' लहरी पावसा- '


असा कसा लहरी तू पावसा
अगदी लहरी तिच्यासारखा
कधीही येशी जाशी कधीही
सहवासाला मधेच पारखा ..

येशील वाटत असतो तेव्हा
दांडी मारशी कशी अचानक
थांबशील वाटते मला जर
कोसळशी तू किती भयानक ..

भिजून जाईन म्हणतो जेव्हा
मिठीत घेण्या तिजला आतुर
थेंब थेंब तू कसा टपकशी
थाप मारतो थातूर मातुर ..

वाट पाहतो तुझीच तेव्हा
सोबत असते सखी ती माझी
नसते जेव्हा ती मम सोबत
दाणादाण उडवशी माझी ..

ध्यानी ठेव तू बरे पावसा
ती येताना तू ये बरसत
ती भिजता क्षणभरही येथे
नकोस राहू तू रेंगाळत . .

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा