राजस्थान ट्रीप


१)   आज दुपारी राजस्थानातील दिलवाडामधील "देलवाडा जैन श्वेतांबर मंदिर" पाहिले.
"तेजोमहाला"पेक्षा अप्रतिम, मनोहारी, नेत्रसुखद, अनुपम अशी भिँतीवरची, खांबावरची आणि छतावरची संगमरवरातली अवर्णनीय कोरीव नक्षीची कारागिरी पाहून थक्क झालो !

दुर्दैवाने कॅमेरा आणि मोबाईल मंदिरात नेऊ शकलो नाही . . !
( २१-०१-२०१४ )

.


२)   राजस्थानातील चालू पर्यटन दौ-यात पुष्कर गावाजवळच तीनचारशे पाय-या चढून, अर्जुनबाबाच्या प्रसन्न समाधीदर्शनप्रसंगी...
एका बाजूला काही वाद्ये दिसली. त्यात बाजाची पेटी दिसली ! का कुणास ठाऊक, पण मनात ती वाजवण्याची प्रबळ तीव्र जबरदस्त इच्छा झाली. शेवटी पुजा-याला भीत भीत विचारून, ती पेटी हाताळण्याची परवानगी घेतलीच ! 
मग पंधरा मिनिटे माझी अशी काही वादनसमाधी लागली, की बस्स !
ओम नमः शिवाय, दरशन देरे दे रे भगवंता, पायोजी मैने रामरतन धन पायो, मला हे दत्तगुरू दिसले . . 
ब-याच कालावधीनंतर मी स्वतःशीच देवाचिये द्वारी पेटीवादनाचा आनंद मनसोक्त लुटला !

पुजारीबाबाचे मनोमन आभार मानले. त्याच्याकडून
पेरू आणि बोरांचा प्रसाद घेऊन परतलो... 

एका वेगळ्याच समाधानात !

.

३)     "उंदीर मंदीर -"

इकडून उंदीर
तिकडून उंदीर 
वरून उंदीर 
खालून उंदीर 
बघावे तिकडे
उंदीरच उंदीर 
चपळ उंदीर 
सुस्त उंदीर
तुरुतुरु धावणारे उंदीर
गलेलठ्ठ उंदीर
मरतुकडे उंदीर . .

बाप रे !

अग आई ग !

आश्चर्योदगार...
भीतीयुक्त चीत्कार...

..... माणसांच्या, पशुपक्ष्यांच्या पायावरून, पायाखालून, समोरून, सुखेनैव, बिनधास्त वावरणारे, बागडणारे-
दहावीस नाही, पाचपन्नास नाही, शेकडो नाही, तर अक्षरशः हजारो उंदीर डोळ्यांसमोर दिसताना, आपण अगदी आपल्या तोंडात उंदीर घालून... सॉरी, बोट घालून थक्क होतो, अवाक होतो हो !

राजस्थानातल्या बीकानेर शहरापासून 35किमी अंतरावर असलेल्या, देशनोक नावाच्या गावातील, करणी माता या नावाने प्रसिद्ध देवीच्या देवळात काल पाहिलेल्या उंदरांचे हे वर मी लिहिलेले वर्णन आहे . 
कुणाचीही, कसलीही भीती, तमा न बाळगता ते उंदीर हिँडताना दिसत होते. त्यांच्याऐवजी, देवळात त्यांना पहायला येणारे काही लोकच बावचळून भितीने सैरावरा धावत होते ! 
देवळात भक्तानी निरनिराळ्या ठिकाणी परातीत ओतलेले
दूध ते उंदरांचे थवे, घोळके निर्भीडपणे तोंडाने चुटूचुटू पिताना पाहून खूपच मजा वाटत होती !
अशाप्रकारचे "उंदीर मंदीर" दुसरीकडे, माझ्यातरी पाहण्यात अद्याप आलेले नाही !

.  

४)    माऊंट अबू, अजमेर, पुष्कर, जयपूर (पिंक सिटी), सारिस्का अभयारण्य, बीकानेर, जैसलमेर(यलो सिटी), जोधपूर(ब्ल्यू सिटी) अशी प्रसिध्द शहरे पालथी घालून -
आमची १५ दिवसांची राजस्थानची ट्रीप एकदाची संपली.
"पधारो हमारो देस" असे काहीसे गात गात, डोक्यावरची राजस्थानी रंगबिरंगी पगडी उतरवून, आम्ही पुन्हा पक्की पुणेरी लालभडक पगडी चढवायला सज्ज जाहलो !

डोळे भरून त्या त्या शहरातली खरेदीस्थळे, कौतुकस्थळे, किल्ले, संग्रहालये, सरोवरे, बगीचे, महाराजांचे संगमरवरी/दगडी महाल, स्मशानभूमीतल्या संगमरवरी समाध्या याची देही याची डोळा जिवंतपणी डोळे भरून पाहिल्या !

वेळीअवेळी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी, आमच्या "फोटो काढण्यालायक चेहऱ्यांच्या छब्या " जमेल तिथे जमेल तशा, मोबाईल आणि क्यामेऱ्यात बंदिस्त केल्या. 

सकाळी नऊला हॉटेलातून निघताना (आधीच पैसे दिलेला फुकटचा-) 'कॉम्पलीमेंटरी नाश्ता' यथेच्छ हादडून, तीन वाजता भरपेट जेवण करत होतो. ( राजस्थानी थाळी, दाल बाटी चुर्मा वगैरे ).

संध्याकाळी "मॉर्निंग वॉक"साठी बायकांच्या शॉपिंगच्या निमित्ताने, आम्ही "प्रेक्षणीय स्थळे" पहात पहात, रात्री नऊला हलकासा आहार घेत होतो. 

आम्हा नवरेमंडळींची पैशांची पाकिटे जसजशी रिकामी होत होती, तसतशी बायकामंडळीची खरेदीची पिशवी फुगण्याचा "चमत्कार" हताशपणे पहात रहात होतो !

गाईडकडून जोधपूरच्या महाराजा तकतसिंहाच्या तब्बल तीस राण्यांचे कौतुक ऐकले...
आणि आपापल्या एकुलत्याएका "राणी"ला सांभाळता सांभाळता, दमछाक होणाऱ्या आमच्या "हैराणी"ने आम्हा नवरेमंडळींचे डोळे पाणावले की हो !

राजस्थानात सर्वकाही मनसोक्त पाहून झाले.
"उंटावरचे शहाणे" झालो. 
उघड्या जीपमधून डेझर्ट सफारी फेरी मारली.
बायकामंडळीनी कौतुकभरल्या नजरेने 'रिफ्यूजी' सिनेमात शूट केलेली, करीना कपूरने पाणी काढलेली विहीर पाणी...सॉरी... डोळे भरून पाहिली. 

सारिस्का अभयारण्यात एकूण नऊ "वाघ" हिंडत असल्याची,
पक्की खबरबातमी आम्हाला लागलेली होती....
पण आम्ही येणार असल्याची कुणकुण-
बहुधा त्या समस्त वाघमंडळीना आधीच लागलेली असल्याने , एकही बहाद्दर वाघ आम्हाला सामोरा आला नाही !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा