सिनेमा

        मातेच्या कडेवर बसणाऱ्या बाळापासून ते काठीचा आधार घेणाऱ्या वयोवृद्धापर्यंत 'सिनेमा' हे सर्वांचे आकर्षण असते ! ज्याने 'सिनेमा' ही चीज काय असते, हे माहित करून घेतले नाही, तो प्राणीमात्र त्याच्याइतकाच दुर्दैवी !

        मनुष्य एकवेळ ऑक्सिजनविना राहू शकेल, पण सिनेमाचा विरह अगदी अशक्यप्राय ! सिनेमा ही चैनीची बाब आहे. गरीब लोकांचा 'पिच्चर' पाहण्याकडे विशेष लळा असतो. वेळप्रसंगी उपास करतील पण सिनेमासाठी थोडी पुंजी ठेवतील ! मध्यम वर्गाचे तर 'सिनेमा' हे एक मनोरंजनाचे साधन आहे. समस्त कुटुंबपरिवारासह महिन्यातून एखादा सामाजिक वा कौटुंबिक सिनेमा पाहण्याचा त्यांचा सोहळा काय वर्णावा ? श्रीमंतवर्ग तर खर्चाचा भलताच शौकिन ! जास्त पैसा खर्चण्याचे त्यांना सिनेमा हे प्रभावी(!) साधन आहे.
       
        जनतेच्या हौसेला मोल नाही ! महागाई वाढली म्हणून संप होतो, मोर्चे निघतात, दंगली माजतात, निदर्शने केली जातात ! पगार पुरत नाही म्हणून संसारात भांडणे होतात ! चिल्लर नाही म्हणून बाजारात उगाचच आरडाओरडा होतो. 'अफू खायलाही दमडा नाही' 'बेकारी शिगेला पोहोचली आहे' - असा कंठशोष होतो ! या महागाईने पोळलेली, अपुऱ्या पगारात गुजराण न करू शकणारी, पैसा जमल्यावर अफू खाऊ इच्छिणारी 'बेकार' जनता- चिल्लर जमवून सिमेमा मात्र कशी पाहू शकते, या विचाराने परमेश्वरही रात्रंदिवस  हैराण होत असावा !

        सिनेमामुळे आपल्यावर चांगला परिणाम होतो, असा एक समज आहे. 'हरे राम हरे कृष्ण'  हा देवाबद्दलचा एखादा छान सिनेमा असेल असे वाटून, शेजारच्या बंडूच्या आजोबा-आजीनी तो चक्क चोरून पहिला होता. पण नंतर त्यांच्यावर 'हाय राम'म्हणण्याची पाळी आली ! 'नावात काय आहे' असे विचारणाऱ्या, एका माजी नाटककाराला हा आजोबा-आजीचा दाखला समर्पक वाटला असता !

        सिनेमामुळे रावाचा रंक होतो व रंकाचा राव होऊ शकतो. सिनेमावर 'माया' केल्याने मायाजालातच फसून, आपली 'माया' संपुष्टात येते, हे पूर्णपणे समजण्यास काया जीर्ण होऊन, वाया जाऊ द्यावी लागते !

        बाकी सिनेमाचे वर्चस्व भलतेच आहे हं आपल्यावर ! पैज लागली की, हार जीत सिनेमानेच ठरली जाते. प्रियकर-प्रेयसीना 'सिनेमा'चा अंधारच 'प्यारा' वाटतो ! थोडा पैसा हाती खेळताच शुभारंभ 'पहिल्या दिवशी पहिला खेळ' पाहून करावा वाटतो.

        सिनेमातील 'हिरो-हिरोईन-व्हिलन' आदि मंडळीवर तमाम जनतेचे प्रेम असते. जनता प्रत्येकात स्वत:ला 'त्यापैकीच कोणीतरी' समजून सुखाचे चार क्षण कंठत असते ! सिनेमातील हीरोचे हिरोईनसह रोमान्स पाहून जनता खूष होते. ह्या जनतेत बरेचसे 'पबलीक'च असते. हिरोची व्हिलनसह दण्णादण्णी  बघून पब्लिक आपसातच दणादण दणके देऊन थेटरात दाणादाण उडवते. असल्या गमतीदार 'शिणेमा'ने पब्लिक हसून हसून पोट दुखेपर्यंत लोळते. बिचाऱ्या पब्लिकला त्यामुळे शिनेमा सुटल्यावर, राष्ट्रगीताला मान द्यायचे भान राखायचे सुचत नाही ! शिनेमा खास जनतेसाठी गाजत असतो, तर राष्ट्रगीत फक्त सरकारी नियमासाठी वाजत असते !

        हल्ली सिनेमा म्हटला की तो 'हाउस फुल' असतो. तो तसा असला की समजावे, तिकीट विक्री काळ्या बाजाराने चालू आहे ! जनतेने उगाच लांबलचक रांगेत तिष्ठत उभे राहून तिकीट विकत घेण्यापेक्षा, चारच पैसे जास्त देऊन 'अधिकृत' काळाबाजारवाल्याकडून ते घेऊन, आपला अनमोल वेळ, त्रास वाचवावा, असा शुद्ध व प्रामाणिक हेतू थेटरमालकाचा त्यावेळी असावा !

        शिवाय रांगेत उभे राहिल्याने चेंगराचेंगरी होऊन माणसे मरतात, उन्हाने चक्कर येते, खिसे कापले जातात, स्त्रियांना धक्काबुक्की होते- हे सर्व टाळण्यासाठी व काळाबाजार करणारे तिकीट विकूनच जगतात, म्हणून त्यांच्या चरितार्थाची सोय होण्यासाठी 'सिनेमा'वाले सिनेमा लगेच 'हाउस फुल' करत असावेत !

        सिनेमात काम करून पडद्यावर चमकण्याचे कित्येकांचे ध्येय असते. ध्येयाविना आयुष्य म्हणजे खुर्चीशिवाय मंत्रीच की हो ! सिनेमा पाहिल्यावर शरीराच्या सर्वांवयाना व्यायाम मिळतो. सिनेमा रद्दी असेल तर खुर्च्यांवर खुर्च्या आदळून हाताचे स्नायू पिळदार बनण्याचा संभव असतो. खुर्च्यांची बैठक लाथेने थडाथड उडवून आपल्या 'जातभाई'ची आठवण काढता येते. अस्प्रो-अनासीन-अवेदन-अमृतांजन आदि औषधे अधिकाधिक आवडू लागतात ! घरी 'कुटुंबां'मुळे झोप येत नसेल तर चार पैसे टाकून सिनेमा पाहण्याच्या निमित्ताने तीन तास निवांत घोरत येते ! स्वत: खुर्चीवर बसून नवऱ्याना थेटराबाहेर पोरे सांभाळावयास लावण्याची, बायकांना 'सिनेमा' ही तर अपूर्व संधीच असते !

        सिनेमा चांगला असेल तर खूप लोक सिनेमा बघतात. मग सरकारलाही त्यामुळे खूपच 'करमणूक कर' मिळतो. अशा रीतीने सिनेमा काढणारे खूष, पाहणारे खूष, सरकारही खूष ! मग काय- त्या खुशीत चार काळा बाजारवालेही खूष केले गेले तर कुठे बिघडते ! त्यानी खुषीने 'खुषी' दिली की, बंदोबस्तवालेही खूष !

        सिनेमा हे जाहीरातीचेही प्रभावी साधन आहे ! पूर्वी लाल त्रिकोणाची, कुटुंबनियोजनाची जाहिरात किती कौशल्याने दिग्दर्शक करत होते ! (अंदरकी बात तुमच्या-आमच्यातच राहू द्या !). सिनेमाद्वारे लोकांना बोध मिळतो- 'डबड्या 'त जाऊन तमाशा पहावा, पण 'हाऊस फुल्ल'च्या सिनेमाला कधी जाऊ नये म्हणून ! सिनेमामुळे मनोरंजन होते- डोअरकीपर, सायकलस्टँडवाले व मध्यंतरात लुडबुड करणारे यांचे ! सिनेमा सुटल्यावर भसाड्या व खराब आवाजातल्या ध्वनीमुद्रिका ऐकवून व ते राष्ट्रगीत समजून पडद्यावर एखादा उलटा झेंडा दाखवणाऱ्या थेटरम्यानेजराचे कौतुक करावेसे वाटते !
.
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा