पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी -


पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी 
सोडणार ना रंगविल्याविण नटखट तो गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला  
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी 
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील 
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल 
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील  
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील 
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी     
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊनिया पिचकारी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा