गोष्ट तशी लहान

काल सकाळी सकाळी
बायकोला मी स्वत: केलेला
माझ्या हातचा गरम गरम चहाचा कप दिला
आणि विचारले होते -
"कसा काय झाला ग आजचा चहा ?"

नेहमीप्रमाणे नाक मुरडणार नाही
ती बायको कसली !

आनंदाने चहाचा घोट घोट घेत उत्तरली-
"चांगला आहे,
पण मी करते तस्सा कुठे करता येतो तुम्हाला ?"

माझ्या आनंदावर विरजण टाकण्यात
काय आनंद मिळतो तिला कुणास ठाऊक !

- - - पण, त्यानंतर
"मी करतो तो चहा चांगला"
का
"मी करते तोच चहा चांगला"
या विषयावर काल आमची खूपच खडाजंगी उडाली !

दिवसभर चर्चा, गोंधळ, हमरीतुमरीवर येऊन
कुठल्याच निर्णयाप्रत आम्ही दोघेही हट्टाला पेटल्यामुळे
येउच शकलो नाहीत.

एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून
आमची संसारातली युती काही काळ संपुष्टात आली आहे खरी !

आमच्या युतीविना
दोन्ही पोरं, नातू आणि सुना भांबावून गेलेली आहेत !
.

जन्म कवितेचा

शब्दांचा
माजला
कोलाहल ..

गोंधळले
मनी
एकमेकात -

बसलो
गुंता मी
सोडवत ..

अन -

जन्मली
कविता
झोकात .. !
.

जगणे तुझ्याचसाठी

जमणार नाही मला
आकाशातले तारे
आणिक चंद्र पुनवेचा

तोडणे तुझ्यासाठी ..

जमणार नाही मला
गुलबकावलीचे फूल
सात समुद्रापलीकडून

खुडणे ग तुझ्यासाठी ..

जमणार नाही मला
चमचमणारे हिरे
कोळशाच्या खाणीतून
आणणे तुझ्यासाठी ..


जमणार नक्कीच मला
आणखी सात जन्म तू 

सोबत असणार म्हणून
जगणे तुझ्याचसाठी .. !
.

हे असेच चालायचे

सत्तेच्या लोण्यासाठी
बोके सगळे टपून बसलेले
नातीगोती विसरून सारी
वंशपरंपरेस जपलेले --


तुझे किती माझे किती
डरकाळ्या गुपचूप मारत
घोषणांच्या खिरापती

मतदाराला मूर्खात काढत --

कुणा न कसले सोयरसुतक
जनतेच्या सुखदु:खाचे
सत्ता खुर्ची मलाच मिळो
नाव टिको वारसदाराचे --


आपसात लढाया जीवघेण्या
चालू ठेवती अनुयायांच्या
एसीत बसुनी गप्पाटप्पा
बढाया पूर्वज मर्दुमकीच्या --


पाट वाहती रक्ताचे
अनुयायी पण निष्ठेखातर
मजेत नेते बघत राहती
खुर्चीसाठी पक्षांतर --


आंधळी जनता डोळस नेते
खड्ड्यात पडता बघती जेते
मजेत हसती मजेत राहती
मतामतांचे खणून रस्ते .. !
-

घरपण


 ती रुसता
मी हळूच हसतो ..


मी हसता
ती फुगून बसते ..


प्रपंचातली
रुसवाफुगवी ...


घरांत "घरपण"
भरून असते !

-

चार आले फार झाले - -[गझल]

वृत्त- मनोरमा 
लगावली- गालगागा गालगागा 
मात्रा- १४ 
 - - - - - - - -- - - - - - - - - - - -
चार आले फार झाले 
शेवटी आधार झाले ..

संधिसाधू पक्षबदलू 
होउनी लाचार झाले .. 


लाटले भूखंड अगणित
अन भुईला भार झाले ..


ना कळे महती युतीची
उलटसुलटे वार झाले ..


ना जमे अभिनय नराचा
वेष बदलुन नार झाले ..

.

यमदूतांशी खूप खेळलो - -[गझल]

मात्रावृत्त
मात्रा-  ८+८ 
- - - - - - - - - - - - - - - - - - -
यमदूतांशी खूप खेळलो
डावपेच पण अंती हरलो ..

सुखात होतो दु:खासोबत
सुखासवे मी लोभी बनलो ..

उशिराबद्दल ऐकुन सबबी
थाप मारण्या मी न कचरलो ..

एकापेक्षा सरस एक ते
करुनी कौतुक मीहि गाजलो ..

भेटलीस तू अशी अचानक
ग्रीष्म ऋतू पण कसा बहरलो ..
.

फुटेल वाटे दगडा पाझर - - [गझल]

मात्रावृत्त-
मात्रा- ८+८ 
- - -- - -- -- - - -- - -- - -- -- -- - - -- 
फुटेल वाटे दगडा पाझर
माणसास ना कधीच गहिवर ..

नसता ओळख भासे सलगी
ओळख असुनी पण स्मित वरवर ..

देव असो वा नसो राउळी
जोडत जातो कर मी क्षणभर ..

आले अनुभव खूप जीवनी
आता भाषा माझी जर..तर ..

नव्हता पैका नव्हता मोका
बनता नेता जनता घरभर ..
-

सन्मार्गावर वळणार कधी --[गझल]


मात्रावृत्त-
मात्रा- ८+८ 
---------------------------------------
सन्मार्गावर वळणार कधी
मोह वासना सरणार कधी ..


करण्या निंदा आघाडीवर
कौतुक संधी मिळणार कधी ..


उपदेशाचे वाहती झरे
घडे पालथे भरणार कधी ..


सदा रंगते पिचकाऱ्यांनी
शहर स्वच्छ दिसणार कधी ..


दिसतो जो तो दु:खी येथे
दुसऱ्यासाठी हसणार कधी ..


बसलो भाळत मुखवट्यास मी
चेहरा खरा बघणार कधी ..


भिजली शेती जर घामाने
मोल तयाचे कळणार कधी ..


नकोस साधू जवळिक इतकी
भांडण आपण करणार कधी ..
.

निर्मळ बघुनी हास्य तुझे ते --[गझल]

मात्रावृत्त-
मात्रा- १६+१४ 
-----------------------------------------------------------
निर्मळ बघुनी हास्य तुझे ते मनी भावना घुटमळते
ओळखपाळख नाही अपुली प्रतिसादास्तव अडखळते ..
.
पैसाअडका खर्च कितीही केला मी ज्यांच्यासाठी
पुढ्यात येता तोंड फिरवती जखम मनाची भळभळते ..
.
म्हणतो मनात घर बांधावे एक छानसे तुजसाठी
राजमहालाची तुज आवड पण कळता मन कळवळते ..
.
असुनी धडधाकट ते सगळे का पळती साह्यासमयी
धावे अंधासाठी पंगू हृदय तयाचे तळमळते..
.
जीवनात मज रुतता काटे झालो जखमी अनेकदा
वाट किती मी देवा पाहू फूल कधी ते दरवळते..
.

मी - एक शापित !


मागच्या वर्षी काही कारणानिमित्त एके दिवशी,
बायकोच्या हट्टानुसार एक नवीन भेटवस्तू
[-तिच्यासाठी] खरेदी करायची ठरवले होते..

पण-

इतर काही कारणाने,
ती खरेदी लांबणीवर पडत गेली.. !

बहुधा त्याचवेळी,
बायकोने मला "शाप" दिलेला असावा,
असा मला आता दाट संशयच नव्हे,
तर खात्रीच पटत चालली आहे !

तो कोणता "शाप" असेल असे वाटते ?

" तुम्हालाही -
पुढच्या वर्षी -
तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट -
मिळवण्यासाठी -----
असेच तिष्ठत रहावे लागेल बरं ! "

----- एटीएमसमोरच्या ह्या लांबलचक रांगेत,
मी अजूनही उभाच आहे.. !

मला तिच्या "शापा"ची आठवण तीव्रतेने होत आहे ,
आणि -

"नेमका माझा नंबर येताच, क्याश संपू नये-"
अशी त्या एटीएमला प्रार्थना करत आहे !!
-

जगायला मज हरकत नाही.... [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक
मात्रा- ८+८
----------------------------------

जगायला मज हरकत नाही 
यमदूताला फुरसत नाही..

उरले हाती दिवस मोजणे 
दु:खाशिवाय करमत नाही ..

पाठ फिरवता पण नियतीने 
क्षणभर का सुख थांबत नाही..

दिसता गजरा दुरून हसते
मिठीतुनी मग सरकत नाही..

जमती काही गझलकार पण 
अभंग कोणी ऐकत नाही..

माझ्या ओठी लागे प्याला
असत्य काही बरळत नाही ..
.

होतो काढत आठवणींची चित्रे तिचीच मनात --[गझल]

होतो काढत आठवणींची चित्रे तिचीच मनात
गेली काही चित्रे पुसुनी ओघळत्या आसवात..


नजरेची पाखरे भिजू दे चिंब या एकांतात
मिटल्या अधरांची चालू दे कुजबूज अंधारात..


खिडकीत मनाच्या क्षणभर तू गेलीस डोकावून
का वाटले झळकला मजला चंद्रच काळोखात..


सुवासात भिरभिरतो वारा असतो दूरच गजरा
पण चाहुल का तिचीच लागे धडधडत्या हृदयात..


होता फुलला क्षणात गाली गुलाब तुझिया तेव्हा
घुसला पण नजरेचा काटा का माझ्या काळजात ..
.

संधि साधली मित्राने - - [गझल]

संधि साधली मित्राने वार मागुनी करण्याची 
होती बाळगली भीती उगा मनी मी वैऱ्याची ..


'वा वा' जेव्हा जेव्हा मी म्हणतच कौतुक केले हो 
साधत गेला तो संधी का कविता ऐकवण्याची ..


संगत मला फुलाची त्या आवडते हे खरे जरी 
सोबत ना टाळू शकतो सवय जाहली काट्याची ..


सगळीकडे मुखवटे हे भाऊगर्दी का झाली 
अवघड आहे पारखही खऱ्यास ती ओळखण्याची ..


कौतुक माझे ऐकाया आतुर झालो मी होतो 
वाट पाहिली त्यासाठी सरणावरती चढण्याची ..

नाही जमले भेटाया सखे तुला दिवसा ग मला 
म्हणून स्वप्नी का रात्री संधि शोधसी छळण्याची ..
..

किती ऊब न्यारी तुझ्या आठवाची ..[गझल]

वृत्त- भुजंगप्रयात 
लगावली- लगागा लगागा लगागा लगागा 
मात्रा- २० 
----------------------------------------------------
किती ऊब न्यारी तुझ्या आठवाची
तमा बाळगावी मुळी ना उन्हाची ..


नजर मज तुझी का ग टाळून गेली
न जखमेस औषध नि चिंता फुकाची ..


सुहास्यात बघ तो नमस्कार करतो
तयारीत घेण्या परिक्षा मताची ..


सदा सोबतीला वसे दु:ख माझ्या
कधी वाट पाहू सुखाच्या क्षणाची ..


नवा हा ऋतू अन नवी पालवीही
तरी झेप न्यारी जुन्या पाखराची ..

.