गोष्ट तशी लहान

काल सकाळी सकाळी
बायकोला मी स्वत: केलेला
माझ्या हातचा गरम गरम चहाचा कप दिला
आणि विचारले होते -
"कसा काय झाला ग आजचा चहा ?"

नेहमीप्रमाणे नाक मुरडणार नाही
ती बायको कसली !

आनंदाने चहाचा घोट घोट घेत उत्तरली-
"चांगला आहे,
पण मी करते तस्सा कुठे करता येतो तुम्हाला ?"

माझ्या आनंदावर विरजण टाकण्यात
काय आनंद मिळतो तिला कुणास ठाऊक !

- - - पण, त्यानंतर
"मी करतो तो चहा चांगला"
का
"मी करते तोच चहा चांगला"
या विषयावर काल आमची खूपच खडाजंगी उडाली !

दिवसभर चर्चा, गोंधळ, हमरीतुमरीवर येऊन
कुठल्याच निर्णयाप्रत आम्ही दोघेही हट्टाला पेटल्यामुळे
येउच शकलो नाहीत.

एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून
आमची संसारातली युती काही काळ संपुष्टात आली आहे खरी !

आमच्या युतीविना
दोन्ही पोरं, नातू आणि सुना भांबावून गेलेली आहेत !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा