हत्ती आणि मुंगी

     एक मुंगी होती.
काळी कुळकुळीत आणि इवलीशी.
त्या इवल्याशा मुंगीने एक नियम ठरवला होता.
रोज साखरेचे तीन कण कुठून तरी आणून एका झाडाच्या ढोलीत जमा करायचे !

     एका हत्तीला ही गोष्ट समजली.
तो हसून मुंगीला म्हणाला-
 " मुंगीताई, अस आयत आणण्यात काय ग पराक्रम ?
आम्ही कस .. सगळ्या जंगलात हिंडून, सगळ्यांची दाणादाण उडवून, खरे जीवन जगतो.
तुझ्यासारखं आम्ही आयत खात बसलो तर, देव काय म्हणेल आम्हाला ? "

     प्रचंड हत्तीच्या तोंडून लाह्यासारखे फुटणारे एक एक शब्द ऐकून,
 बिचाऱ्या मुंगीला अतिशय वाईट वाटले ! 
आपले आकारमान- आपला पराक्रम- आपली गती- 
या सर्व गोष्टी रुबाबदार हत्तीच्या पुढे किती थिट्या पडतात, या जाणिवेने ती अतिशय बेचैन झाली.
 तथापि, आपल्या नित्यनियमात तिने चुकूनही कुसूर केली नाही.
ती रोज साखरेचे कण गोळा करतच राहिली. 

     असे होता होता बरीच वर्षे उलटली. 
मुंगीने गोळा केलेल्या साखरेच्या ढिगाने झाडाची ढोली भरत आली होती. 

     तो हत्ती मुद्दाम त्या झाडासमोरून जात असे. 
उपहासाने भलीमोठी गर्जना करत असे. 
मुंगीला त्याची सवय झाल्याने, ती निमूटपणे आपल्या कामात लक्ष देत असे !

     पावसाळ्याचे दिवस आले.
वादळी वारे सुरू झाले-
पाठोपाठ प्रचंड नाद करत पावसाच्या सरीवर सरी सरोवरात, जंगलात, नदीनाल्यात सर्वत्र कोसळू लागल्या.    

     एक महिनाभर प्रचंड वृष्टी झाली.
 जंगलातले सर्व प्राणी-पक्षी-मानव भयभीत झाले. 
अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टी मानवाला मिळेनाशा झाल्या.
 प्राण्यांना नुसते पाणी प्यायलाही निवांत वेळ मिळेना. 
आकाशातून धो धो पडणारे पाणी, जमिनीवर वाहते प्रवाह, 
यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले ! 

     शेवटी एकदाचा पाऊस थांबला !

     त्या प्रचंड वृक्षाखाली हत्ती आसऱ्यासाठी थांबला होता. 
हत्तीने मुंगीकडे पाहण्याचे टाळले ! 
मुंगीने साखरेच्या ढिगाकडे पाहिले.

 प्रचंड हत्ती व प्रचंड ढीग यात तिला तो हत्ती स्वत:हूनही चिमुकला भासू लागला !

ती इवलीशी मुंगी कुतूहलाने परमेश्वराच्या चमत्काराकडे पाहत होती. 
मुंगीने परमेश्वराचे आभार मानले.

'नुसते अवाढव्य शरीर देण्यापेक्षा, मला सदैव कार्यमग्न राहण्याचीच सद्बुद्धी दे -' 
अशी मुंगीने मोठ्या आवाजात प्रार्थना केली.

पावसामुळे तसूभरही हलू न शकणारा प्रचंड हत्ती भुकेने व्याकूळ झाला होता. 
मुंगीने त्याला साखर खायला सांगितली. 

हत्तीने मुंगीची क्षमा मागितली ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा