरांशी वितंडवाद भांडण टाळून मी 
गोडीगुलाबीने मिसळलो 
तर "गळेपडू" म्हणतात -

इतरांपासून जेवढयास तेवढे संबंध मी 
जोडत राहिलो तर 
"आखडू" समजतात !

मग माणसाने वागावे तरी कसे हो ?
.