सहा चारोळ्या -

'भज्यांशप्पथ -'
तुझी आठवण होऊ लागते 
खोटे वाटेल तुला सख्या रे -
डोळे घळघळ वाहू लागती 
कांदे भज्यांसाठी चिरताना रे . .
.

'मागणे -'
तू आहेस परीस 
मी आहे लोखंड -
प्रपंच सोनेरी आपला 
असाच राहू दे अखंड ..
.

'चेहरा -'
तू असल्यावर माझा चेहरा 
स्वच्छ पुसलेला आरसा असतो -
तू नसतेस तेव्हा सखे 
पारा उडालेला आरसा दिसतो . .
.

'अस्तित्व -'
तू असलीस तर 
सहवास कविता -
तू नसलीस तर 
वनवास कविता ..
.

'वेळ -'
तुझी वाट पाहत बसताना 
कळत नाही, वेळ किती छळतो - 
तू आल्यावर, तुला पाहताना 
कळत नाही, वेळ कसा पळतो ..
.

'बलिदान -'
तू विचारतेस फणकाऱ्याने 
"माझ्यासाठी काय केले ?" -
का विसरतेस, आयुष्यभर 
खालमानेने सर्व ऐकले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा