मला स्वत:ला देव आहे की नाही, ते अजूनपर्यंततरी माहित झाले नाही !
पण पेपर, मासिके, नियतकालिके, विशेषांक वगैरेंचे वाचन केल्यावर असे दिसून आले की-
देशात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात किंवा गल्लीत आणि घरात देवाच्या "अवतारात"ल्या एखाद्या "महाराजा"चा फोटो किंवा वावर आहेच !
कुठल्याही "महाराजा"बद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा आकर्षण नाही. आवर्जून पाया पडायला जावे, असे कुठल्याही महाराजाविषयी आजपर्यंत वाटलेले नाही.
त्या राष्ट्रसंतांबद्दल मात्र अतीव आदर वाटतो. ज्यांनी हातात झाडू घेऊन, रस्त्यावरच्या गोरगरीब जनतेत मिसळून, मनापासून सुधारणा करायचा प्रयत्न केला. माणसा-माणसातच देव कसा दडला आहे, हे तळमळीने सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्या कर्तव्यातच कसा देव आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला.... तेही उच्चासनावर गादीवर बसून नुसता मुखोपदेश न करता !
"आधी केले , मग सांगितले " ह्यामुळे त्या संतांबद्दल खूपकाही चांगलेसे मनात वाटत राहते . जे शहाणे आहेत त्यांनाच उपदेश करण्यात काय शहाणपणा ते मला कळत नाही, पण अडाण्यांना, निरक्षरांना शहाणे करण्यात खरी समाजसेवा, खरे समाजप्रबोधन नाही काय ?
जवळजवळ सर्वच तथाकथित महाराजांनी काही ना काहीतरी "चमत्कार" केलेले आहेत....वाचले आहेत. पण समाजात वावरून, मिळून मिसळून, गोरगरिबांसाठी काही केल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. गरीब भक्ताने हतबल झाल्यावर, अगतिक झाल्यावर त्याला शरण जायचे आणि मग त्याने भस्म विभूती गंडादोरा ताईत राख अंगारा असले काहीतरी देऊन भ्रमात वाटेला लावायचे ! आणि मग भक्तानेही त्याची आरती गात, त्याला ओवाळत धन्य धन्य मानून घ्यायचे ! विशेष म्हणजे कालांतराने दु:ख पुन्हा हजर आहेच घरात... ते मात्र महाराजाच्या मानसिक दडपणाने, भीतीने कुणी सांगतच नाही - हे जास्त घातक नाही का !
घरात बसूनच महाराजाची आळवणी केल्यामुळे, कुणाचा ताप उतरला एका रात्रीत, कुणाचा दुर्धर रोग ऑपरेशनआधीच गायब... असले प्रकारही वाचनात आले. महाराजावर इतका डोळे झाकून विश्वास ठेवावा म्हटले तर, ह्या विज्ञानयुगातल्या ज्ञानी आणि कार्यकुशल शल्यचिकीत्सकावर अविश्वास दाखवल्यासारखेच नाही का हो ?
महाराजापासून चार हात दूर आहे, कदाचित त्यामुळे मनात गोंधळ नाही . कठीण प्रसंगी कुणाच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायची गरजही आजवर पडलेली नाही.
घरातल्या उत्तम संस्कारामुळे चांगले बोलणे, वागणे आणि राहणे यात छान वेळ जातोय. आरोग्याविषयी तक्रार आल्यास कुठल्याही महाराजाला शरण जाण्याऐवजी, मी आवर्जून डॉक्टर कडेच आधी जातो. अडीअडचणीला मित्रांचा सल्ला, मदत घेतो आणि सुखात जगतो !
जे मनात आले, ते तुम्हाला सांगावे वाटले.
एखाद्या वेळेस- कधीतरी ,
तुमच्याही मनात असेच विचार आले असतील, कोण जाणे !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा