"भाव"- तोचि देव


        कोणत्याही वस्तूच्या रद्दीपासून ते थोर थोर पुढाऱ्यांच्या पी. ए. पर्यंत "भाव" या शब्दाचा राबता असतो. हा राबता 'टर्म बेसिस'वर असतो. तो कुणाजवळ किती काळ राहील ते सांगता येत नसते.नटीच्या नवऱ्याप्रमाणे तो बदलत असतो. रेशन दुकानात साखर आली आली म्हणेपर्यंत ती जशी एकाएकी लुप्त झालेली समजत नाही, तसे या 'भावा'चे आहे.

        उदाहरणासह ह्या भावाचा महिमा आपण पडताळून पाहू ! 'भाव खाण्या'संबंधी प्रथम चर्चा करता येईल.
"अरे बंड्या, लेका एक्झ्याम आठवड्यावर आलीय रे ! तुझ्या नोट्स दोन तासांकरताच दे ना !"
- इति बाळ्या नामक प्राणी.
" छे बुवा ! मला नाही जमणार ! माझी अजून पहिली रिव्हिजन देखील झाली नाही !"
- बंड्या या स्कॉलरने मित्रावर झाडलेल्या या दुगाण्या 'भाव'दर्शक आहेत ! हा भाव खाण्याचाच प्रकार आहे. शाळा-कॉलेजात ह्या भाव खाण्याची फार चटक असते. स्कॉलर-विद्यार्थी, कॉलेज-चँपिअन, कॉलेज-क्वीन, जनरल सेक्रेटरी या व्यक्ती भाव खाण्यात महशूर (का मशहूर?) असतात. काही 'हिरो' उन्हाळ्याच्या सुट्टीत सायंकाळी थिएटरच्या आसपास डोळ्यांवर गॉगल चढवून, अंगात चट्ट्यापट्ट्यांचा स्वेटर घालून, पायात (तळ नसलेले) बूट घालून भाव खाताना (दुसरे काही खावयास न मिळाल्याने) आढळतात.

        विशेष म्हणजे शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही 'हारी'ना भाव खाण्यासाठी आवडतो ! तो समस्त धर्म-जाती-पंथास खाता येतो. एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे की, भाव खाणाऱ्याला काही पथ्ये पाळावीच लागतात. प्रमुख पथ्य म्हणजे भाव प्रमाणातच खावा ! जास्त खाल्ला- तर उलटण्याची भीती असते. परवाच एका हिरोने एका तरुणीपुढे जास्त भाव खाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपचनामुळे स्वत:च्या गालावर तरुणीच्या पायातील एक चप्पल चोळून घ्यावी लागली !

        मित्र पाहून पैसे मागावे लागतात, तद्वतच प्रसंग पाहून भाव खाण्याची तयारी करावी लागते! भाव खाणारा दुसरा प्राणी म्हणजे प्यून उर्फ पट्टेवाला ! मग तो कुठलाही असो- जि.प.च्या शाळेचा वा सरकारी कार्यालयातील ! हा प्यून त्याच्यावर सोपवलेले काम कधीच पार पडत नसल्याने, खास 'भाव खाण्या'साठीच नेमलेला असतो, असा आमचा अंदाज आहे. या सर्व उदाहरणावरून तात्पर्य हेच की, 'भाव खाणे' म्हणजे चढून जाणे , घमेंडखोर बनणे, सांगितलेले काम न करणे !

        "साहेब, देव तुमचं भलं करील ! पोरंबाळं चांगली राहतील ! तुमच्यासारखा (पाप केलेला-) पुण्यात्मा कोणी नाही !" - इति रस्त्यावरचा भिकारी ! हा 'भाव देण्या'ची क्रिया दर्शवतो. भाव देणे म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, स्तुती करणे वगैरे  ! भाव देणारी व्यक्ती ही गरजवंत , प्रसंगी लाचार, स्वार्थी, आपमतलबी- तर कधी आवळा देऊन कोहळा काढणारी असते. भिकाऱ्याने भाव दिला की, त्याला पैसा मिळतो. घरमालकाला भाव दिला की, घर फुकटात दुरुस्त करून मिळते. सासरा जावयाला नेहमी भाव देतो- कारण तो त्याची कन्या सांभाळणारा असतो ! मंत्र्यांना भाव दिला की (निदान-) आश्वासन तरी मिळते.

        भाव दिल्यानंतर घडून येणारी क्रिया म्हणजे 'भाव चढणे!' भाव चढलेली व्यक्ती "माझ्यासारखा मीच!" असे छाती बडवून सांगणारी असते. 'हम करेसो कायदा!'- असे दंडा आपटून गर्जणारी आयुबखान टाईप मूर्ती भाव चढलेली असते. मदिरा प्राशन केल्यावर जशी ती चढते, त्याप्रमाणे कुणी दिलेला भाव खाल्ला की तो चढू लागतो !

        भाव चढण्याचे कारण पुष्कळदा 'पैसा' हे असू शकते. भाव चढलेला माणूस आपलेपणा विसरतो. माणसातील 'मी' हा 'मी' न राहता त्याला 'आम्ही'चे स्वरूप येते. पूर्वी सायकलकराचा बिल्ला तपासणारे कारकून, थिएटरातील डोअरकीपर्स, लॉटरीमुळे नशीब उघडलेला इसम वगैरे व्यक्ती भाव चढणाऱ्या म्हणून वानगीदाखल सांगता येतील !

        परंतु चढणारा नेहमी पडतोच ! घोड्यावर रडतराव चढल्यावर किती काळ बसू शकणार ? चढलेला भाव उतरणीला लागला की, माणसाचे डोळे फिरू लागतात ! भाव पडलेल्या वस्तू वा इसमाचे हालकुत्रा देखील खात नाही ! भाव चढणे ही क्रिया क्षणैक असते.

        अचानक घडून येणारी क्रिया म्हणजे 'भाव येणे !' सर्वांच्या आयुष्यात स्थित्यंतरे घडवून आणणारी ही क्रिया होय ! गरीब माणूस श्रीमंत होऊ लागला की, त्याला भाव येऊ लागतो ! शिकला सावरलेला मुलगा उपवधू झाला की. त्याला लग्नाच्या बाजारात भाव येतो. भाव येण्याची क्रिया सर्वत्र आढळते. कागदाच्या रद्दीलाही भाव आलेला आपण पाहतोच,  की नाही ? सोने-चांदी, कांदे-बटाटे यांच्यावरही भाव येण्या-जाण्याची क्रिया सतत चालू असते ! परीक्षेच्या आधी क्लासेस, गाईड्स यांना भाव विलक्षणच येतो ! भाव येण्याची क्रिया ही आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. एखाद्या महाराजास भाव येण्याची वेळ ही त्याच्याभोवती हिंडणाऱ्या भक्तगणांच्या भक्तिभावावर अवलंबून असते. रेशनिंगच्या काळात तांदळाइतकाच भाव खड्यांनाही येतो. माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव व अवयवाचे हावभाव त्याला मिळणाऱ्या भावाबरोबरच बदलत असतात !

        सर्वात वाईट प्रसंग असतो, तो भाव जाण्याचा ! हा प्रसंग बहुधा निवडणुकीत डिपॉझिट जप्त  झालेल्या उमेदवारावर येतो. बिचारा उमेदवार ! आपले सर्वस्व पणाला लावून तो निवडणुकीला उभा राहिलेला असतो. पाण्यासारखा (म्हणजे नक्की कसा?) पैसा खर्च करून शेवटी त्याला अपयश सदऱ्यात पाडून घ्यावे लागते ! हा हन्त हन्त ! समाजात त्याला कवडीमोलाचा भाव शिल्लक उरतो. निवडणुकीत निवडून येऊन भाव खाण्याऐवजी त्याला मूग गिळत रहावे लागते !
        शेवटी भाव असण्याबद्दल थोडेसे ! भाव असणे याचा अर्थ विशिष्ट दर्जा असते, प्रतिष्ठा असणे ! काही गोष्टींना निश्चित भाव असतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास- मंत्र्याची खुर्ची ! खुर्ची आहे तोपर्यंत मंत्र्याला भाव असतो ! जोवर एखाद्या देशाचे नेतेपद एका स्त्रीकडे असते, तोवर त्या देशात सर्व स्त्रियांना भाव असतो (वाचक भगिनी खूष हं !). इंटरव्ह्यूसाठी शिक्षणापेक्षा वशिल्याला जास्त भाव असतो ना ? सध्याच्या काळात गल्लाभरू चित्रपटाना भाव आहे, हे आपण पाहतोच (चित्रपट न पाहताही !).

        सर्वांनाच पटेल की, 'भावा'चा महिमा थोर आहे. प्रत्येकाजवळ थोडातरी भाव पाहिजेच ! कधी खाण्यासाठी तर कधी दुसऱ्याला देण्यासाठी ! आजकाल जळी,काष्ठी, पाषाणी, दुकानी, काळ्या बाजारात, सर्वत्र 'भाव' हिंडत असतो.                                      
        निवडणुकीत निवडून आलेला पुढारी हा एकपात्री भावाचे नाटक उत्तम करतो ! कसे ते पहा ! निवडणुकीआधी तो सर्व मतदारांना भाव देतो. मतदान होताना त्याचा भाव चढत जातो. निवडून येताच त्याला भाव येतो. भाव एकदा 'आला' की तो 'खाण्या'खेरीज त्याला गत्यंतरच नसते.

        म्हणून मनात सर्वांविषयी एक(च) भाव पाहिजे, नाहीतर- 'मनात नाही भाव, देवा मला पाव', हे कसे शक्य आहे ? म्हणून म्हणतो की, 'देव भावाचा भुकेला' व "भाव" तोचि देव !

        हा लेख छापून आल्याने, अस्मादिकानाही भाव आहे, असे वाटते ! नाहीतर हा लेख आधीच बाराच्या भावात ( - हा भाव केराच्या टोपलीत सापडतो हं !) गेला असता ना !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा