पुण्यास पाठी बांधून झाले - [गझल]

पुण्यास पाठी  बांधून झाले 
पापात माझे डुबकून झाले -

जगण्यात गोटे सोनेहि दिसले
नशिबात होते वेचून झाले -


माझ्या लढयाचे अप्रूप नाही
झुरळासही मी पकडून झाले -


ठरलेच होते जैसे जगावे
गोत्यात नाते झटकून झाले - 


आले यमाचे बोलावणे जर
आभार सगळे मानून झाले .. !

.

डस्टबिन

लग्न झाले .
प्रथेनुसार तो तिच्या ताटाखालचे मांजर झाला.
तरीपण थोडेफार भान ठेवू लागला.
तारतम्य बाळगू लागला.

एके सकाळी ती त्याला म्हणाली-
"स्वच्छता अभियान सुरू झाले .
आपणही हातभार लावू.
आपल्या घरातल्या जुन्या डस्टबिनला "वृद्धाश्रमा"त पाठवू ."

त्याने थोडा विचार केला .

नंतर तो म्हणाला -
" ठीक आहे.
माहेरी तुझ्या भावाला फोन करून विचार-
"तिथल्या डस्टबिनचीपण वाट लावायची आहे का"- म्हणून.
एकाचवेळी इथले आणि तिथले काम होईल !"

बुमरँग असे अचानक आपल्यावर उलटेल, 

असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते ..

डस्टबिनचा विषय कोपऱ्यात पडून राहिला तो राहिलाच...... धूळ खात !


.

असे का होते -

असे का होते, समजत नाही
पण तसेच घडते, हे मात्र खरे ..

देवळात गेलो की,
कमीतकमी किंमतीचे
नाणे खिशातून निघते -

हॉटेलात गेल्यावर मात्र,
डिशच्या भावाचे
मूल्यमापन नसते ..

देवळात गेलो की
रांगेत उभा रहायला कुरकुरतो ..

हॉटेलात नंबर लावून
बाहेर मुकाट चुळबुळतो ..

देवळासमोरच्या भिकाऱ्याच्या थाळीत
त्याने अजीजीने मागितले तरीही
एक नाणे टाकायला
हात मागेपुढे पाहतो ..

हॉटेलसमोर दरवानाच्या हातात 

त्याने कडक सलाम ठोकला की,
दहाची तरी नोट
बिनधास्त मी टाकतो .. !
.

काही जमत नाही .. तरीही-

बोलायला मुळीच जमत नाही
कवळीही तोंडात टिकत नाही ..


चालायला नीट जमत नाही
हातातली काठी धरवत नाही ..

नात्यागोत्यातली रंगत नाही
रुसव्याफुगव्याची गंमत नाही ..


वाचायला काही जमत नाही
नाकावर चष्माही रहात नाही..

रागवायला आता जमत नाही
ऐकायला कुणाला फुरसत नाही ..

इकडतिकड पाहिल्याशिवाय करमत नाही
डोळ्यांना पहिल्यासारखं दिसत नाही..

कुचूकुचू काहीच जमत नाही
कानांची साथही मिळत नाही ..


बसायला कोणी फिरकत नाही
बोलवायची आता हिंमत नाही..

सुुुसंवाद मुुुळी करवत नाही

झोपेची गोळी सोडवत नाही..

मरायला काही जमत नाही
जगायची आशा सुटत नाही ..
.

अजुनी बसून आहे

(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..

मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..

का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..

हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.