सहा चारोळ्या..

जुगलबंदी आपली ही 
कोठवर चालायची -
मौन तुझे, मीहि संधी 
न घेतो बोलायची ..
.

अजब खेळ पावसाचा
धरतीच्या लेकराशी-
गाव एखादा उपाशी 
गाव एखादा तुपाशी..
.

शक्य वाटते दगडातही 
"देव" पाहणे- 
अवघड वाटते माणसांत 
"माणूस" शोधणे..
.

जो तो हात जोडतो
मागण्यास सुख देवापुढे-
सुख पडताच पदरी
पाठ फिरवतो देवाकडे..
.

आयुष्याची नाव निघाली 
धाव घेउनी किना-याकडे,
'उरला प्रवास असाच घडावा' 
देवाला घालतो साकडे !
.

हिंडतो मी वेदनेला 
घेउनीया संगती-  
मत्सरी सुख होत नाही  
मज कधीही सोबती..
.

गजानना गजानना.. (भक्तीगीत)

गजानना गजानना
सद्बुद्धी दे सकलांना

समाधान सुख आम्हा देशी
विघ्न संकटे दूर तू करशी

नष्ट करावे अविचारांना
मनी भरावे सुविचारांना

द्वेष नको भांडणे ना मनी
प्रेम सलोखा नित्य जीवनी

सदैव आचरतो सद्वर्तन
तुला स्मरूनी घेतो दर्शन

असशी दुःखात तूच आधार
जीवन सागर सुखात पार

करतो प्रार्थना तुला गणेशा
पूर्ण करी सर्वांच्या अपेक्षा..!
.

पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी.. गझल

अनलज्वाला मात्रावृत्त
८+८+८.
..........................................
पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी
होता कौतुक पण इतरांचे जाशी पळुनी..

पावसातली भेट आपली  का आठवली
आठवणींच्या सरीत गेलो पुरता भिजुनी..

तिने वाचली माझ्या नयनी कथा व्यथेची
दादही दिली तिने मग मला आसवांतुनी..

फुलांसवे मी किती खेळलो बागेमध्ये
काट्यांनी पण सूड घेतला मला टोचुनी..

आठवणींचे पंख लावले मनास माझ्या
फिरून आलो पुन्हा तिच्या मी दारावरुनी..
.

अनाथांच्या नाथा पंढरीनाथा..

अनाथांच्या नाथा पंढरीनाथा
दीनदयाळा तू भक्तांचा त्राता..

पायी वारकरी मैल पार करी
दर्शनाची ओढ ठेवून अंतरी..

राम कृष्ण हरी जयघोषात वारी
पांडुरंग चित्ती सांगे एकतारी..

तल्लीन भजनी टाळ मृदुंग ध्वनी
वारकरी चालती शिस्त समाधानी..

विठ्ठल मुखात विठ्ठल मनात
सान थोर सगळे दंगले नामात..

स्वच्छ तन मन चंद्रभागा स्नान
डोळ्यात सुंदर सावळ्याचे ध्यान..

पाय विठ्ठलाचे मस्तक भक्ताचे
टेकले म्हणता सार्थक जन्माचे.. !
.

माणसे .. (गझल)

चामर वृत्त-
गालगाल गालगाल गालगाल गालगा
............

खोपटातली सुखात राहतात माणसे
बंगल्यातली उदास वाटतात माणसे..  

पाठ पाहुनी लगेच नाक वाकडे किती
का समोर गोड गोड बोलतात माणसे..

कौतुकास ना पुढे कधीच जीभ येतसे 
भेटता उणेदुणेच काढतात माणसे..

स्वागतास धावती बघून 'राव' पाहुणा
पण गरीब पाहुण्यास सारतात माणसे..

कार्य हातुनी न होतसे नवीन चांगले 
जुन्याच मग कथा पुन्हा उगाळतात माणसे..
.

आजीचा लाडका दोडका मी.. (बालकविता)


नेहमी घरात खेळतो मी
माकडउड्या बेडूकउड्या मारतो मी..

आजीला पायरीवर बघतो मी
मनातल्या मनात हसतो मी..

हळूच आजीच्या मागे जातो मी
गुपचुप डोळे तिचे झाकतो मी..

आजीच्या खांद्यावर बसतो मी
"पोतं घ्या साखरेचं पोतं" म्हणतो मी..

आजीसोबत  खूप खेळतो मी
आजीचा लाडका दोडका मी..!
.

स्वामी समर्था, स्वामी समर्था ...


स्वामी समर्था, स्वामी समर्था, 
शरण तुला मी आलो
नयनांसमोर मूर्ती तुझी 
नतमस्तक मी झालो..

महती तुझ्या नामाची 
इतरांना सांगत बसतो
श्री स्वामी समर्थ, जप हा
मनात चालू असतो..

अशक्य ते करशी शक्य 
अगाध महिमा तुझा
भिऊ नकोस मी पाठीशी, 
आधार मला तुझा..

तल्लीन होऊन गुणगानी 
रमतो तुझ्याच मी
सुख शांती तुम्हा मिळो, 
आशीष दे नेहमी..
.

दोन चारोळ्या..

१.
का असती नशिबात माझ्या 
नियतीचे खेळ उलटे -
सुखाचे पेरतो बीज मी 
उगवती दु:खांचे काटे ..
.

२.
मी दु:खांची आयुष्याला 
ठिगळे जोडत मिरवत आहे-
पारावार न आनंदाला 
जो तो इतरां सांगत आहे..
.

तीन चारोळ्या..


धो धो धो धो पाऊस झाला 
पूर किती कवितेला आला -
बनल्या कवितांच्या होड्या 
पुरात आनंद वाहू लागला ..
.


का आभासी दुनियेमध्ये 
वाटे आपुलकीचे नाते-
अनुभव येता, धक्के खाता 
"परके अपुले" उमजत जाते..
.


दारी मरणाच्या कळले 
घरात जगणे होते सुंदर-
हातचे सोडून पळत्यापाठी धावणे
माझे होते वरवर..
.

मायबाप राबतात.. गझल

(चामर वृत्त..
गालगाल गालगाल गालगाल गालगा)

मायबाप राबतात पाहणार ते कधी..
गाव सोडले ऋणास फेडणार ते कधी..

कानसेन मैफिलीत आपसात दंगले  
राग कोणता कुणास सांगणार ते कधी..

भोपळ्यास बांधुनी तयार कंबरेस पण
कोरडी विहीर ती पोहणार ते कधी..

भाषणे असंख्य ठोकली इथे तिथे जरी
पूर्ण आज कामकाज बोलणार ते कधी..

जीवनात दु:ख नित्य पाचवीस पूजले
क्षणैक लाभत्या सुखास पेलणार ते कधी..
.