नशीब


सकाळी सकाळी चहा पीत असतांना,
बायकोशी वादविवाद - भांडण - धुसफुस - कुरकूर याचं पर्यावसान,
शेवटी कप विधुर होण्यात-

 किंवा 
बशी विधवा होण्यात नक्कीच होत असते !

एखादं कारण अगदी क्षुल्लक असतं -
'आज स्वैपाक कुणी करायचा ?'
किंवा -
' आज भांडी कुणी घासायची ? '

संसारातील यश/अपयश यांचा मागोवा घेत गेलो की,
एकदम डोक्यात प्रकाश पडतो -
अरेच्चा ! हे त्यावेळी कसं ध्यानात नाही आलं ?

लग्नाच्या वेळी भटजीबुवा मंगलाष्टकानंतर,
हिच्याकडे बघून म्हणाले होते-
"शुभ मंगल .."

पण माझ्याकडे बघून म्हणाले होते --
" सा व धा न ! "

त्यावेळी भटजीबुवाचं नीट ऐकले असते तर.....
आता माझी वेळ निघून गेली आहे .

उपवर/उपवधू मित्र - मैत्रिणीनो ,
समझदारको इषारा काफी है ना ?

माझ्या अनुभवावरून धडा घेतला तर ठीक...
नाही तर ,
तुम्ही आणि तुमचं नशीब !

. . .

चार चारोळ्या -

सखे, सागरतीरी दूर 
स्वप्नामधले बांधू घरटे -
लाटेमुळे कोसळले तर
स्वप्नामधेच सांधू घरटे ..
.

समोर त्या पावसासारखीच
अचानक येऊन निघून जातेस -
आठवणींचे थेंब मात्र उगाच 
मनांत ठिबकवत रहातेस !
.

वाचली वेदना तिने 
डोळ्यातली माझ्या - 
सांगितले मला अश्रूने 
डोळ्यातून तिच्या ..
.

देवाघरचा अजब न्याय 
गरिबाला जो दूर सारतो -
सोनेनाणे बहाल होता
दर्शनास तो सत्वर पावतो ..
.

सारे काही सासूसाठी -


एक ह्या दिशेने,
तर दुसरा त्या दिशेने -
महिला मोर्चा येतांना दिसला.

शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेला मी विचारले -
" काय हो, कसले मोर्चे आहेत हे ?
आणि, त्या तिकडच्या सर्व महिलांच्या हातात,
लाटणी कशासाठी दिसताहेत ? "

वेड्यासारखा काय विचारतोय हा बाबा, अशा नजरेने माझ्याकडे पहात,
ती महिला उद्गारली,
" तिकडून येतांना दिसतोय,
तो लाटणेवाला मोर्चा आहे ना तो,
" मला सासू हवी- " असे म्हणणाऱ्या,
त्या पोरीला बदडायला निघालेला आहे ."

मी साहजिकच पृच्छा केली -
" आणि तो दुसरा बिनलाटणेवाला ? "

ती उत्साहाने उत्तरली -
सासू हवी असे म्हणणाऱ्या त्या पोरीच्या मागे मागे,
" आमची सासू घेऊन जा - " असे म्हणणारा,
तो दुसरा मोर्चा आहे ! "
 

...

सगळच मुसळ केरात !


इकडे पाहिले. तिकडे पाहिले.
सगळीकडे शोधून पाहिले.
सकाळी सकाळी ताज्यातवान्या मूडमधे लिहिलेल्या कवितांचे कागद.......

 काहीकेल्या सापडेनात !

अशावेळी,

 जिच्यावर हक्काने राग काढायचा,
ती प्रियतमा तर स्वैपाकघरात गुंतलेली.
न राहवून, 

शक्य तेवढ्या नरमाईच्या स्वरात मी दिवाणखान्यातून ओरडलो,
"अग, माझे कविता लिहिलेले कागद सापडत नाहीत इथे.
... तू नीट ठेवलेस का ते कुठे ? का मोलकरणीने टाकले सगळे केरात ? "

बायको शक्य तेवढ्या वरच्या पट्टीत गरजली,
" वेंधळ्यासारखे ठेवता एकीकडे आणि शोधता भलतीकडे !
नीट शोधा, 

ठेवले असतील स्वत:च इथे कुठेतरी, नेहमीप्रमाणे !
आणि हो...........,
मोलकरीण काही तुमच्यासारखी शिकलीसवरलेली नाहीय-
तिला कवितेतलं काही कळत असतं ना,
तर मात्र ..........

तिने नक्कीच टाकले असते तुमच्या कवितांचे कागद केरात..! "
.

" || श्री गुरुदेव दत्त || "


  


 " || श्री गुरुदेव दत्त || "


त्रिमुखी सुंदर मूर्ती साजिरी
डोळ्यापुढे येई नित्य गोजिरी |

शंख चक्र घेऊनी दो बाहूवरी
त्रिशूल कमंडलू धरी दो करी |

डमरू पद्म पहा शोभती करी
डोळे भरून मूर्ती पहावी तरी |

श्वानरूपी वेद ना अहंकारी
गोमाता सहवास करी भूवरी |

पुरुष नाना गुरूंचे अवतारी
हिंडती संन्यासी ते दिगंतरी |

महिमा गुरूंचा वर्णू किती मी
शब्द संपत्ती अपुरी नेहमी |

सप्रेम नमन शीतल मूर्तीला
मनांत भाव नित्य जपण्याला ||
...

दोन चारोळ्या -

नशीब -

दोन थेंब पावसाचे पडले 
खेळ बघा नशिबाचे घडले -
बने एक मोती पानावर
दुसरा पडे तो चिखलावर ! "
.

नाती -

डेरेदार वृक्षासारखी
नाती होती आधीची-
आता बोन्सायसारखी 
उरली आहेत शोभेची ..
.

दोन चारोळ्या...

डोळे मिटले की
समोर दिसतेस -
डोळे उघडले की
कुठे ग लपतेस ..
............................

दाखवण्यास जातो मी
माझ्या दु:खाची राई -
त्याच्या दु:खाचा पर्वत
करतो दाखवण्याची घाई ..
.

आ बैल मुझे मार...


बायकोने कधी नव्हे ते,
उत्साहाने मला विचारले-
" अहो, मला तुमचा तो संगणक शिकवता का ? "

तिच्याकडे एक नजर,
हेटाळणीपूर्वकच टाकून,
मी जरा जोरात म्हणालो-
" अग, संगणक शिकणे....
 हे येरागबाळ्याचे काम नाही !
संगणक शिकायला किनई....
डोक असाव लागतं बर का-, डोक ! "

तशी हजरजबाबी बायको,
आपले मोठाले डोळे आणखीनच विस्फारून उद्गारली -
" अग्गोबाई, हो का ?
मग तुम्ही तो कसा काय शिकलात बर ? "
 
.

अ न्न पू र्णा


घरी अचानक आलेल्या दहा बारा पाहुण्यांचा स्वैपाक -
तिने एकटीने, 

काहीही कसलीही कुरकुर न करता,
तितक्याच घाईघाईने,
पण मन लावून केला !

तिचे ते मोकळे मन, तिच्या स्वैपाकातही पुरेपूर उतरले होतेच.

पोटावर हात फिरवत-

लांबलचक ढेकर देत -
तृप्त मनाने पाहुणे वाटेला लागले !
( त्यांना आपल्या स्वत:च्या घरी ,
असे आणि इतके रुचकर स्वादिष्ट जेवण बहुधा,
गेल्या कित्येक वर्षात सेवन करायला मिळाले नसावेही.... कदाचित !)

पाहुणे गेले आणि तिने आपल्या नवऱ्याला विचारले -
" बरा झाला होता ना हो आज स्वैपाक ? "

बस्स ....!
त्याने तिच्याकडे डोळे भरून पाहिले आणि ...
जन्माचे सार्थक झाल्याची पावती,
 तिला त्याच्या नजरेत मिळाली ..
त्यालाही आनंदाश्रू आवरले नाहीत,
त्याला न विचारता ते गालावरून फिरू लागले !
.

परतफेड


काल सकाळी आरशात बघून, 
बायको आपले लांबसडक केस विंचरत होती.
मीही जरा जास्तच कौतुक केले तिच्या त्या केशसंभाराचे !

दुपारी बायकोने मस्तपैकी स्वैपाक केला होता.
जेवताना कधी नव्हे तो नेमका- 

भाजीत लांब केस निघाला !

मी बायकोला म्हणालो -
" अग, मी सकाळी कौतुक केलं,
म्हणून लगेच दुपारी, 

चवीसाठी भाजीत केस घालायची,
 काही आवश्यकता होती का ? "
.

महिला आणि शांतता


बायकोच्या महिलामंडळात,
'जागतिक शांतता' या विषयावर माझे भाषण ठेवले होते.
भाषणाचा संबंध थेट शांततेशी असल्याने,
बायको आलीच नव्हती !
श्रोत्यात आठ ते ऐंशी वर्षांच्या महिला आलेल्या दिसल्या.
त्यातही प्रामुख्याने 'सालंकृत आणि स-मेकप तरुणीवर्ग' खच्चून भरलेला !
 

माझ्या आधीच्या वक्त्याचे भाषण, समस्त महिलांच्या त्रस्त गोंगाटात कसेबसे पार पडले.

मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच,

महिलामंडळाला आवाहन केले-

" माझे भाषण चालू असतांना,
"फक्त वयस्कर महिलांनाच" बडबड करण्यास,
माझी फुल्ल परवानगी आहे ! "

सांगायला अतिशय आनंद वाटत आहे-------
समस्त महिलांनी अत्यंत शांतपणे माझे भाषण ऐकले !
.

सवय आणि सेवानिवृत्ती


 सेवानिवृत्तीच्या तिसऱ्या दिवशी....  
दुपारी एक-दोनची वेळ !
 

बायकोने आतून आवाज दिला,
" अहो, ऐकल का ? "

बाहेरून मी उद्गारलो,
" ओरडू नकोस ! 

झोपलो नाही, जागाच आहे मी ! "

... स्वैपाकघरातून दिवाणखान्यात येत,
बायको डोळे विस्फारून माझ्याकडे पहात उद्गारली-
" अग्गो बाई, आश्चर्यच आहे ! 

जागेच आहात का तुम्ही ?  
मला तर वाटलं-
 आता दुपारी शांतपणे  ढाराढूर झोपला असाल, 

तुम्ही घरीच बसून ! "

सुस्कारा टाकत, मी म्हणालो,
" अग, परवा सेवानिवृत्त झाल्यापासूनच तर.....
माझी " दहा ते सहा "

 ह्या वेळेतच केव्हातरी झोपायची सवय 
पूर्ण मोडावी लागणार !
काय करावे समजतच नाही ! "
.

दे धक्का


पाहुण्यांना फाटकापर्यंत पोचवून,

 मी घरांत पाऊल टाकताच,
मधाळ स्वरात बायको म्हणाली-

" खूप खूप आभारी आहे हं ! "
 

मी विचारले-
" कशाबद्दल ग ? "

पदराच्या टोकाशी चाळा करीत बायको म्हणाली-

" अहो, कशाबद्दल म्हणून काय विचारताय ?
माझ्या स्वैपाकाचं भारीच कौतुक केलं हं तुम्ही...
सगळ्यांसमोर देखील ! "


मी निर्विकारपणे उद्गारलो-

" हं हं , त्याबद्दल म्हणतेस होय ?
त्याच काय आहे, 

रोज जेवल्यानंतर.....
फक्त तुलाच एकटीला जे खोट बोलतो,
ते आज चारचौघासमोर बोललो इतकंच ! "
.

धूर्त बायको


लग्नानंतर,
 मी बायकोला नको तो प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा केलाच .
उत्साहाच्या भरात मी तिला विचारलं-


" काय ग, आपल्या दोघात हुषार कोण आहे,
असे तुला वाटते ? "
 

बायको मानेला झटका देत पटकन म्हणाली,
" अर्थात मी ! "
 

... मत्सराच्या झटक्यात मी विचारले,
" कशावरून ? "
 

धूर्त बायकोने प्रतिप्रश्न केला-

" माझ्याशी तुम्ही लग्न केले....
यावरूनच ते सिद्ध होत नाही का ? "
.

हजरजबाबी बायको


रविवारचा आवडता दिवस.
चहापानाबरोबर बायकोशी गप्पांना उधाण आलेलं होतं !
बायकोला म्हटलं-

 
" कालच्या सभेत हातात ध्वनिक्षेपक धरून,
तासभर उभे राहून, हातपाय भयंकर दुखले.
पण रात्री तू आठवणीने माझे हातपाय दाबलेस,
त्यामुळे खूपखूप बर वाटलं हं ! "

अस्मादिकांची फिरकी घेण्याची- एकही संधी न सोडणारी,

 हजरजबाबी बायको म्हणालीच-

" अग बाई ! विसरलेच मी !
एक तास व्याख्यान दिल्यामुळे,
तुमचा गळाही खूपच दुखला असेल ना...! "
.

चार चारोळ्या -

१.

माणसाच्या नजरेवर नेहमी 
विश्वास ठेवणे अवघड असते -
अधु वाटणाऱ्या नजरेलाच 
नको ते नेमके दिसत असते !
.

२.

सवयीने दु:खाला गेलो 
गुंतत नित कवटाळत मी.. 
स्वप्नी पाहुनियाच सुखाला 
उठतो आता दचकत मी..
.

३.

पैसा नसता जे जुळते
तेच खरे असते नाते -
पैसा असता जे जुळते
मनापासुनी ना ते नाते..
.

४.

लाभता तुझा सहवास सखे 
फुलून येते कळी मनाची -
नसता जवळ वनवास सखे.. 
सुकून जाते कळी मनाची ..
.

" आरती खुर्चीदेवीची - "


 लोभी नित्य सत्तेचे, असावे मनी 
उदोउदो नेहमी आपला, पडावा कानी  
भवती तो करावा, घोळका चमच्यांनी  
सततचा जयजयकार, करावा त्यांनी....
 

जय देवी, जय देवी, जय खुर्चीदेवी -
अशीच मेहेरनजर, मजवर तू ठेवी | धृ |
जय देवी, जय देवी...

आदर्श ठरण्याचा, प्रयत्न करीन
नाही जमला तर- अर्ध्यावर सोडीन
शरम अन् लज्जा, तुजसाठी सोडीन
नैतिकतेचे नाटक- जनतेत करीन | १ |
जय देवी, जय देवी...

सत्तेसाठी वाट्टेल ते, करीन काही 
खुर्चीसाठी जीव, लाविन पणालाही 
जाणीव जपून, मनांत राही
सत्तेमागे संपत्ती, धावत येई | २ |
जय देवी, जय देवी...

.

अति सर्वत्र वर्ज्ययेत !



त्या देवळातल्या देवाशपथ खरं सांगतो !
 

फक्त आणि फक्त,
 त्या देवळातल्या  देवाला मनापासून नमस्कार करण्यापुरता म्हणूनच,
 परवा एक देवळात गेलो होतो.
 

प्रवेशद्वारापासूनच,
निरनिराळ्या सूचनांच्या पाट्यांची सुरुवात झाली होती .

नमस्कार  " असा "  करावा .
प्रदक्षिणा  " अशी "  घालावी..
रांगोळी  " अशी "  घालावी...
नामस्मरण  " असे "  करावे ....
ध्यान  " असे "  करावे.....
जेवणात  " असे "  पदार्थ वाढावेत ......
जेवण  " असे "  करावे.......
आणि बऱ्याच  "अशा "  सूचना लिहिलेल्या पाट्या, मी वाचत वाचत वाचत  गेलो !


........... आणि सांगायची मुख्य गोष्ट  म्हणजे,
 देवळातल्या देवाला नमस्कार करायचेच  विसरून, मी तसाच घरी आलो !


मग घरच्याच  देवाला हात जोडून  प्रार्थना केली -

"  हे  देवा, वेळात वेळ काढून, क्षणभर हात जोडून तुझे दर्शन घ्यायला, सर्वजण  तुझ्या दारात येतात  .
त्यातले जास्त भक्त दरिद्री , भुकेले, गरीब लोकच  असतात. 
ज्यांना एक  वेळच्या जेवणाची भ्रांत असते- असेही गरजू आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी, तुझ्या पायाशी धाव घेतात.
 " असे  तसे करावे "  -  अशा  पाट्या नुसत्या वाचून, एकाचे तरी पोट  भरत असेल का ... ?
 पंचपक्वान्नाने भरलेले ताट गरीबाना न  दाखवता  -
 हे  "  पाट्याचे   स्तोम "   आवरण्याची सद्बुद्धी  त्या संबंधितांना दे ! "
.  
.

बायकोचा असा कसा, बसला हो घसा ...


आज इतक्याजणांचा आवाज-
आमच्या घरातून कसा काय येतोय ..
म्हणून काय विचारताय राव-
आज आमच्या घरातला प्रत्येकजण, 

भरपूर गप्पा मारायच्या मूड मधे आहे !

आज बायकोचा घसा बसला आहे ,
आणि तिला बोलता येत नाही होssssss !
 

......
 

बायको सोडून,
आम्हा सर्वांची घरात धम्म्म्माल चालू आहे .
काव्य.. शास्त्र.. विनोद... यांना ऊत आला आहे.
मित्र मंडळीही ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन, 

यथेच्छ गप्पा मारून गेली !
बायको घशावर हात फिरवत निमूट बसली आहे.

शेजारणी "तिच्या" सांत्वनाला येऊन गेल्या. 
जाता जाता......
 आम्हा समस्त पुरुषवर्गाकडे नाक फेंदारून गेल्या !

काही मित्रांनी "बायकोच्या घशाचे रहस्य" विचारण्याचा प्रयत्न केला.

पण मी सर्वांना निक्षून सांगितले -
" नवस न करता, ही परमेश्वराची लाभलेली देणगी उर्फ आमची सुवर्णसंधी आहे-
जी एखाद्याच नवऱ्याला आजपर्यंत भोगलेल्या कर्मामुळे घरांत प्राप्त होते ! "

बहुतेक मित्रांना ते सांगणे पटले असावे, 

कारण सर्वांनी आपापल्या घरांत डोलावत असतात, तशाच माना डोलावल्या !


............


आमच्या घरांत आता एवढी सामसूम का, म्हणून विचारताय राव....
म्हणजे दु:खावर तिखट चोळताय का माझ्या ?

सगळ्या मैत्रिणींचा नवस कामी आला की हो !
.... आणि आमच्या बायकोचा घसा एकदम सुधारला....!

आणि आमचा मूड बिघडला !

बघा, 

कशा येताजाता हसताहेत आमच्या मैत्रिणी ....
आमचा आनंद बघवतच नाही, 

त्या सगळ्या मेल्यांना !
देव करो 

आणि त्या सगळ्यांचाही  चांगला घसा बसो !
.

.

चार दिवस सासूचे .....



''''''  ती  ''''''


तिचा निश्चय ठाम आहे !

तिच्या सासूची सासू-
ती मालिका बघतच वर गेली.
तिची सासू-
मालिका खालीवर पहात वर खपली.
आता तिची सून- 
ती खपण्यावर टपली आहे !

