चार चारोळ्या -

रडायचे दु:खात मला जर 
असतो आधार तुझाच खांदा -
खात्री आहे मला रे दोस्त 
शेवटी पहिला तुझाच खांदा . .
.

रडायचे नाहीच होते ठरवले
धोका नेहमीसारखाच घडला -
अश्रू एक फितूर होऊन 
न जुमानता डोळ्यातून पडला ..
.

शिकून ज्युडो कराटे आली 
कुंगफूमधे तरबेज झाली -
तांडव करीत बाहेर पळाली
बघून घरात झुरळ पाली ..
.

सकाळी मी म्हणालो तिला 
'चहा खूप छान झालाय' -
दिवसभर उत्साह तिच्या 

चेहऱ्यावर ओसंडून राहिलाय ..
.

पाच चारोळ्या -

पाहत होतो खिडकीतून सखे, 
आकाशाकडे टक लावून -
"उगवले ना रे मी वेळेवर ?"
आलाच तुझा आवाज मागून ..
.

प्रयत्न करुनी दमलो जाण्या 
सखीजवळ नेटाने माझ्या 
मिठीत तिला क्षणात आणले 
समोरच्या झुरळाने माझ्या ..
.

पुस्तकप्रदर्शनात बायकोचा 
'पाकक्रिया पुस्तका'वर डोळा -
संभाव्य पदार्थांच्या जाणिवेने 
येऊ लागतो पोटात गोळा .
.

पाहून मजला गुलाब वदला 
नकोस इतका खूष तू होऊ -
काटा टोचता कळेल तुजला 
डोंगर दुरूनच साजरे पाहू ..
.

प्रिये निघून तू रागाने जातेस 
फक्त उन्हाचा उरतो वणवा -
प्रिये परतून तू येताना दिसतेस 
उन्हातही का भासतो गारवा ..

गनिमी कावा

विचारत इकडे तिकडे आले 
आज पाहुणे घरात आले 
अहाहा सदन धन्य झाले .. 

निवांत खुर्चीवर ते बसले 
मान डोलवत जरासे हसले 
रुमालाने तोंडही पुसले ..

'कसे काय तुम्ही वाट चुकला 
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..

 ओशाळवाणे पाहुणे हसले 
हळूच इकडे तिकडे पाहिले 
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले  .. 

पिशवीतून मोबाईल काढला 
रुमालाने स्वच्छही पुसला 
माझ्या हाती तो सोपवला .. 

"गनिमी कावा" त्याचा ध्यानी 
आला माझ्या त्याच क्षणी 
मुकाट उठलो हाती धरुनी ..

जर्जर जीव त्या पाहुण्याचा 
"चार्जर" विसरला मोबाईलचा 
शोधला पत्ता माझ्या घरचा .. !
.

तो श्याम ... हा श्याम ..

एक श्याम तो होता -
आई वडिलांना
मान देणारा 

झालेले संस्कार
पराकाष्ठेने जपणारा 

हसत खेळत
शिक्षण घेणारा ...

घरातली काम करून 
अहोरात्र 
पडेल ते 
कष्ट उपसणारा .... !

आजचा हा श्याम आहे -
मम्मी ड्याडच्या
प्रेमाला मुकणारा 

संस्कार म्हणजे काय
उलट विचारणारा 


रडत खडत 
क्लास जपणारा... 

वेळात वेळ काढून 
तासंतास एकटक 
तहानभूक हरपून 
व्हाटसअपवर रमणारा ... !

.

गुढी पाडवा

लग्नानंतरचे पहिले वर्ष, 
पहिला गुढीपाडव्याचा सण- 

डोळ्यासमोर उभी... 
गुढीसमोर हातात निरांजनाचे तबक घेतलेली, 
नऊवारीतली बायको- 
मनोभावे प्रार्थना म्हणणारी प्रसन्न समाधानी मूर्ती !

आज खिडकीतून शेजारच्या दाराकडे नजर गेली
गुढीची पूजाअर्चा नुकतीच झाली असावी. 
गुढीला नमस्कार करून...
गृहस्वामिनी आत गेलेली दिसली.

गुढीसमोर हसत खिदळतच आता रेंगाळत होत्या
शेजारच्या पोरीबरोबर टाईट जीन्स मधल्या 
आखूड शर्ट-टीशर्ट पांघरलेल्या तिच्या मैत्रिणी -
मुखातून 'आयला', 'भंकस', 'राडा' ...
नित्याचा जप कानावर चालू..

त्यांच्या "नमस्कारा"ची वाट पाहत ..
गुढीदेवता शांत चित्ताने उभी !

.... "कालाय तस्मै नम:" पुटपुटत 
आवाज न होऊ देता खिडकीची दारे 
मी हळूच लावून घेतली !
.

पाच चारोळ्या -

'कौतुक -'

बागेत उमलणाऱ्या फुलांचे कौतुक 
माझ्यासमोर करू नकोस उगाच -
बाग फुलते माझ्या मनातली 
तुझी चाहूल लागलेली असते तेव्हाच . .
.

'अतर्क्य -'

"अविवाहित" असतानाही 
"लग्न झाल्यासारखे" -
दुर्मुखलेल्या चेहऱ्याने
का वावरती सारखे सारखे !
.

'आयुष्य -'

अर्धे आयुष्य व्हाटसपात  
अर्धे आयुष्य फेसबुकात - 
उरलेच काय कुठे आता  
जगण्यासाठी आयुष्यात ..
.

'आठवणी  -'

असता दूरच्या प्रवासात मी 
चमचमली नभी एक चांदणी -
बस्स ! क्षण एकच पुरेसा तो 
दाटून आल्या तुझ्या आठवणी ..
.

'अनिवार्य -'

असो हिवाळा वा पावसाळा
तुझी सोबत सखे, अनिवार्य का -
गुलाबी थंडी वा चिंब भिजणे
आठवण होणे अनिवार्य का..
.

श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ ..

श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ .. 
तव स्मरणाविन अमुचे जीवन सगळे जाई व्यर्थ ..

होशी कारण तूच सुखाचे करत निवारण दु:खाचे 
सुखदु:खाच्या खेळामधला संकटत्राता तू सार्थ ..

'ब्रह्मराक्षस भित्यापाठी' म्हणती भक्त मुखावाटे 
'भिऊ नकोस मी पाठीशी' म्हणशी भक्ता तूच समर्थ ..

नव्हत्याचे होते तू करशी राव तू करशी रंकाला 
शरणागत भक्तावर होई कृपा जीवनी ये अर्थ ..

जीवन अपुरे पडेल आमचे महती तुझी गाता गाता 
उद्धार करावा स्वामी समर्था मनात आहे हा स्वार्थ ..
.

लयास गेले कधीच ते -

लयास गेले कधीच ते 
रामराज्य ह्या भूमीवरचे 
आता इथल्या रामातही 
काही उरला नाही राम ..

रावण पैदा झाले इथे 
सीताही जिकडे तिकडे 
वानरसेना बहुत जाहली 
म्हणती न कुणि राम राम ..

संकटात जरि असते सीता 
मदतीला कुणि धावत नाही 
आता इथल्या सीतेलाही 
शोधत नाही कुठला राम ..

महिमा कलीयुगाचा ऐसा 
मिळून राहती रावण राम 
सीता रडते धाय मोकलुन 
झाले सगळे नमक हराम ..
.

हत्ती आणि मुंगी

     एक मुंगी होती.
काळी कुळकुळीत आणि इवलीशी.
त्या इवल्याशा मुंगीने एक नियम ठरवला होता.
रोज साखरेचे तीन कण कुठून तरी आणून एका झाडाच्या ढोलीत जमा करायचे !

     एका हत्तीला ही गोष्ट समजली.
तो हसून मुंगीला म्हणाला-
 " मुंगीताई, अस आयत आणण्यात काय ग पराक्रम ?
आम्ही कस .. सगळ्या जंगलात हिंडून, सगळ्यांची दाणादाण उडवून, खरे जीवन जगतो.
तुझ्यासारखं आम्ही आयत खात बसलो तर, देव काय म्हणेल आम्हाला ? "

     प्रचंड हत्तीच्या तोंडून लाह्यासारखे फुटणारे एक एक शब्द ऐकून,
 बिचाऱ्या मुंगीला अतिशय वाईट वाटले ! 
आपले आकारमान- आपला पराक्रम- आपली गती- 
या सर्व गोष्टी रुबाबदार हत्तीच्या पुढे किती थिट्या पडतात, या जाणिवेने ती अतिशय बेचैन झाली.
 तथापि, आपल्या नित्यनियमात तिने चुकूनही कुसूर केली नाही.
ती रोज साखरेचे कण गोळा करतच राहिली. 

     असे होता होता बरीच वर्षे उलटली. 
मुंगीने गोळा केलेल्या साखरेच्या ढिगाने झाडाची ढोली भरत आली होती. 

     तो हत्ती मुद्दाम त्या झाडासमोरून जात असे. 
उपहासाने भलीमोठी गर्जना करत असे. 
मुंगीला त्याची सवय झाल्याने, ती निमूटपणे आपल्या कामात लक्ष देत असे !

     पावसाळ्याचे दिवस आले.
वादळी वारे सुरू झाले-
पाठोपाठ प्रचंड नाद करत पावसाच्या सरीवर सरी सरोवरात, जंगलात, नदीनाल्यात सर्वत्र कोसळू लागल्या.    

     एक महिनाभर प्रचंड वृष्टी झाली.
 जंगलातले सर्व प्राणी-पक्षी-मानव भयभीत झाले. 
अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टी मानवाला मिळेनाशा झाल्या.
 प्राण्यांना नुसते पाणी प्यायलाही निवांत वेळ मिळेना. 
आकाशातून धो धो पडणारे पाणी, जमिनीवर वाहते प्रवाह, 
यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले ! 

     शेवटी एकदाचा पाऊस थांबला !

     त्या प्रचंड वृक्षाखाली हत्ती आसऱ्यासाठी थांबला होता. 
हत्तीने मुंगीकडे पाहण्याचे टाळले ! 
मुंगीने साखरेच्या ढिगाकडे पाहिले.

 प्रचंड हत्ती व प्रचंड ढीग यात तिला तो हत्ती स्वत:हूनही चिमुकला भासू लागला !

ती इवलीशी मुंगी कुतूहलाने परमेश्वराच्या चमत्काराकडे पाहत होती. 
मुंगीने परमेश्वराचे आभार मानले.

'नुसते अवाढव्य शरीर देण्यापेक्षा, मला सदैव कार्यमग्न राहण्याचीच सद्बुद्धी दे -' 
अशी मुंगीने मोठ्या आवाजात प्रार्थना केली.

पावसामुळे तसूभरही हलू न शकणारा प्रचंड हत्ती भुकेने व्याकूळ झाला होता. 
मुंगीने त्याला साखर खायला सांगितली. 

हत्तीने मुंगीची क्षमा मागितली ! 
.

मी कोण -?

निडवणूक आहे साध्य माझे 
पैसा (-नं.२चा !) साधन माझे 

आदर्श माझा बगळा हा 
माझी नजर कावळ्याची पहा 

जनतेची मते मटकावतो
चमचेगिरीने खुर्ची पटकावतो 

साध्य साधतो सावधगिरीने 
आश्वासने उधळत स्वैर मुखाने 

समय कठीण जेव्हा येतो 
सर्वापासून चार हात दुरावतो 

येईल तुम्हाला खचितच घेरी
ही पाहता पुढे आलेली ढेरी 

पटली का ओळख आता तरी 
अहो ! मीच तर तुमचा  'पुढारी ' ..

.

मन माझे रमते

मन माझे रमते
तुझ्या नामस्मरणात
माहित असले जरी 
विठ्ठला, तुझ्या आधाराने
पडायचे प्रपंचात..

मन माझे रमते
गुलाबाच्या
फुलात
माहित असले जरी
येईल ना काही 
काट्याविना हातात ..

मन माझे रमते 
सभोवती नात्यागोत्यात 
माहित असले जरी
आणील कधीकाळी
मजला ते गोत्यात ..

मन माझे रमते
जप तप ध्यानात
माहित असले जरी
चुकायचे नाही
कधी निजकर्तव्यात..

मन माझे रमते
केतकीच्या बनात 
माहित असले जरी 
पडावे लागेल 
नागाच्या फणात ..

मन माझे रमते
विठ्ठलाच्या स्मरणात 
माहित असले जरी 
स्वार्थाचा जप 
होतो अंत:करणात ..
.
चंद्र खिडकीतून एकवार रात्री
गालावर तुझ्या झळकत गेला -
सगळा माझा वेळ रात्री 
तुझ्यावर जळफळण्यात गेला !

.

चंद्र पौर्णिमेचा पहावा
वाटला कधी नव्हे तो आज -
म्हणून मारली चक्कर 
दारावरून तिच्या मी आज ..
.

केवळ ती 'बायको' म्हणुनी-

"ए झाला का नाही ग डबा अजून..मला उशीर होतोय ना

ह्या घरात एक वस्तु जागेवर सापडेल तर शपथ

रुमाल कुठे दिसत नाहीय इथे कपाटात

त्या बुटात ठेवलेले मोजे अजूनही धुवायला टाकले नाहीस तू

इस्त्रीचे कपडे आलेच नाहीत का ग अजून

आज संध्याकाळी नक्की जाऊ हं बाहेर कुठेतरी बागेत/हॉटेलात

आधीच उशीर झालाय मला..

ह्या रविवारी खरच जाऊ तो सिनेमा पहायला

उद्या दोघेतिघे चहाला येणार आहेत.. कदाचित जेवायला थांबतीलही

म्हणजे गैरहजर असणारीच्या उखाळ्यापाखाळ्या काढणार म्हणा की,
तुम्ही दहाबाराजणी मिळून भिशीच्या नावाखाली आता -"

......................तू ...
माझी केवळ हक्क गाजवण्यापुरती कर्तव्यदक्ष "बायको" गृहित धरूनच -

माझ्याकडून आयुष्यात कधी दोन कौतुकाचे शब्द बोलणे झाले नाहीत तुला

मी आयुष्यातला एखादा तुझा हट्टही वेळेवर कधी पुरवला नाही

मी साधा चहाचा कपही आपुलकीने तुला कधी विचारला नाही..तू अंथरुणावर पडून असताना-

मी आपणहून हौस मौज करण्यात, कधीच पुढाकार घेतला नाही

मी तुला नेहमीच "दुय्यम/कमी" लेखण्यात "स्वत:ला मोठ्ठा" समजत आलो .......

आपल्या "दोघांचा संसार" समजून निमूटपणे हे सगळे सहन करू शकणाऱ्या तुला -

 "मी --मला --माझे " इतकेच विश्व समजणाऱ्या,
ह्या तुझ्या "उशीरा डोळे उघडलेल्या नवऱ्या"कडून -

 खास "महिला दिना"निमित्त लाख लाख शुभेच्छा !!!
.

महिला दिन -

दुष्काळी कामावरच्या 
दगड फोडणाऱ्या-

इमारत बांधणीच्या 
टोपल उचलणाऱ्या-

तान्ह्या पोरास 
झोळीत बांधणाऱ्या-

न्याहरीसाठी बळीराजाच्या 
भाकऱ्या बडवणाऱ्या-

भाकर वाढा माय 
लेकरासाठी ओरडणाऱ्या-

सिग्नल चौकात 
खेळणी फुगे विकणाऱ्या-

आणि .......

बसमधील आपली जागा 
ज्येष्ठांना न देणाऱ्या-

एसीत बसून 
हाशहुश्श करणाऱ्या-

कारमधे टेकून 
गॉगल घालणाऱ्या ...

समस्त महिला वर्गास 
आज सादर वंदन !
.

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी -


पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी 
सोडणार ना रंगविल्याविण नटखट तो गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला  
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी 
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील 
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल 
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील  
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील 
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी     
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..
.

नाव मोठे अन्

धपधप घालत पाठीत धपाटे 
बदडत होती निज पोराला 
चौकशीत मज माहित झाले 
नाम होते मातेचे.."मृदुला"

'बहिरा झालो पुरता मी रे '
व्यथा मित्राने सांगितली 
अखंड बडबड करते पत्नी 
नाम बयेचे जरी "अबोली"

थप्पड देत गाली पत्नीच्या 
अखेर त्याने काढला गळा 
'किटले कान बोलसी कर्कश' 
नाव ठेवले कुणी ग "मंजुळा " ?
.

हायकू

१)
पाऊस धुंद 
नित्याचे रडगाणे 
हताश बेणे

.

२)
दवमोती तो 
पात्यावर हिरवा 
तृप्त गारवा 

.

मी एक मूर्ख

काल गुरुवार.

नेहमीप्रमाणे साप्ताहिक वीजपुरवठा गुल्ल.

तासभर कागद पेनची झटापट.....
(माझ्यामते-) एक उत्कृष्ट अशी चारोळी लिहिली.

उत्साहाने पहिली वाचक म्हणून,
स्वैपाकघरातल्या कामात गुंतलेल्या बायकोपुढे कागद धरला.

फुशारकीने मी म्हणालो- 
"अग संगणक बंद असला, म्हणून काय झालं ..
डोक्यात कल्पना चालू आहेत ना ?
या कागदावर मी लिहिलेली..
ही बघ ताजी ताजी चारोळी.. 
वाच आधी !"

बायकोच ती ! 
मैत्रिणीसारखे न वाचता थोडच ,
"वा" "वा" "कित्ती छान" म्हणणार ती ?

हातात कागद धरून वरखाली फिरवत, 
बायको नाक मुरडत फिस्कारलीच- 
"शी शी ! काय पण अक्षर आहे ! 
अगदी उंदराचा पाय मांजराला लावल्यासारखं- 
एक अक्षर लागेल तर शपथ !"

मी बरा गप्प बसेन तिच्या फिस्कारण्यावर ..

ताड्कन उद्गारलो -
" आण तो कागद इकडे. 
अग, मूर्खातला मूर्खहि वाचू शकेल ती चारोळी -
मी दाखवतो ना तुला ती वाचून---"
.

अवघाची संसार


काय तर म्हणे... 
"आम्ही दोघांनी मिळून २५ वर्षे सुखाने संसार केला !"

कसं शक्य आहे हो हे ?

तुम्ही दोघ आपसात कधी विनाकारण भांडलात .....
मुळीच नाही .

दोघापैकी एकजण कधी रुसलय दुसऱ्यावर आजवर .......
कधीच नाही .

कधी बिन मिठाची भाजी, कच्चा भात, खारट आमटी ताटात पडली तुमच्या....
अजिबात नाही .

कधी चित्रपटाला किंवा नाटकाला जाण्यावरून भांडलात, रुसलात....
मुळीच नाही .

टीव्हीच्या रिमोटवरून भांडलात ....
कधीच नाही .

तुझी सासू अशी माझी सासू तशी......
 या विषयावर तरी वाद घातलाय का कधी..... 
अजिबात नाही .

मग "सुखाचा" म्हणजे-
नक्की कसा आणि- कशासाठी संसार केला हो ? 
.

धबधब्याचा आवाज


काल अचानक पावसाळा सुरू झाला -

बायकोला कुणीतरी शेजारणीने सांगितल -
"त्या अमक्या ठिकाणी धबधबा खूप छान दिसतो,
आणि विशेष म्हणजे त्याचा आवाजही चांगला एक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकूही येतो !"

झालं.... बायकोचे टुमणे माझ्यामागे सुरूच ..
'चला की हो तो भदभदा बघून येऊ ना !'

बायकोला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणारा नवरा,
कधी कुणी कुठे पाहिलाय का ?

धडपडत सकाळी जाऊन आलो.

धबधबा-कम-भदभदा छानच दिसला.

येताना बायकोने मला विचारले-
" काय हो, त्या भदभद्याचा आवाज कितीतरी दूरवर ऐकू येतो, 
म्हणाल्या होत्या ना शेजारच्या वैनी ? "

मी उत्तरलो-
" येत असेलही कदाचित ! 
पण तुझ्या बोलण्याच्या आवाजात-
आपल्याला तो जवळ असूनही..
कसा ऐकू येणार ! " 
.