' लोका सांगे ..! '


कायदा तोडणाऱ्यांचे नेहमी वाभाडे मी काढत असतो
तंबाखूच्या तोबऱ्याची रस्त्यात पिचकारी मारत हसतो ..

घरासमोरची घाण काढायला मी कधी तयार नसतो
देशात होणाऱ्या कचऱ्याची आधीच उठाठेव करत बसतो ..

शेजाऱ्याचे क्षेमकुशल चुकूनही मी विचारत नसतो
पाक-इंडिया प्रेसिडेंटच्या भेटीची काळजी करत बसतो ..

देवळातल्या देवदर्शनाचे कष्ट कधीच घेत नसतो
देव जगात आहे सांगत तावातावाने गर्जत बसतो ..

उघड्यानागड्या नट्यांची चित्रे गुपचूप निरखत बसतो
अश्लीलतेविरुद्ध सोसायटीत जोरदार व्याख्यान देत असतो  ..

पाच मिनिटांच्या अंतरावरही बाईकशिवाय जात नाही
पेट्रोलवाढीवरच्या चर्चेत भाग घेतल्याशिवाय रहात नाही ..

भ्रष्टाचाराविरुद्ध सभेत नेहमीच जोरात कोकलत असतो
शंभर रुपये एजंटला देऊन घरपोच लायसन मागवत असतो ..

माझ्यामधलेच दोष जाणून मी कधीच सुधारणार नाही
तुमच्यामधले दोष जगजाहीर केल्याशिवाय राहणार नाही ..
.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा