चेहरा


               एक मनुष्य निवांतपणे ईश्वरनामाचा जप करत बसला होता. दुसऱ्या मनुष्याने त्याच्याजवळ येऊन विचारले- " बाबा रे ! तू उगाच का रडत बसला आहेस ? "  त्यावर पहिला स्वस्थपणे उत्तरला - " मी सध्या ईश्वरप्राप्तीच्या आनंदात धुंद झालो असतानाही तुला रडका वाटतो, यात तुझी काहीच चूक नाही ! त्या कर्त्या-करवित्याने घडवलेला माझा हा "चेहरा" तुला तसे भासण्यास कारणीभूत होत आहे ! "  

          -  तर सांगायचा मुद्दा हा आहे की, मनुष्याचा ' चेहरा ' ही त्याला मिळालेली देणगी आहे ! 'दिसतो तसा नसतो' असे म्हणण्याचा प्रघात या चेहऱ्यामुळे पडला असावा. परमेश्वर मोठा लबाड आहे ! स्वत:चा चेहरा निरनिराळ्या अवतारात निर्विकार ठेवून इतरांचे चेहरे खुलवण्यात तो मोठा वाकबगार आहे !

          मूल जन्मले की, एक नवा चेहरा पृथ्वीवर अस्तित्वात येतो. या एका चेहऱ्यामुळे साऱ्या सृष्टीचा चेहरा मोहरा बदलू पाहतो ! हसऱ्या चेहऱ्याचे मूल आनंदमयी सृष्टी निर्माण करते. मख्ख चेहऱ्याचे मूल सभोवतालच्या परिवारात नाना तर्क-वितर्क-कुतर्क निर्माण करते. रडक्या चेहऱ्याचे मूल आसपास खळबळ माजवते.

          मनुष्य 'चेहऱ्या'वर जगत असतो. चेहऱ्यावरून बऱ्याच वेळा त्याची पारख करण्यात येते. पण ती कित्येकवेळा चुकीची ठरते ! त्यामुळेच 'बिनचेह-या'चा अमिताभ बच्चनसारखा कलावंत धूमकेतूसारखा सिनेमाच्या पडद्यावर भाव मारून जातो.

          ओठाचा चंबू करणे, प्रश्नार्थक चेहरा, स्तंभित चेहरा, मुखस्तंभासारखा चेहरा, चिंताक्रांत चेहरा वगैरे चेहऱ्यांचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, मनुष्याचा चेहरा हा त्याच्या मनाची प्रतिक्रिया दर्शवतो !

          मुद्देमालासह चोर पकडला गेला की, त्याचा 'चेहरा पडतो'. मनुष्य खोटारडा ठरला की, तो 'चेहरा टाकतो'. प्रियकर व प्रेयसी एकांतस्थळी प्रणयाराधन करत असताना एखादा पेन्शनर तेथे नेमका टपकतो, त्यावेळी त्या युगुलाचा 'चेहरा फोटो काढण्यालायक' होतो ! दुष्काळात पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या की, शेतकऱ्याचा 'चेहरा हरखून' जातो. निवडणूक जवळ आल्यावर उमेदवारांचा 'चेहरा' मतदारांना भेटताना 'उजळतो '! तर निवडणूक संपताच मतदारापासून तो 'चेहरा काळा करतो !'

          'चेहऱ्या'वरून भविष्य सांगणारे ज्योतिषी असतात. स्वत:चा चेहरा कायम गंभीर ठेवून दुसऱ्यांचे चेहरे हर्षाने खुलवणारे विदूषक खरोखरचे कलाकार होय ! या उदाहरणावरून मनुष्य 'चेहऱ्या'वर जगतो, हे म्हणणे पटते ना ! पडद्यावरील कलाकार पडद्यामागे निराळ्याच भूमिका जगतात. तद्वतच मनुष्य 'भासणाऱ्या' चेहऱ्यापेक्षा अंतर्यामी वेगळाच असतो, हा विलक्षण विरोधाभास आहे !

          वर्गामधे मुखदुर्बळ भासणारा चेहरा, जेव्हा क्रीडांगणावर खेळात चमकतो, तेव्हा आपला चेहरा प्रश्नार्थक निश्चितच होतो. घरातील गरिबीची अवस्था हसऱ्या चेहऱ्याने लपवू पाहणाऱ्याचा प्रयत्न आपल्याच चेहऱ्याला बुचकळ्यात पाडतो. स्त्रीवरील अत्याचार पाहूनही 'चेहऱ्याची इस्त्री न बिघडवणारा' मनुष्यप्राणी पाहून आपला चेहरा उद्गारवाचक होतो !

          'चेहरा' हा जादूगार आहे. 'पुढारी'छाप चेहरा दिसला की, तेथे त्याचे पित्ते जमतात. आवडता हिरो पडद्यावर दिसला की, कॉलेजकन्यकांचे कौतुक करावे तरी किती ? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नुसता ओसंडून वाहताना दिसतो ! उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुट्टीत नको असणारा पाहुणा टपकला की, यजमानांचे  'सुतकी चेहरे' बघावेत !

          हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध वगैरे सर्व भावना चेहऱ्यावरून कळतात ! एकच चेहरा 'तो मी नव्हेच !'- असे सांगून लाखो लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो ! हा एकच चेहरा चलाखीने बहुरुप्याचे खेळ खेळतो !

          'चेहऱ्या'स किंमत आहे, महत्व आहे ! 'नवे चेहरे पाहिजेत !' - अशी जाहिरात देणाऱ्याचा सिनेमाविषयक गाढा अभ्यास असावा, असा आपला अंदाज असतो ! पण फसलेले 'भोळे चेहरे' जाळ्यात सापडताच, जाहिरात देणारा 'बिलंदर चेहरा' बेपत्ता होऊन जातो ! चेहरा पाहून केलेले आपले अंदाज वेधशाळेच्या हवामानाच्या अंदाजाइतकेच अचूक (?) असतात !

          आपला चेहरा 'प्रति मुमताज' आहे, असे समजून वागणारी टूनटूनसारखी तरुणी पाहून, आपण चकीत होतो. चांगल्या चेहऱ्याचे तरुण आपण 'राजेश' टाईप चेहऱ्याचे आहोत, असे समजून 'राजेंद्रनाथ' होऊन बसतात !  आपल्या चेहऱ्याचे महत्व आपणच ओळखले पाहिजे. आपले स्वत:चे असे अस्तित्व आपण आपल्या चेहऱ्याने दर्शवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धांजलीच्यावेळी 'सुतकी', आनंदप्रसंगी 'नाटकी', प्रवासप्रसंगी 'भटकी', गोंधळप्रसंगी 'झटकी' चेहरा ठेवण्यात, आपण निष्णात व्हायला पाहिजे ! "देश तसा वेश" परिधान करता आला पाहिजे ! 

          चेहऱ्याला महत्व आहे, म्हणूनच बाजारात सौंदर्यप्रसाधनांचा आज खप आहे ! चेहरा 'तजेलदार' बनवण्यास स्नो-पावडर, चेहरा 'गुळगुळीत' ठेवण्यास ब्लेड्स, चेहरा 'स्वच्छ' ठेवण्यास साबण, रुमाल वगैरे साधनांचा सर्रास वापर होतो . चेहऱ्याची शोभा वाढवण्यास केसांची वळणे, गालावरील कल्ले, मिशीचे कट, गुळगुळीत दाढी वगैरेंची मदत घ्यावी लागते.


          चेहऱ्यावरून कधी कधी माणसांची ओळख पटते. प्रवासात भेटलेल्या सोबत्यास आपण नंतरच्या भेटीत  बरेचवेळा म्हणतो, "तुमचा चेहरा मागे कधीतरी पाहिल्यासारखा वाटतो !" वास्तविक आपल्या मनात कितीतरी चेहऱ्यांचे ठसे आधीच उमटलेले असतात ! लांब दाढी-मिशात लपलेला चेहरा आपल्याला रवींद्रनाथांची आठवण करून देतो. इंचभर वाढलेली दाढी बुल्गानिनची आठवण करून देते. गालावर वाढलेले कल्ले व मानेवर स्त्रियांप्रमाणे वाढवलेले केस, या अवतारातील 'हिप्पी' पाहून, आपल्याला उगीचच जुन्या 'इन्सानियत'मधील 'झिप्पी'ची आठवण होते !

          चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून आहे ! 'बावळट' चेहरा 'कारकुना'चे व्यक्तिमत्व दर्शवतो. 'सुहास्यवदनी' चेहरा 'पुढारी' जातीचे प्रतिक आहे ! 'बिलंदर' चेहरा 'कामचुकार व्यक्ती'चे निदर्शक आहे ! 'प्रसन्न' चेहरा 'दिलखुलास' व्यक्तिमत्व दर्शवतो !

           चेहऱ्याशिवाय जीवन म्हणजे काचेशिवाय आरसा ! जीवन सुखमय घालवायचे असेल तर, आत्मस्तुतीचा चेहरा टाकून द्या, परस्तुतीचा चेहरा धारण करा ! सिनेमातील हिरो याच मार्गाने जाऊन सुखी होतो, त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात- "तेरा चांदसा चेहरा-" किंवा "चौदहवीका चांद हो तुम " वगैरे वगैरे !

          माणसाने चेहरा मिस्कील केला की समजावे- त्याला काहीतरी खुसखुशीत वाचायला मिळालेले आहे !    पण वाचकहो ! तुम्ही का चेहरा असा मिस्कील केला आहे ? तुम्ही खरोखरच हुषार आहात हं ! ( ही मी केलेली परस्तुती हं ) !

.                    
                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा