जगामधे चौसष्ट कला अस्तित्वात आहेत, असे समजले जाते. कुणी तरी आपले डोके लढवून पासष्टावीही कला असल्याचा दावा करतो ! कुणीतरी दुसरा कशाला पाहिजे, मी स्वत:च दावा करतो की "चिकाटी" ही मनुष्याची पासष्टावी कला आहे !
उपरिर्निर्दिष्ट (काय, बरोबर लिहिला गेलाय ना शब्द !) चौसष्ट कला ह्या आत्मसात करून घ्याव्या लागतात. परंतु मी केलेल्या दाव्यातील 'चिकाटी' ही कला मनुष्याच्या जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत त्याला चिटकून (- का चिकटून !) असते.
मनुष्य जेव्हा लहान मूल म्हणून जन्माला येतो, तेव्हाच त्याच्या कलेचा जन्म झाला म्हणून समजा. 'आईला सोडून न राहणे' ही जी चिकाटी तो धरतो, ती आपणहोऊन तो कधीच सोडत नाही- एकवेळ आई त्यालाच सोडून जाईल ! लहान वयात आई त्याला इतरांचा लळा लावण्याचा 'यत्न हाच परमेश्वर' करील, परंतु तो मात्र इतरांची लाळ घोटत राहणे शक्य नाही ! त्याची चिकाटी मोठी दांडगी हं ! काऊ-चिऊ-खाऊच्या नादात तो आईला विसरेल- पण क्षणभरच ! पुन्हा आपले 'आsssई ' करून भोकाड का काय म्हणतात, तेच पसरणार तो !
आता 'चिकाटी' ही कला कशी काय असा प्रश्न आपल्यापुढे पडेल !
मनुष्य आपल्या अंगच्या गुणांना जे काही सोपस्कार घडवतो, त्यालाच आपण 'कला' असे म्हणतो . संगीत ही एक कला आहे. नृत्य ही दुसरी कला आहे. अशा ह्या ज्या काही चौसष्ट कला आहेत, त्या सर्वानी मिळूनच मनुष्य सर्वगुणसंपन्न होतो ना ! मग चिकाटी असण्याच्या कलेद्वारे मनुष्य आपल्या अंगचे गुणच उधळत नसतो काय ?
'चिकाटी' या कलेलाच निरनिराळी अभिधाने काल-स्थलानुसार प्राप्त होतात. लहान मुलांच्या 'चिकाटी'ला आपण 'हट्ट' म्हणून संबोधतो . 'हट्ट' म्हटले की आपल्याला रामाने चंद्रासाठी धरलेला हट्ट आठवतो. याचाच अर्थ असा की, 'चिकाटी' ही कला रामायणकालापासून अस्तित्वात आहे. ती काही नवीन नाही. तरीपण तुम्हाला कुणाला माहित नसल्याने मला आज ती 'पासष्टावी कला' म्हणून सांगण्याचा खटाटोप करावा लागत आहे ! असो- काळाच्या उदरात अशा अनेक गोष्टी गडप झाल्या आहेत (-जाऊन पहा हवे तर !) . धनुर्विद्या शिकण्याची 'चिकाटी' बाळ एकलव्याने धरून शेवटी आपला अंगठा कसा गमावला, ते सर्वश्रुतच आहे. अशी ही असामान्य कला प्रत्येकाजवळ असतेच. परंतु त्या कलेचा आविष्कार घडवणे हे 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'
असल्याने तिचे स्वरूप 'डिफरंट डिफरंट' तऱ्हेने आपल्याला जाणवते !
'अति तेथे माती' या कलेचे स्वरूप होऊ शकते. कारण चिकाटी बऱ्याच वेळेस अंगलट येते. एखादी सुंदर 'चपला' रस्त्याने चालताना दिसल्यास, चिकाटीने तिचा हव्यास धरला तर, तिने तिच्या सुरेख 'चपला' आपल्याला दाखवण्याचीच पाळी की हो !
कलेला काही मर्यादा असतात. तद्वतच चिकाटी ऊर्फ हट्ट ऊर्फ हव्यास ऊर्फ जिद्द ही मर्यादितच बरी दिसते ! एवढे मात्र खरे की या कलियुगात ह्या कलेला खूपच 'स्कोप' आहे. कारण बेकारीची कुऱ्हाड कोसळली म्हणून रडणाऱ्यापेक्षा, वशिल्याची जबरदस्त चिकाटी धरून ओरडणाऱ्याचीच आजकाल धडगत आहे ! महत्वाकांक्षा बाळगणाऱ्याच्या अंगी चिकाटी ही अगदी जाम भिनलेली असते- जणू काही 'भ्रष्टाचार निपटून काढू !' म्हणत हटून बसलेले उमेदवारच !
चिकाटी ही पैशासाठी, रूपासाठी, धान्यासाठी असते वा अन्य कुठल्याही कारणासाठी ती असू शकते ! 'चिक्कूपणा' हा पैशासाठी असलेला 'चिकाटी'चा एक पैलू ! 'स्वामीभक्ती' हा सेवानिष्ठ चाकराच्या चिकाटीचा एक पैलू ! 'उधळेपणा' ही नादान माणसाच्या चिकाटीची पराकोटीला पोहोचलेली अवस्था ! 'भगीरथ प्रयत्न' ही मनुष्याची प्रांजळ चिकाटी ! अशातऱ्हेने चिकाटी ही पैलूदार आहे. सोनार मुशीतून तापवलेल्या सोन्यास सांगितल्यावर हुकुमानुसार जसा आकार देतो, त्याप्रमाणे चिकाटी 'धरावी' तशी 'दाखवली' जाते !
पाच पाच वेळा एसएससीला बसण्याची चिकाटी धरून, नापास होणाऱ्यांची वाहवा करावी तेवढी थोडीच ! 'पुढच्या खेपेला तरी लॉटरीचे बक्षीस नक्कीच मिळेल'-अशी चिकाटी धरणाऱ्या पामरांची दु:खावस्था काय वर्णावी ! पुढल्या दाराने मते नाही मिळवली तरी मागल्या दाराने मते मिळवण्याची चिकाटी दाखवावी टी उमेदवारानेच ! एक धोरण फसले तरी बोध न घेता, सगळीच धोरणे फसवण्याची चिकाटी दाखवावी ती आपल्या 'माय-बाप' सरकारनेच ! बेसुमार भाववाढ झाली तरी मूग गिळून राहण्याच्या सामान्य भारतीय जनतेच्या चिकाटीला तर जगात कोठेच तोड नसेल ! मार-बोलणी खात पांडुरंगभक्तीत विलीन होण्याची चिकाटी धरावी ती संत तुकोबारायांनीच !
सारांश असा की 'चिकाटी' ही जी पासष्टावी कला आहे ती इतर सर्व चौसष्ट कलांच्याहीपेक्षा सरसच आहे. आत्मा आहे तर शरीर आहे, आत्म्यावाचून शरीर शून्य आहे ! याप्रमाणे ही पासष्टावी कला चांगली अवगत असेल तर, उरलेल्या सर्व कला सहज अवगत होतील. परंतु 'चिकाटीविना सर्व व्यर्थ' आहे .
मनुष्याचे निराशामय जीवन आशादायी बनवण्यास चिकाटी या कलेचा चांगला फायदा आहे ! आनंदी, उत्साही जीवनासाठी चिकाटी 'मस्ट' आहे ! ताटीवरून स्मशानात पोहोचलेला मनुष्यदेखील जगण्याच्या चिकाटीमुळे काहीवेळा घरी परतला आहे ! 'धीर धरी रे धीरापोटी, असती मोठी फळे गोमटी' हे चिकाटीचेच सार आहे.
चिकाटी धरली तर आपल्याला आज स्वस्त धान्य दुकानात माल मिळतो. चिकाटी धरली तरच, नको तिथले दारू-जुगाराचे अड्डे पोलिसांना सापडतात ! चिकाटीमुळे आपल्या सहनशीलतेचा अंतच कधी होणार नाही ! चिकाटी धराल तर तुमच्या पुढ्यातील रिकाम्या पेल्यात जगण्यासाठी अमृत मिळेल, चिकाटी सोडाल तर त्या पेल्यात भरण्यासाठी विषही मिळणार नाही !
भिंतीवर चढून जाळे विणण्याची 'एका कोळ्या'ची चिकाटी माहीत आहे ना ! तशी (- दुसऱ्याच्या हातातून पेपर घेऊन) माझा हा लेख वाचण्याची तुमची 'चिकाटी' खरोखरच दांडगी आहे हं !
.