जगावेगळे विश्व कवीचे -

जगावेगळे विश्व कवीचे
अक्षरांसवे खोड्या करता -
चिमटे काढते वा गुदगुल्या
सराईतपण हाती येता !

जे ना दिसते कधी रवीला -
म्हणे नेमके कवीस दिसते
पाताळातून थेट त्या गगनी -
कवी भरारी चालू असते !

बालपणी वा म्हतारपणी ,
खरडावी लेखणी वाटते !
परी लेखणी येता हाती
कवीमनीं का खंत दाटते !

जुळवू कैसे यमकाला मी
भिता व्याकरणाला मनात
गणवृत्ता ओळखू कसे मी -
काव्यप्रसूती चिंता जनात !

अरसिका पहिले वंदावे -
अन कवितेचे बोट धरावे ,
टीकाकारास मुळी न भ्यावे
स्वानंदास्तव मस्त लिहावे !!

बंडूच्या स्वप्नातच येते -

बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी
झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी   ।१।

खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल
चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल   ।२।

ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार
बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार   ।३।

खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर
निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर   ।४।

ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा
प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा   ।५।

बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी
कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी    ।६।

मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू
देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्टीदांडू   ।७।

- - - गजर घड्याळाचा ऐकुन करि बंडूला परी टाटा
लवकर निजून उशिरा उठता बंडू खाई धपाटा   ।८।

शिखर त्यांनी गाठलेले पायथा धुंडाळतो - [गझल]

वृत्त- कालगंगा/देवप्रिया 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६
-------------------------------------------------
शिखर त्यांनी गाठलेले पायथा धुंडाळतो
चालती तोऱ्यात सारे मीच का ठेचाळतो-

देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो
माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो-

शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी
कालच्या सदऱ्यावरीचे ठिगळ का कुरवाळतो-

फाटकी लेऊन वसने रंक अब्रू झाकतो
अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो-

चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती
वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो-

बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले
रोप भाऊबंदकीचे आज मी सांभाळतो ..
.

आरती भ्रष्टाचाराची -

शालेय पोषण आहार घोटाळा
रोहयो-अनुदान-चारा घोटाळा
वृद्धापकाळी पेन्शन घोटाळा
‘आदर्श ’ घोटाळा-आला कंटाळा...।१।     
जयदेव जयदेव जय भ्रष्टाचारा
गल्ली ते दिल्लीत तुमचा दरारा ।धृ।

प्लॉटपासून फ्लॅटपर्यंत
मिळकतीला नाही राहिला अंत
लाचखोरीची कोणा ना खंत
कालचा रंक तो आज श्रीमंत ।२।
              जयदेव जयदेव ..

प्रामाणिक माणूस निर्भय ना बनला
लबाड मात्र तो धाडसी बनला
शेतकरी कष्ट करीत मेला
पुढारी तो भ्रष्ट होऊन जगला ।३।
             जयदेव जयदेव ..

मंत्र्यांना शिस्त ना पोलीसा शिस्त
सनदीही गब्बर होण्यात व्यस्त
न्यायमूर्ती काही घोटाळेग्रस्त
‘ विदेश ‘ मनांत होतसे त्रस्त ।४।
                           जयदेव जयदेव ..

काढला संग्रह कवितांचा -


(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’).

कोणालाही नाही वाटला,
खर्च फार याचा-
काढला संग्रह कवितांचा |धृ |

मेजावर तो विक्रीस सत्वर
कसा पसरला असा ढीग वर
कुपन ठेविले खास प्रतींवर
खप ना चार प्रतींचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

परमभाग्य हे "नात्यां"साठी
उभे ठाकले "फुकटे" पाठी
उभा राहिला जमाव सावध
जणु की शोकसभेचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

तो गझलेचे शेर वाचतो
हा चारोळ्या नित्य पाडतो
अभंगवाणित कोणी रमतो  
वाली ना कवितेचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

.

चालली डौलात होती मी असे न्याहाळले- [हझल]

येत ती डौलात होती मी असे न्याहाळले
चाक गाडीचेहि माझ्या नेमके तिज धडकले ..

खरडुनी अपुला गळा तू गीत कोमल गायले

छान ना कळले तुला मी कर्णयंत्रा काढले .. 

मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी 

वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले ..

इकडुनी जातेस तिकडे तू जरी हळु चंचले

भासती भूकंप भारी भूतलावर जाहले ..

पाहुनी झुरळास तिकडे धावसी माझ्याकडे

तू न सबला हाय अबला त्याक्षणी मी जाणले..
.

" मनांतले श्लोक - "

तुझे रूप साधे किती गोजिरे रे
तुला लोचनी साठवू साजिरे रे
असावा जसा वाटतो तू तसा रे
धनी - निर्धनी दर्शना येती सारे ।१।

जिथे जाउ साई तिथे ती असावी
सुखी सावली सोबतीला असावी
कुठेही कधीही कशीही दिसावी
तुझी मूर्ति साधीच नयनी ठसावी ।२।

न गर्वात , सर्वात मिसळून राही
न जाती , न धर्मात गुंतून राही
गरीबात रावात देवास पाही
असा देव साईविना कोणि नाही ।३।

धना - कांचनाचा भुकेला न साई
न लोभास मोहास स्वाधीन होई
जयांना कळेना कसा देव साई
तयांना कळू दे असा देव साई ।४।

’ सबूरी नि श्रध्दा ’ - शिकवण न स्मरणी
मनीं अंधश्रध्दा - फळाची दिवाणी
जमेना कुणाला फकीरी रहाणी
रुचेना कुणाला सदाचार वाणी ।५।

चढाओढ परदेशवारीत कोणा
न चिंता तयांना जरी हो ठणाणा
मनीं आगळा वेगळा ध्यास कोणा
कमी ना पडू देति रजता - सुवर्णा ।‍६।

उणे ना कुणाचे दुणे काढले ते
मनांतिल विचारा पुढे मांडले ते
स्मरणांत शिकवण तुझी ठेविना ते
करंटेच सारे तुला जाणिना ते ।७।

स्व प्न भं ग - -

तू हात पुढे जो केला, मी दिला त्यास आधार
समजून फोड तळहाती हळुवारपणे जपणार
वचनास पाळण्याचा केला पक्का निर्धार
चाललीस सप्तपदी तू, मी कधी न अंतरणार
शंकेस कधी तो थारा तू मनात ना देणार
जोडीची गोडि-गुलाबी ही सदैव दिसणार
तू कामावरून येता, तव स्वागत मी करणार
कप हाती गरम चहाचा- बिस्किटासवे देणार
तारीख एक ती येता, मी खूष अती होणार
तव पगार माझ्या हाती-मी तुजभवती फिरणार
..स्वप्नातहि असले भलते तू आणु नको कुविचार -
जा सांग तुझ्या बापाला मी घरजावई ना होणार !
ती केबी-फोरची संधी मी नाही दवडणार
करोडपती बनण्याची मी स्वप्ने बघणार !!

चार चारोळ्या -

निर्जीव असुनी पहा आरसा 
कौतुक करतो तुझे अती -
सजीव पामर मी तर साधा 
घुटमळणार ना तुजभवती ..
.

कार्यक्रम वृक्षारोपण दरवर्षाचा 
रोपासाठी खड्डा शोधती -
दिसता मागील वर्षाचा खड्डा 
मंत्रीमहोदय आनंदू लागती ..
.

लेखणी माझ्या भावनांशी 
इतकी झाली एकरूप -
मी विचार करण्याआधीच 
लिहू लागते ती आपोआप ..
.

जो तो हात जोडून 
मागतो सुख देवापुढे -
देवाकडून सुख मिळताच 
फिरवतो पाठ त्याच्याकडे ..
.

चारोळ्या ...

1.


'सवय -'


सवय तुला मज डिवचण्याची 

दिवसभर दूर दूर पळण्याची -

तास एखादा निवांत पडता 

स्वप्नी येउन मज छळण्याची ..
.


2.


'कशासाठी पोटासाठी -'


कधी ह्या कधी त्या दारी

कष्टाविना न मिळे भाकरी -

ह्याला जीवन ऐसे नाव 

कधी लाचारी कधी चाकरी..
.


3.


'एखादी तरी स्मितरेषा -'


नका दाखवू चेहरा गंभीर 

टाळतील ते सारे जन हो -

ठेवा स्मितरेषा चेहऱ्यावर
 
भाळतील ते सारे जन हो ..

.

आधी..? आणि - नंतर.. !

लग्नाआधि..समोर तोच हसरा,ती होतसे लाजरी-
झटकूनी झुल्पां हिरोसम झुके,ये लालि गालावरी!
दु:खी ना दिसती कधीच दोघे, चिंता नसे ती उरी
दोघांना बघुनी खुषीत; हसते नियती पहा वर खरी!!

"आणिन मी फिरवून लांब सखये सातासमुद्रांवरी!
बांधिन मी तुजसाठि एक बंगला त्या ताजमहलापरी! "
- बत्तीशीतुन ऐकताच बिलगे ती कावरी-बावरी
नेत्रातें भिडवून नेत्र बसती घेऊन शपथा करी;

लग्नानंतर...काळ खूप सरला-उद्विग्न दोघे घरी
फिरणे ना, जमले कुठे न बंगला बांधावया भूवरी!
कवळीला मुखि ठेविताच,फिरवी हातास टकलावरी
बोली ती अडताच कंठि नुसती कानावरी खरखरी!

विटलो मी पुरवून लाड,असुनी वाह्यात कार्टी जरी
तू कैदाशिण जाहली, खविस मी- दोघात आली दरी!
असुनी फ्लॅट जुनाट,का थकित मी, नोटीस ही ये घरी?
नियती ती हसते, मनात म्हणते- प्रारब्ध हे तव शिरी!!

माझे पक्ष बदलणे ...

कधी न पाहतो, इकडे-तिकडे
सत्ता जिकडे, मीही तिकडे
डोक्याला मुळी ताण न देता-
अंधानुकरण करणे..
माझे पक्ष बदलणे // धृ //

मी यांचा..कधी होतो त्यांचा..
खुशाल मजला म्हणोत चमचा
फिकीर कुणाची कधी न करता-
लांगुलचालन करणे.. //१//

सत्ता मिळता,लाथ झाडतो
प्रसंग पडता,पळहि काढतो
शिविगाळीला कधी न डरता-
खुर्चीलाच चिटकणे.. //२//

संधी साधुन,गळ्यात पडतो
संधी मिळता,गळा पकडतो
पक्षशिस्त बाजूस सारता-
नित्य पुढे मिरवणे.. //३//

लाचलुचपती-वशिला-पैसा
सुरेख संगम होता ऐसा
केस वाकडा कुणी न करता-
हात स्वच्छ राखणे.. //४//

मान मिळो,अपमान मिळू दे
मज दुस-यांची लाळ गिळू दे
टोपीची ती हांजी करता-
नवा पक्ष हुडकणे.. //५//

दोन चारोळ्या ...

१]

   'प्रेमबहर -'


अस्फुट अलगुज तुझ्या ओठांचे
नाद मधुर आपल्या प्रेमाचा त्यात ,
जन्मभर त्या नादात दंगून जावे
भोवतीचे जग विसरत प्रेमबहरात . .
.


२]

     'वेळ -'


वेळ जाणलीस माझ्या येण्याजाण्याची 
वेळ नेमकी तू खिडकीतून डोकावण्याची -
तुझे फक्त पहाणे आता सहन न होण्याची 
सखे, कधी वेळ खिडकी मनाची उघडण्याची ..

.

स्वातंत्र्याची भीती ....

स्वातंत्र्याची भीती .....

स्वतंत्र माझा देश जाहला, मी वर्णावा किती ,
इतकी वर्षे झाली , का वाटे स्वातंत्र्याची भीती !

धांगडधिंगा-गदारोळ तो दिसतो टीव्हीवरती,
लोकशाहीचे लक्तर लोंबत हसते वेशीवरती !
हर्ष होतसे बेकारांना, जवळी येता निवडणूक ती
निवडुन येता परि ते नेते कोठे पसार होती ?

कुणीहि परके घरात घुसती, स्वगृह समजून
घातपात अन गोळिबार ते करती, ना लाजून !
फाशी झाली तरि ते जगती, निवांत झोपून
तोड-फोड ती आम्ही पाहतो निद्रानाशातून !

भूखंडातही घोटाळे नि लाचखोरि करि बेजार
महागाई अन स्वाईन-फ्लूचा वाढतसे आजार !
निकालाविना तुंबित खटले पुढे सरकणार ....
कुंठित होते मति- पाहुनी लाल फीत व्यवहार !

अमर जाहले थोर हुतात्मे , झेंडे मग फडकती !
फ्लेक्सावर झळकण्यात नुस्ते गेंडे का गुंगती !!
स्वतंत्र माझा देश जाहला, मी वर्णावा किती ,
इतकी वर्षे झाली, का वाटे स्वातंत्र्याची भीती !

‘ बघ पुण्यातले हे खड्डे रे..’


(चाल:  मन पिसाट माझे अडले रे..)

बघ पुण्यातले हे खड्डे रे
थांब जरासा... थांब जरा..


भरधाव वेग वाहनाचा रे
खड्डयात पाय माणसाचा रे
चिखलास दमाने उडवा रे
थांब जरासा... थांब जरा..


ही खाली पँटही ओली
धडपडून वरती केली
शर्टाची बाजू भिजली रे
थांब जरासा... थांब जरा..

नेहमीच असे खणलेले
खड्डयात पुणे रमलेले
खड्डयातच रस्ते हुडकणे रे
थांब जरासा... थांब जरा..
.

" तडीपार -"

‘ तडीपार '-

आजच्या एका वृत्तपत्रात ‘उपायुक्तांनी एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून एका गुन्हेगाराला तडीपार केल्या’ची बातमी वाचली. ‘तडीपार गुन्हेगार’ म्हणजे नक्की काय ‘प्रकरण’ असते, याचे मला फार कुतूहल वाटत आले आहे. गुन्हेगारच तो ! अमक्या एका ठिकाणी त्याने अमुक गुन्हा केला,सबब त्याला त्या ठिकाणच्याच चौकीची हवा खावी लागणार आणि शिक्षा होणार,असे आपण समजतो! मग त्याला ‘दुस-या ठिकाणी’ कशासाठी पाठवले जाते? यालाच ’तडीपार’ म्हणत असल्यास: जो‘गुन्हेगार’ आहे,तो ‘दुस-या ठिकाणी’हि गुन्हा केल्याशिवाय राहिल काय? कारण आधीचा(चे) एक(अनेक) अनुभव त्याच्या पाठीशी!
दुस-या ठिकाणी पाठवण्याची शिक्षा ठोठावण्यामागे- त्याला सुधारण्याची संधी देण्याचा उद्देश असल्यास, तो कितपत सफल होणार! तो निर्ढावण्याचीच जास्त शक्यता नाही काय? सदर बातमीतील गुन्हेगारावर खून,चोरी व जबरी चोरी आदि प्रकारचे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.विशेष म्हणजे एका पोलिस ठाण्यातूनच, त्याला तडीपार करावे,असा प्रस्ताव पाठविला होता. आपल्या दारातला केर दुस-याच्या दारात टाकण्याचा तर हा प्रकार नाही ना!
‘तडीपार’ म्ह्णजे पहिल्या ठिकाणाच्या ‘नजरेआड’ असा अर्थ घेतल्यास, आधीच गुन्हेगार तपासाअंती देखील सापडत नाही असे आपण वाचतो; मग तडीपार गुन्हेगार ‘बेपत्ता’ होण्याची शक्यता नाही काय? पहिल्या ठिकाणी त्याचा वावर होत नसेल काय? असेल तर, पुन्हा त्याला काय शिक्षा देत असतील बरे?
वरीष्ठकृपेने इतरत्र ‘तडीपार’ गुन्हेगार पहिल्या ठिकाणीच वावरत असल्याचे खळबळजनक वृत्त पूर्वी वाचण्यात आले असेलच!
गुन्हेगार गुन्हा तर करतो आणि आमच्या डोक्याला कुतुहलाचा ताप देऊन जातो !

तुटक्या पुन्हा जहाल्या .....

तुटक्या पुन्हा जहाल्या, चपला घरातल्या-
फुगते कशी स्थळांची यादी मनातल्या !

जातो न अनवाणी, पाऊल अडखळे..
वर पाच शोधताना, टाचा दुखावल्या !

तुटताच अंगठेही , तळ पार बाद व्हावे
चपलातल्या फजित्या , संशोधनातल्या !

हासूनिया खुणावी , ती यादी टांगलेली
मी रोज पंचकन्या स्मरतो घरातल्या !

घोरशील एकटाच

‘घोरशील एकटाच -’

घोरशील एकटाच - गादीवर त्या पडता
सिरियलचे वेड मला लागे भारि आता !

ऑफिसला गेल्यावर,टीव्ही सुरू मी करते
चॅनलही विविध, विविध किती फिरवते
गुंतते तयात पूर्ण- सासूला विसरता !

खैर! तू रसिक नाही- टीव्ही पहाणारा
मित्र-काम-ऑफिस-ओटी, यातच रमणारा
लागतो रे सार्थकी वेळ आपुला आता !

टीव्हीची ओढ मला लागली कशाने ?
सोसवे न सासूचे ते रुसणे अन् फुगणे
सासूचा दुष्ट जाच सोसु किती नाथा !

मी मोरपीस व्हावे - [गझल]

 मी मोरपीस व्हावे 
गालावरी फिरावे 

मी एक फूल होउन 
केसात नित रहावे

मी एक झुळुक फिरुनी
पदरास झुळझुळावे

मी एक बोट असता
दातामधे रुतावे

  गेलो जरी ग कोठे 
माझ्यात तू असावे ..
.

सखीची आठवण


सखे, तुझी आठवण
मनाच्या कुपीत साठवण
कधीतरी कुपी उघडतो...
आठवणींचा गंध दरवळतो !

वाऱ्याची झुळुक येते जाते
आठवण तुझीच रेंगाळते
कधीतरी मनाचे पोळे फुटते...
आठवणींचा मध ठिबकत राहतो !


.