जाहला, तो वेडा बेजार.. ! [विडंबन]

[ चाल- विठ्ठला, तू वेडा कुंभार ..]

अपुल्या नवऱ्यावर तू करसी टीकेचा भडिमार 
जाहला, तो वेडा बेजार.. !

भांडीकुंडी, कचरा सारा, तोच आवरतो सर्व पसारा
आरामच मग मिळे तुज खरा 
तुझ्या कॉटवरच्या मांडीला, असे तोच आधार .. !

तुझे भांडणे खूप आगळे, भांडण्यातले भाव वेगळे 
तुझ्या मुखीचे शब्द ना कळे 
मनास तुझिया मिळते शांती, तया मनी अंगार .. !

तूच बोलसी, तूच गप्पसी, कुरवाळसी तू, तूच ढकलसी 
न कळे,, भांडुन काय साधसी  
देसी पाकिट परी काढसी तयातलेच हजार .. ! 
.

गर्वाचे घर .. (बालकविता)

एक होता सुंदर कावळा
एक होता सुरेख बगळा

होता पांढराशुभ्र कावळा 
होता काळाकुट्ट बगळा

गर्व झाला दोघांना रंगाचा
आपल्या छान छान पंखांचा

आकाशात घेत होते गिरक्या
एकमेकांच्या घेत घेत फिरक्या

बोलता बोलता धडकले पटकन 
जमिनीवरती आदळले झटकन 

कावळा पडला डांबरी खड्ड्यात
पडला बगळा चुन्याच्या घाण्यात

दोघे एकमेकांना पाहू लागले
बघता बघता हसू लागले

झाला पांढराशुभ्र बगळा 
काळाकुट्ट झाला कावळा

दिसताच आपले रंग बदलले
गर्वाचे घर खाली झाले.. !
.

तीन चारोळ्या

१.
सैरभैर अती 
अंगणी चिमण्या 
दाण्यास टिपण्या 
आतुरती..
.

२.
निसर्ग कोपला 
हिमवर्षावात 
चहाच्या कपात 
बुडालो हो ..
.

३.
जिकडे तिकडे 
धुक्यात पहाट 
लोकरीचा थाट 
वर्णू किती ..
.

आज शांतता घरात ती न येथ स्वामिनी... (विडंबन)

[चाल:  तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी --]

आज शांतता घरात ती न येथ स्वामिनी
ना शांती जोडप्यात बेबनावही मनी ....

ती असताही तयास खंत रोज भांडणे 
दोघांनी अनुसरले मौनातच दंगणे
तो मनात कुंठतोच तीहि खंगते मनी ....

दोघे घरि राहताच शांति राहते कुठे     
तो न मागे, ती न मागे, वाद घालती इथे   
दोन प्रेमी या घरात, प्रेम ना करी कुणी ....

त्या पहिल्या भेटीच्या खास आठवू खुणा
वाटते मनात त्यास कंठ दाटतो पुन्हा
प्रीत का न ये जुळून भांडत्या घरातुनी ....
.

तिच्याच काढत आठवणी हरवत जातो-- [गझल]

तिच्याच काढत आठवणी हरवत जातो 
डोळे बसल्याबसल्या मी भिजवत जातो..
.
गर्दी असता दोघेही होतो भांडत  
एकांतात मनाची मी जिरवत जातो..
.
डाव रंगतो चुरशीचा दोघांमधला  
आनंदी तिजला बघण्या फसवत जातो..
.
वाट तिची बघता बघता मी हुरहुरतो 
मनातल्या खेळात मला लपवत जातो..
.
जोडी तुझी नि माझी ही युगायुगांची  
ताठ मान माझी करुनी मिरवत जातो..
.

देवालयात ना मी श्रीमंत देव भजतो--- [गझल]

वृत्त- आनंदकंद  , मात्रा- २४ 
लगावली-  गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- अ ,  गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------------
देवालयात ना मी श्रीमंत देव भजतो     
मी झोपडीतल्या त्या गरिबांत रोज रमतो.. 
.
पोटात एक त्यांच्या ओठात अन्य काही 
गोटात मी शिरूनी त्यांच्यातलाच बनतो..
.
हाती गुलाब माझ्या हसतो जरा जरा मी 
काटाच मत्सरी तो बोटात खास घुसतो..
.
दिसता समोर तो जर तोरा हिचा किती हो 
पूर्वेस तोंड करते तो पश्चिमेस असतो..
.
मन मात्र त्याच वेळी चपलांस शोधते का 
जोडून हात जेव्हा मी देवळात बसतो..
.

गर्दीत चालताना कोठेतरी हरवतो... [गझल]

वृत्त- आनंदकंद ,   अलामत- अ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा-  २४  ,   गैरमुरद्दफ 
--------------------------------------------------
गर्दीत चालताना कोठेतरी हरवतो 
एकांत पाहुनीया मजलाच मी गवसतो ..
.
विश्वास ठेवतो मी नात्यातलेच सारे 
गोत्यात आणल्यावर डोळ्यांस मी उघडतो..
.
धरतीस आस भारी पाऊस पाहण्याची 
महिमा कलीयुगाचा दुष्काळ तो बहरतो..
.
बाहेर पाहतो मी खिडकीतुनी मनाच्या 
हमखास नेहमी का तव चेहरा मिरवतो..
.
झाले विणून धागे प्रीतीत आज सारे 
बहुमोल वस्त्र हाती घेऊन मी विहरतो ..
.

कौतुकाचे दिवस होते पंगतीचे -- [गझल]

वृत्त- मंजुघोषा ,  अलामत-  ई 
लगावली-  गालगागा गालगागा गालगागा 
मात्रा-  २१  ,   गैरमुरद्दफ 
----------------------------------------------
कौतुकाचे दिवस होते पंगतीचे  
आज कौतुक वाटते पण भाकरीचे..
.
चेहरा तो ठेवतो हसरा जरासा 
दु:ख ना तो जाणवू देतो उरीचे..
.
चालली कुजबूज काही चांदण्यांची 
पाहिले सौंदर्य का माझ्या सखीचे..
.
खूप झाला अनुभवाने तो शहाणा 
ना फुकट तो शब्दही दवडे मुखीचे..
.
हासरे दिसतात काही चेहरेही 
छान आले का नशीबी दिन सुगीचे..
.

विचारी न कोणी कुणाला कधीही- - [गझल]

वृत्त-  भुजंगप्रयात,    मात्रा- २० 
लगावली- लगागा लगागा लगागा लगागा 
अलामत-  ई ,  गैरमुरद्दफ 
--------------------------------------------
विचारी न कोणी कुणाला कधीही 
क्षणी स्वार्थ साधून पळतो कुणीही..
.
न कोणास भीती नसे लाज कोणा 
थिटे वस्त्र अंगी शरम ना मनीही..
.
दया मानवाला कशी येत नाही 
दमे भीक मागून भिक्षेकरीही.. 
.
सुगंधी असावा जरा जास्त गजरा  
मला पाहता खूष होते सखीही..
.
फुटे गर्व करता फुगा हो भ्रमाचा 
कळाले तरी का न वळते तरीही..
.

दु:खी उन्हात सारे - [गझल]

वृत्त- आनंदकंद ,    मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- अ ,   गैरमुरद्दफ 
------------------------------------------------------
दु:खी उन्हात सारे आयुष्य पोळलेले 
का सावली सुखाची मजला न लाभलेले..
.
गंगेत नाहले ते पुण्यास साठवाया 
दानास हात मागे पैशास सोकलेले..
.
देणे नसे न घेणे नेत्यास काय त्याचे 
पाहूनिया कलेवर झाडास टांगलेले..
.
हसती म्हणून सारे हसणार ना मुळी मी 
सारे कधी न जगले आयुष्य त्रासलेले..
.
संस्कार होउनीही बनतोच कोडगा तो 
जणु भांग रोपटे ते तुळशीत उगवलेले..
.

डोळे

डोळे नसते तर काही दिसले नसते 
कुणीही कधीही कुणाला पहिले नसते !
एकमेकाबद्दल कायम आकर्षण राहिले असते ..
पण कुकर्म घडले नसते !

डोळे नसते तर माझे तुझे झाले नसते 
सगळे आपलेच वाटले असते !
हेवेदावे द्वेष दिसले नसते 
चांगले वाईट कळले नसते 
सर्व सुखात रमले असते !

डोळेअसते तर जे काही वाईट घडते 
ते बघत बसावे लागले असते ! 
लाज शरम यांना आपलेसे 
करावे वाटले असते !
माय बहिणीची लक्तरे 
टांगलेली बघावी लागली असती !

असे हताश हतबल जगण्यापेक्षा 
आंधळे झालेलेही बघवले असते !
.

["ज्ञानामृत" ई - दिवाळी अंक २०१८]

चार चारोळ्या

माणसे नकोत घरोघरी आता 
पाहिजे फेसबुक व्हाटसअप हाती 
कुठेही कसेही एकटेच बसायचे  
विसरून भान माणुसकी नाती ..
.

माझ्याजवळी तू बसता 
रुसतो का प्राजक्त इकडे 
हलवत आपल्या फांदीला 
घालतो सडा फुलांचा तिकडे..
.

मी शांतीचा आहे भोक्ता
तो होता सुटला सांगत
ना ठेवला विश्वास ज्याने 
का त्याच्याशी बसला भांडत ..
.

नकोस देवा रे सुख देऊ 
कधीच तू मला आयुष्यात 
घेऊ चव मी कधी सुखाची 
गुरफटलो इतका दु:खात..
.

[साहित्यमंथन /ई  दिवाळी अंक २०१८ / इंद्रधनू ]

अरे संसार संसार -

भांडण होईल त्या दोघात 
वाटलेही नव्हते स्वप्नात ..

नवरोजीला संताप आला 
अंगाचा तिळपापड झाला ..

कधी नव्हे ते झाले भांडण 
नवरा आदळी भांडी दणादण ..

रागारागाने भांडी घासली 
बघता बघता चमकू लागली ..

बायको खूष ती भांडी बघून 
चमक पाहून ती गेली हुरळून ..

खुशीतच ठेऊन आली पटकन 
धुण्याचे पिळे त्यासमोर चटकन .. !
.

["कायस्थ युगन्धर"... दिवाळी अंक २०१८]

चार चारोळ्या

चंद्र खिडकीतून एकवार रात्री
झळकत गेला तुझ्या गालावर -
सगळा माझा वेळ रात्री 
जळफळण्यात गेला तुझ्यावर !
.

हृदयात तुझ्या धडधड 
होत आहे जोपर्यंत -
जिवंत मी असण्याची 
खात्री आहे तोपर्यंत ..
.

जगा निर्लोभी निस्वार्थी 
आहे सोपे उपदेश करणे-
असते मन चंचल किती 
कठीण तयाला आवरणे..
.

पाहिजे तेव्हा नव्हता पाऊस
नकोच तेव्हा आला पाऊस -
अचानक बोलून गेलो सखीस 
'तुजसम ग शेफारला पाऊस ! ' ..
.

परका माझा ना तो कळतो-- [गझल]

मात्रावृत्त-  पादाकुलक , मात्रा-  १६ 
अलामत- अ ,  यती - ८व्या मात्रेवर 
----------------------------------------
परका माझा का ना कळतो 
सरड्यासम तो रंग बदलतो..
.
फिरे भामटा उजळत माथा 
साव बिचारा अंग चोरतो..
.
सहजच विकले जाते खोटे 
सत्याला का वेळ लागतो.. 
.
संस्काराला पूर्ण काळिमा 
बाप नराधम मुलीस धरतो..
.
हतबल का तो देव मंदिरी 
जागृत असुनी डोळे मिटतो.. 
.

सुधाकरी

अवघे शहाणे 
जमताच सारे 
उलटे का वारे 
वाहतसे..
.

माणसाची जात 
निमकहरामी 
पळपुटी नामी 
होता काम..
.

येरा गबाळ्याचे 
नाही येथे काम 
सदैव आराम 
भोगतो मी..
.

वेडे जगी सारे 
फक्त तो शहाणा 
म्हणोनी ठणाणा 
करीतसे..
.

एकखांबी तंबू 
दोघांचा संसार 
अर्धांगी आधार 
विस्मित तो..

काय करावे - !

तुझ्यावर शेर लिहिला तर 
चारोळीसारखी फुलून येतेस ..

तुझ्यावर चारोळी लिहिली तर
गझलेसारखी खुलून दिसतेस ..

तुझ्यावर गझल लिहिली तर
लावणीसारखी ठुमकत येतेस ..

तुझ्यावर लावणी लिहिली तर
कवितेसारखी उधळत जातेस ..

काही लिहू नये म्हटले तर
शब्दांसारखीच रुसत बसतेस . . !
.

[मराठी कल्चर एांि फे क्स्टवल्स- दिवाळी अंक २०१७ ]

सोडवतो पण प्रीतीची का गाठ सुटेना.. [गझल]

मात्रावृत्त-  लवंगलता,   मात्रा - ८+८+८+४ 
रदीफ- आता ,  अलामत-  ए 
-------------------------------------------------
सोडवतो पण प्रीतीची का गाठ सुटेना आता 
आठवणींचा गुंता मजला का उकलेना आता ..

कर्जापायी फास बांधला आहे गळ्यात त्याच्या 
आयुष्याचे जळणे त्याला हे बघवेना आता ..

सुखास मागत शिणला माझा देह जरी हा देवा    
नामजपाचा पण कंटाळा का वाटेना आता ..

तो दुसऱ्यांचे दोष ऐकता खूष किती पण दिसला  
ढोल स्तुतीचा जरी बडवला का ऐकेना आता ..

सोडावा तव खुळा नाद जर ठरवताच मी सखये 
जाशी जिकडे, पाउल माझे.. का थांबेना आता ..
.

गुणगान

ऐकत जा तू गाणे माझे 
आनंदी असतो मी जेव्हा 
आळस चिंता गुंडाळून 
ठेवत असतो मी तेव्हा..

वाटत असते सफर करावी 
क्षणात एका विश्वाची 
चालू असते मनात माझ्या 
तयारी शोधण्या अश्वाची..

असेल रपेट अश्वावर ती 
मजेत निसर्गात फिरायची 
प्राणी पक्षी तलाव झाडे 
दोस्ती सर्वांशी करायची..

तोडातोडी झाडांची अन 
फोडाफोडी ती डोंगरांची 
बंद करावी करत आवाहन 
जपणूक निसर्ग साधनांची..

जर वनराणी हो आनंदी
श्वासोच्छवास सुखाचा छान 
फुलवित मोर पिसारा सुंदर 
करील सृष्टीचे गुणगान..
.

कागदाची नाव माझी छान पाणी वाहणारे -- [गझल]

वृत्त-  व्योमगंगा ,  मात्रा - २८ 
लगावली- गालगागा X ४
अलामत- अ ,   गैरमुरद्दफ 
--------------------------------------------------
कागदाची नाव माझी छान पाणी वाहणारे 
बाल्य सारे त्यात माझे पाहतो मी डोलणारे..
.
गाल माझे लाल होती का तुझ्या रे आठवाने  
पाहतो तो आरसाही कौतुकाने भावणारे..
.
तू जिथे तेथेच मीही घोर नाही काळजाला  
ना दुरावा जीवनी या अस्त्र नाही छेदणारे..
.
रात्र होता फक्त स्वप्नी का मला भेटून जाशी   
रात्र संपे खिन्न होई ध्यान माझे रंगणारे..
.
खूष होती दंग सारे दोष माझे ऐकताना 
ढोल माझ्या कौतुकाचा ना कुणी ते ऐकणारे..
.
काल होतो, आज आहे,काय सांगू .. मी उद्याचे ?
आज नाते जोडले मी वास्तवाशी जागणारे ! 
.
मी न जातो सांगण्याला वेदना माझी कधीही   
ऐकवाया तेच येती दु:ख सारे भोगणारे ..
.

घरोघरचे व्हाटसप

ताई ग ताई 
गणित सोडवतेस ? 
थांब..
सोडवते,
आधी 
व्हाटसपवर रेसिपी पाहू दे !

बाबा ओ बाबा 
बुटाची लेस बांधता ?
थांब..
बांधतो,
आधी 
व्हाटसपवर स्टेटस टाकू दे !

दादा रे दादा 
बोलिंग करतोस का ?
थांब..
करतो,
आधी 
व्हाटसपवर मेसेज चाळू दे !

जाऊबाई जाऊबाई 
शॉपिंगला जाऊया का ?
थांब..
जाऊया, 
आधी 
व्हाटसपवर सासुबाईला कळवते !

सुनबाई सुनबाई 
झाडून काढतेस ?
थांबा..
काढते,
आधी 
रांगोळीचे फोटो डाऊनलोड करते !

सासूबाई सासूबाई 
पोळ्या किती करू ?
थांब..
सांगते,
आधी 
व्हाटसपचे व्हिडीओ बघू दे !

आई ग आई 
जेवायला वाढतेस ?
चल बाळा चल
व्हाटसप 
नंतर बघते ..
आधी मी तुला जेवायला वाढते !! 
.

माझेही अभियान

दिवाणखान्यातून मी ओरडलो-
"अग ए, सकाळी "दहा वाजून दहा मिनिटां"नी तर 
मी हे टेबल किती स्वच्छ करून ठेवल होत . 
इतकी धूळ आता बारा वाजता आली कुठून ?"

बायको तरातरा स्वैपाकघरातून बाहेर येऊन म्हणाली-
" पहिली गोष्ट म्हणजे अजिबात ओरडायची आवश्यकता नाही.
हे आपले घर आहे. आवाज करून- 
मनासारखे वाट्टेल ते करून घ्यायला, 
हे काही "सभागृह" नाही, ! 
दुसरी गोष्ट म्हणजे, स्वच्छता आपली आपणच करून ठेवायची.. 
दिसली धूळ,घाण,कचरा .. की पुन्हा पुन्हा आपणच तो दूर करायचा.
शिकलात की नाही काही 
तुमच्या त्या "स्वच्छता अभियाना"तून ? "

बायकोचा असे प्रथमच विरोधी सुरातले 
ताणलेले शाब्दिक "धनुष्यबाण" पाहून,
मी मुकाट्याने माझे ओठांचे "कमळ" मिटून,
पुन्हा "हाता"त फडके घेऊन..
पायाचे "इंजिन" चालू करत 
"हत्ती"सारखा डुलत डुलत- 
अस्वच्छता शोधायला निघालो !
.

लाडूस फोडताना नाकी नऊच आले --- [हझल]

लाडूस फोडताना नाकी नऊच आले 
गेले प्रयत्न वाया घामात चिंब न्हाले..
.
बत्तीस दात होते लाडूस पाहताना  
लाडूस फोडताना काही मुखी उडाले ..
.
चकल्या नि लाडवांना थाटात पाहिले पण 
बत्ता पहार सारे शोधात दंग झाले..
.
खाण्यात दंगले जे दातात भंगले ते
तोंडात दात दुखरे डॉक्टरकडे पळाले..
.
नव्हते सणात पाणी.. लाडू धरून हाती  
कार्यालयात काचा- ते फोडण्या निघाले..

.
.
जमले कुठून सारे खादाड खास होते 
लाडूस पाहुनीया निम्मे कुठे गळाले..
.

धाकधूक

लोळावे म्हणतो 
दु:खाच्या मऊमऊ 
प्रचंड मोठ्ठ्याशा 
धपधप गादीवर.. !

तोंडावर ओढावी 
सुखाची इवलीशी 
जुनी फाटकीशी 
पण मायेची चादर - !

अवघड वाटते हो 
थंडीच्या दिवसात-
होत नाही धाडस
ओढायला तोंडावर ..!

मनात असते 
धाकधूक फाटण्याची.. 
उबदार मायेची ती 
उरलेलीही चादर .. !
.

दान म्हणा वा भीक तिला- [गझल]

वृत्त- अनलज्वाला , मात्रावृत्त 
मात्रा- ८+८+८ ,  अलामत- अ 
-------------------------------------------------
म्हणा दान वा भीक तिला पण इलाज नव्हता 
मी न पाहिले मानापमान खळगी भरता..
.
लाट उसळुनी धावत सुटली वेगाने ती 
दूर सरकला कसा किनारा भीति वाढता ..
.
मौनातूनच बोलत राहिन सदा सर्वदा 
सखये बडबड करत रहा तू  उठता बसता..
.
वाढत गेली दरी किती ती नात्यामधली 
दमडी माझ्या खिशात नाही हे जाणवता..
.
साऱ्या जगात चालू असती प्रेमप्रकरणे 
गोंधळ पण हा किती आपल्या मिठीस बघता..
.

["साहित्य-लोभस"- दिवाळी अंक  २०१८ ]

महागाई---महागाई ---

                                             
कौतुक सोन्या-चांदीचे 
गगनी भाव जरी भिडले 
गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी       
दागदागिने बहु घडले !  

थेटरातला चालू आहे 
उघडा काळाबाजार 
पहिला खेळच पहायचा  
जडला आहे आजार ! 

चार चाकी दोन चाकी 
वाहने उच्चांकात नवी        
भाव वाढते पेट्रोलचे 
नको सायकल चैन हवी !
   
ग्यास रेशन कपडालत्ता 
गरजा सोडुन भलतिकडे     
कर्जामधुनी खर्च वाढतो     
धूमधडाका चोहिकडे ! 

रेस क्रिकेट मैदानावर  
रसिक शौकिनांची गर्दी  
भरले खिसे खाली होती      
खंत ना करी कुणी दर्दी !

पोलिसचौकी समोर आहे 
जुगारअड्डे दारूगुत्ते 
व्यसनी डोलत फेकती पैसा 
खाते पुरते हतबल ते !

रंक रंगीले राव नशीले
मजेत मधला वर्ग आहे   
महागाई.. महागाई..   
आरडाओरड चालू आहे !  
.

[इ साहित्य दरबार..दीपोत्सव २०१८]

का मज नाही आता ती वळूनही पाहत हल्ली - [गझल]

का मज नाही आता ती वळूनही पाहत हल्ली
होतो वळणाआड जरी हळूच मी चालत हल्ली..

असता खुर्ची मानाची नियमित होता भेटत तो
जाता खुर्ची जातो तो समोरुनी टाळत हल्ली..

येता जाता का सांगू उगाच मी दु:खे कोणा
फिरतो आहे हसत हसत मनात ती लपवत हल्ली..

चंद्रासम मी पुनवेच्या दिसे तुला दुर्मिळ आता
येती लाटा नयनातुन उगाच का वाहत हल्ली..

ठरल्यावेळी दोघांची ग भेट ती बागेमध्ये
नसता आपण का जाते ग बाग ती वाळत हल्ली..
.

["पुणे प्रतिष्ठान"- दिवाळी अंक २०१८]

विदूषक

हास्यमुखवटा 
ठेवला काढून 
खास त्याने 
जेव्हा 
आपल्या चेहऱ्यावरचा ...

भाव वेदनेचा
घेतला जाणून 
आरशाने 
तेव्हा 

झाकलेल्या चेहऱ्यावरचा !
.
 ["कुसुमाकर"---दिवाळी अंक २०१८]    

मुखवटा

पुसून आरशास त्या, 
मी पुसून राहतो ,
"नित्य हासरा कसा, 
मी स्वत:स पाहतो ?"
                           
आरसा हळूच हसे
बघुनिया मला पुन्हा,  
प्रश्नांकित चेहरा 
पाहुनिया माझा पुन्हा -


"आहेस एक विदूषक 
रडशी मनातून तू ,
हसविण्यास या जगा 
लपवशी दु:ख तू !

रहस्य सांगतो तुला, 
नीट ऐक रे जरा- 
चेहऱ्यावरचा मुखवटा  
काढुनिया बघ जरा !"
.

[ Marathi Culture and Festivals- दिवाळी डिजिटल अंक २०१८]

शपथ मला तू घालायची-- [गझल]

मात्रावृत्त- मुरजयी   ,  मात्रा- ८+७ 
अलामत- आ 
---------------------------------------
शपथ मला तू घालायची 
सदैव ती मी मोडायची..
.
समजूतदार व्हायचे मी 
त्राग्याने तू वागायची .. 
.
उत्सुक आहे मी समजून 
गुपिते कानी सांगायची ..
.
रुसवाफुगवा कायम तुझा 
समजुत मग मी काढायची ..
.
घरात गोंधळ ग सगळ्यांचा 
संधी अचूक साधायची ..
.
भांडणतंटा रोजचा पण 
काडी न कधी मोडायची ..
.

करतो विचार कोणी--- [गझल]

वृत्त-  आनंदकंद ,   मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- आ  ,   गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------
करतो विचार कोणी व्याकूळल्या जिवाचा  
दगडास बघुन कोणी अभिषेकही दुधाचा ..
.
स्वप्नात रोज भिजतो घेऊन मी सखीला 
का वास्तवात नसतो पत्ताच पावसाचा ..
.
लढतो जवान तिकडे जातीस विसरुनीया 
नेत्यात चुरस इकडे हा कोण तो कुणाचा ..
.
नाभीत कस्तुरी पण जाणीव ना तयाला 
शोधात जीव होई हैराण का मृगाचा ..
.
ही जीत तर सख्याची हर्षात नाचते ती 
मुद्दाम हारते ती मग डावही सख्याचा ..
.

["चपराक"- दिवाळी विशेषांक २०१८]

चार चारोळ्या

 रोज रोज तोच आरसा 
रोज तोच बघणे चेहरा -
टाकला बदलून आरसा 
अशक्य बदलणे चेहरा..
.

"अरे वा, छान" म्हणणारा 
खुषमस्कऱ्या पदोपदी दिसतो -
वाईटाला वाईट म्हणणारा 
खरा मित्र एखादाच असतो !
.

नभांगणीच्या चांदण्यांना त्याने
पाठवले आहे ढगाआड -
गृहांगणीच्या माझ्या चांदणीला 
पाहतोय मत्सरी चंद्र लबाड ..
.

वारा तिकडे वाहत आहे
सखे, मीही तिकडे येत आहे -
तुझी चाहूल त्याला आधी 
त्याची सवय माहित आहे ..
.

["कलाविष्कार" e दिवाळी अंक- नोव्हेंबर - २०१८ ]

ती हसल्यावर मीही हसतो- - - [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक ,  मात्रा-  ८+८ 
अलामत- अ , गैरमुरद्दफ 
------------------------------------------
ती हसल्यावर मीही हसतो 
उशिरा कळते तिथेच फसतो ..
.
नभ दुष्काळी वेडी आशा 
पडीक असुनी जमीन कसतो ..
.
मृगजळ दिसता धावत सुटतो 
खिन्न होत मी मुकाट बसतो ..
.
राजकारणी जेथे तेथे 
बोलू खोटे विचार डसतो ..
.
विसरू जाती करुया एकी 
म्हणता कोणी समोर नसतो ..
.

तीन हायकू

१.
आनंदी सण
घातक प्रदूषण
काय करावे ..!
.

२.
किती भावली
आनंदी दीपावली
जग खुषीत ..!
.

३.
आनंद न्यारे
कुठे दुष्काळी वारे
कुणाला पर्वा ..!
.

" कागदाची नाव डोले --" गझल

कागदाची नाव डोले बघ सखे आनंदुनी
डोलते जणु बालपणची अठवण हृदयातुनी
.
सवय इतकी बडबडीला ऐकण्याची जाहली
कान माझे त्रासती का मौन हे तव ऐकुनी
.
बे दुणे चारात कळले दु:ख दुप्पट नेहमी
जीवनाचे पाठ झाले फार पाढे घोकुनी
.
सजवण्याची का तरूला लहर आली पावसा
पान बघुनी छान मोती हळुच गेला ठेवुनी
.
ना कधी संवाद घडला मिटरमध्ये आपला
जीवनी काही न अडले खास गझलेवाचुनी..
.

["नेटभारी... ई दिवाळी अंक २०१७ "- पान ३६] 

चार चारोळ्या

१.
'लहरी -'

आले पावसाच्या मना
तेथे कोणाचे चालेना -
भिजवी चिंब रानावना 
ढुंकून पाहिना माळराना ..
.

२.
'असाही पाऊस -'

आमचा गाव दुष्काळग्रस्त
आम्ही गावकरी सारे त्रस्त -
मंत्र्यांचा ताफा गावात आला
आश्वासनांचा पाऊस पाडून गेला ..
.

३.
'निसर्ग कृपा-'

गेली पाने फुले बहरूनी 
जलथेंबांच्या सर मोत्यांनी -
वाटे निसर्ग वाटत सुटला 
दागदागिने दहा दिशांनी ..
.

४.
'खेळ -'

लपंडाव सुखदु:खाचा 
असतो चालू आयुष्यात - 
खेळ हा ऊनपावसाचा 
दिसतो जणू निसर्गात !
.

[" रानगंध... ई दिवाळी अंक २०१५ "]

वाट फुलांची चालत हसतो- [गझल]

वाट फुलांची चालत हसलो 
काट्यांमधुनी का मी रमलो..
.
बोलुन गेला साखर तोंडी 
होतो ज्ञानी तरिही फसलो..
.
उज्ज्वल संधी ध्येयासाठी 
स्वप्ने बघतच दिवसा दमलो..
.
होत्या छानच कविता माझ्या 
टीका ऐकत मी ना थकलो..
.
आळस माझा पक्का साथी 
सोबत त्याच्या मीही बसलो..
.

जे जे मनात माझ्या- [गझल]

जे जे मनात माझ्या ते ते तुलाहि वाटे 
जुळण्यास संधि आहे फोडू नकोस फाटे

आहेस चांदणी तू मी चंद्र ना जरी तो 
मी काजवा ग जेव्हा अंधार फार दाटे

फुलता गुलाब गाली नजरा तुझ्यासभोती 
ना गप्प राहता मी टोचेन शब्दकाटे

लाजाळु एक तूही निवडुंग मी असा हा 
दोघात साम्य आहे एकांत छान वाटे

सौदा कधी न होतो प्रेमात प्रेमिकांचा 
निर्व्याज प्रेम पाही ना फायदे न घाटे ..
.

[ ज्ञानामृत.. ई दिवाळी अंक- २०१५ ]

आजोबा

आजोबा माझे किती तरूण 
सांगतात वय आपले शेपाऊण

चालताना हातात काठी असते 
तरीपण मान ताठ किती दिसते !

आताही खेळले ते कुस्ती जर 
समोरचा होईल सपाट भुईवर

दोन स्वत:चे, दोन चष्म्याचे 
आजोबा माझे चार डोळ्यांचे

कधी चष्मा डोक्यावर ठेवतात 
कधी कधी गळ्यात अडकवतात

नंतर सगळ्यांना शोधायला लावतात 
स्वत:ही नेहमी बेजार होतात !

आजोबा फिरायला जातात जेव्हा 
आजीला बरोबर नेतात तेव्हा

दोघांची जोडी बोलते छान 
लुटुलुटू हलते दोघांची मान !

आजोबांचे कित्ती भारी जाकीट 
गोळ्याचॉकलेटने भरते पाकीट

आजोबा कधीकधी फिरायला नेतात 
बाहेर मलाच विसरून येतात !
.

बोलायला कधीही - [गझल]

वृत्त-  आनंदकंद ,     मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- अ ,   गैरमुरद्दफ 
---------------------------------------------------
बोलायला कधीही कोणी तयार नसती
आणून अश्रु अंती खोटे कितीक रडती..
.
कपड्यात फाटक्या तो ठरतो कुणी "भिकारी" 
फाडून जीन्स फिरतो "मॉडेल" त्यास म्हणती..
.
दोषांवरून ओढत का पांघरूण अपुल्या
शोधात मग दुजांच्या बिनघोर तेच फिरती..
.
का सांगतो व्यथा मी कवितेमधून माझी 
अपुल्याच येथ सारे दु:खात मग्न असती..
.
ढापून शेत सगळे घेऊन अंगठेही   
समजून चोर इतरा फिरतो खुशाल जगती..
.

कोजागरीचा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र... आनंदाचे क्षण 
मसाला दूध... प्रसन्न वातावरण

साक्षात लक्ष्मीची पूजा...
पुजेचे ताट.. शेजारी पाट.. बसायचा थाट

बायकोची धावपळ... नटूनथटून पळापळ --

देवघरातून बाहेर चंद्राची पूजा झाली - 
पातेल्यातला चंद्र पहायची वेळ आली....

बायको हसत म्हणाली- "अहो--- तो बघा,
पूर्ण चंद्र दिसला... कित्ती छान आहे नै !"

आनंदी प्रसन्न बायको-

मीही तिच्या सुरात सूर मिसळून उत्तरलो-
[तिच्याकडेच पहात-]

"खरच, आजचा चंद्र अगदी छानच,
आणि किती वेगळा दिसतोय.. मलाही ! "

बायको तिच्या नादात...
नभातल्या चंद्राकडे ....पाहत होती -

मी माझ्या नादात...
माझ्या जवळच्या.... चंद्राकडे बघत होतो .. !!
.

हायकू

१. स्वच्छ आकाश लख्ख चंद्र प्रकाश मन मोहित .. . २. कर्दनकाळ पसरला दुष्काळ बळी हताश .. . ३. पाऊस गाणी पण काही ठिकाणी उजाड शेते .. .

किती चांदणे छान बहरते .. [गझल]

मात्रावृत्त - अनलज्वाला ,  मात्रा- ८+८+८ 
अलामत- अ,  रदीफ- तू 
---------------------------------------------
किती चांदणे छान बहरते हसल्यावर तू 
रणरणते मग ऊनच उरते रुसल्यावर तू ..
.
लख्ख किती ती चमकधमक पण कुंदकळ्यांची   
वेधुन घेशी लक्षहि माझे असल्यावर तू ..
.
कधी कधी तू लवकर चिडशी लवकर निघशी 
बघत रहावे मला वाटते बसल्यावर तू ..
.
चेष्टा थोडी केल्यावर ती मुळी नावडे     
धमाल येते फुरंगटूनी नसल्यावर तू ..
.
खेळत असता तू एखादा डाव हारता
गोरीमोरी होशी पत्ते पिसल्यावर तू ..
.

झाला सराव इतका दु:खासही तमाचा -- [गझल]

वृत्त- आनंदकंद ,   मात्रा-  २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा  
अलामत- आ ,  गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------
झाला सराव इतका दु:खासही तमाचा 
वाटे प्रकाश आता अडसर मला सुखाचा..

लढतो जवान तिकडे जातीस विसरुनीया

नेत्यात चुरस इकडे हा कोण तो कुणाचा ..

तृष्णा कुण्या जिवाला प्राणावरीहि बेते

निर्जीव पत्थरावर अभिषेक हो दुधाचा ..

नाभीत कस्तुरी पण जाणीव ना तयाला

शोधात जीव होई हैराण त्या मृगाचा ..

स्वप्नात रोज भिजतो घेऊन मी सखीला

अन वास्तवात बघतो पत्ता न पावसाचा ..
..
[ ई साहित्य दरबार http://esahityadarbar.in च्या 
"दीपोत्सव २०१७" दिवाळी अंक]

भावनेला वाव नाही -- [गझल]

वृत्त- व्योमगंगा ,   मात्रा- २८ 
लगावली-  गालगागा  X  ४ 
रदीफ - आहे ,   अलामत- आ 
-----------------------------------------------------
भावनेला वाव नाही रोकडा शेजार आहे
माज पैशाचा इथे रे कोरडा आधार आहे..
.
कौतुकाला मौन आहे जीभ निंदेला पुढे ती  
खास काही माणसांचा बेरकी आजार आहे..
.
पाडुनीया चेहऱ्याला जोडतो माझ्या करांना   
वाटतो मी, फक्त त्याला "हा किती लाचार आहे"..
.
गुंतलेले दु:ख माझ्या जीवनी या पाहतो मी 
वाटते आता सुखाला भेटणे बेकार आहे..
.
खूप झालो मी शहाणा सारख्या खाऊन ठेचा 
पारखूनी सर्व नाती यापुढे घेणार आहे..
.