पण ती... आपल्या निश्चयावर ठाम आहे !
त्यासाठी -
ती.....
 देवळातले भजन-कीर्तन अर्ध्यावर सोडून येते.
मैत्रिणीबरोबर चालू असलेल्या इतरांबद्दलच्या चहाड्याचुगल्या चक्क अर्ध्यावर टाकून येते.
घरातल्या इतरांच्या तहानभुकेची पर्वा न करता,
स्वैपाकपाणी न बघता,
पाव्हणेरावळे विसरून,
बहिर्गोल भिंग डोळ्यांवर ठेवून,
 टीव्हीला चिटकून...
आपली आवडती मालिका पहिल्या खेरीज-
ती पाण्याचा थेंब प्राशन करत नाही !

दिवसेंदिवस लांबतच चाललेल्या,
त्या आपल्या आवडत्या मालिकेच्या निर्मात्याला शिव्या देत,
इतक्या वर्षानंतरही-
 त्या मालिकेत चिरतरुण दिसणाऱ्या सर्व पात्रांच्या नावाने बोटे मोडत-
तीच मालिका पहाण्याच्या,
आपल्या निश्चयावर अजूनही ----
ती ठाम आहे !
.

बायकोची आत्महत्त्या


नेहमी काहीतरी खात (- माझे डोकेही याला अपवाद नाही !) असणाऱ्या,
एक नंबरच्या खादाड बायकोशी,
माझे नेहमीप्रमाणे भांडण सुरू झाले.

बायकोने धमकी दिली,
" आताच्या आत्ता मी गाडीखाली जाऊन जीवच देते. "
विनोदबुद्धी शाबूत ठेवत मी बायकोला विचारले,
" नक्की गाडीखालीच जीव देणार ना ?
जाताना तेवढा जेवणाचा डबा बरोबर भरून न्यायला विसरू नकोस ! "

... बायकोने फणकाऱ्याने विचारले,
" जेवणाचा डबा बरोबर कशाला ? "

समजावणीच्या सुरात मी उत्तरलो,
" अग, गाडीला एखाद्या वेळेस खूपच उशीर झाला,
तर भुकेने व्याकुळ होशील ना तू....

 गाडी येईपर्यंत ! "
.

स्मरणशक्ती बायकोची -


हसत हसत बायको घरांत आली -
आणि उत्साहाने मला सांगू लागली,
" अहो, ऐकलं का -
आज महिलामंडळातल्या "स्मरणशक्तीच्या स्पर्धे"त
मला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले ! "


मीही तितक्याच उत्साहाने म्हटले,
" अरे वा ! छान छान- अभिनंदन !
... काय बक्षीस मिळाले, पाहू दे तरी ? "

कपाळावर मूठ आपटून घेत,

 बायको किंचाळली,
" अगबाई ! 

चांदीचा पेला मिळाला होता की हो, बक्षिस म्हणून-
....विसरलेच मी-

 येतांना तो पेला घरी आणायला ! "
.

लग्नानंतर हाल-अहवाल


.
नवराबायकोच्या गप्पात, 

बायकोने चहा पीतपीत ऐटीत मला विचारले,
" आपल्या लग्नानंतरची,

 एक तरी दु:खद घटना तुम्हाला आठवते का हो ? "
 

हताश सुरात मी उद्गारलो,

" अग, एकच का ? किती किती सांगू तुला -
 

तुझ्याबरोबर साडीखरेदीला जाणे;
... तुझी साडीखरेदी चालू असतांना, 

शेजारी चारपाच तास तरी माशा मारत बसणे;
साडीखरेदी संपली की, 

तुझा गजऱ्याचा हट्ट पुरवण्यासाठीही खिशात पैसे उरलेले नसणे;
आपण कधी नव्हे ते सहलीला निघालो की, 

नेमकी  तुझ्या माहेरची माणसे टपकणे;
तुझी सासू घरांत आली की, कामात आदळापट -

आणि माझी सासू आली की, सगळी कामं झटपट !
मी फक्त "तुला" म्हणून सांगितलेल गुपित,
तुझ्या आईकडून, दुसऱ्याच दिवशी, मला परत ऐकायला मिळणे-
.....ह्या सगळ्या तुला आनंदी घटना वाटतात की काय ? "

शेवटचे वाक्य पूर्ण ऐकायला.....
बायको समोर होतीच कुठे ?
.