कालपर्यंत कितीतरी
खुषीत तू ठेवलेस -
बघता बघता देवा,
आज मात्र भुईत लोळवलेस . .
हिरवेगार शेत सारे
सोन्यासारखे पिकवलेस -
बघता बघता देवा,
सगळे का रे धुळीत मिळवलेस . .
का रे देवा आम्हाला
इतके तू छळलेस -
बघता बघता देवा,
पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . .
घ्यायचे होते सगळे परत
आधी इतके का दिलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला कफल्लक का केलेस . .
इतके दिवस तुझे
कौतुक करायला लावलेस -
बघता बघता देवा,
आता बोट मोडायला लावलेस . .
खेळ कसला जीवघेणा
पावसाला रे धाडलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला मातीमधे गाडलेस . . !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा