स्नेह फेसबुकातला -

माझे फेसबुक स्नेही । श्री विजयकुमार देशपांडे सर
लेखक । बालकवी । दोनोळीकार । चारोळीकार । विडंबनकार । ब्लॉगर

शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. शब्दांच्या सामर्थ्याबरोबरच शब्दांचं सौंदर्य आणि त्यामधला गर्भित मार्मिक अर्थ... या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे कविता आणि चारोळ्या... ! कमीतकमी शब्दात नेमकं आणि खूप काही सांगण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र म्हणजे दोनोळी (दोन ओळी) व चारोळी (चार ओळी).

आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला, ज्यांची झोळी पुरेपूर भरलेली आहे शब्दसुमनांनी आणि दरवळतो आहे त्या सुमनांचा सुगंध दाहीदिशांनी... ! भारतीय स्टेट बँकेच्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले बँक अधिकारी, प्रसिद्ध कवी, लेखक आणि चारोळीकार श्री विजयकुमार देशपांडे, हे त्यांचं नाव. ६ ऑक्टोबर १९४६ साली जन्मलेले श्री देशपांडे यांनी सोलापूरच्या हरिभाई देवकरण आणि संगमेश्वर महाविद्यालय येथे आपलं शिक्षण पूर्ण करून १९७० मध्ये भारतीय स्टेट बँकेत रुजू झाले. १९७० ते २००६ हा त्यांचा बँकेतला मोठा कार्यकाल. 'ग्राहक हेच इश्वर' या भावनेतून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची मनोभावे सेवा केली. श्री देशपांडे सरांनी पदवी घेतली विज्ञान शाखेची, नोकरी केली वाणिज्य शाखेची आणि छंद जोपासला कला शाखेची. तीन वेगळ्या शाखांचा हा त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल.

यांच्या फेवरेट कोटमध्ये "मी चांगला तर जग चांगले" असं लिहिलेलं आहे. या पाच शब्दांमध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे, हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. संपूर्ण जीवनाचं सार त्यांनी या मोजक्या शब्दात सांगितलेलं आहे. यालाच म्हणतात... शब्दसामर्थ्य, शब्दसौंदर्य !

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. अनेक प्रसंग समोरून जातात. या गोष्टींकडे, या घटनांकडे डोळसपणे पाहण्याची अनेकांना सवय असते. विजयकुमार देशपांडे हे यापैकीच. व्यक्त होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्री देशपांडे यांनी त्यांच्या नजरेला पडलेल्या अनेक गोष्टींवर योग्य विचार करून शब्दांच्या माध्यमातून वेळोवेळी 'व्यक्त' होत राहिले आणि यातूनच त्यांच्या साहित्याची निर्मिती होत गेली. प्रिंट मेडिया सोबतच त्यांचं 'फेसबुक' वर 'व्यक्त' होणं जास्ती भावतं, कारण अशाप्रकारचं साहित्य, लिखाण ज्यामुळं लाखोंच्या संख्येनी असलेल्या 'फेसबुककरांना' जीवनाची दिशा मिळून जाते. फेसबुकवरचं लेखन पाहून आकाशवाणीचे तत्कालीन नैमित्तिक निवेदक ज्यांना आम्ही 'आवाजाचे जादूगार' असं म्हणतो ते विद्यमान नगरसेवक, पर्यावरणप्रेमी श्री गुरूशांत धुत्तरगावकर सरांनी आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वप्रथम दाद दिली. फेसबुकवरच्या अमाप लेखनाचं श्रेयही ते नम्रपणे गुरुदादांना देतात.

श्री देशपांडे यांच्या आईसाहेबांनी नुकतंच ९२ व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. त्यांना उगवत्या सूर्याबरोबर वाचायला वर्तमानपत्रे लागतात. वाचनाची ही शिदोरी, हे संस्कार आईकडूनच त्यांना मिळालेली आहे. वयाची एकाहत्तरी ओलांडलेले श्री देशपांडे आजही तरुण आहेत. वाढणाऱ्या वयावर आपला अंकुश नाही, पण आपल्या मनाचं वय मात्र आपण ठरवू शकतो, मनाला कायम तरुणावस्थेत ठेऊ शकतो, हेच खरे. अतिशय विनम्र स्वभाव, प्रचंड मितभाषी आणि 'मी कोणीही नाही', 'मी काहीच केलेलं नाही' अशाप्रकारची अत्यंत दुर्मिळ अशी भावना त्यांच्याकडे आहे. कोणी कौतुक केलेलंही त्यांना आवडत नाही.

शेतामध्ये दिवसरात्र कष्ट करून आपल्या घामाच्या धारेतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा सांगणारी त्यांची एक चारोळी.....
'पाऊस नाही शेतात
वाढते माझी हैराणी
कसे पुरावे शेताला
डोळ्यांमधले पाणी'

खूप मोठया शहरांमधे दिसणारे 'तोकडे' कपडे आपण सारेच जण पाहतो. पण हा विषय कसा मांडावा, काय लिहावे, कसे लिहावे या विचारात अनेक मोठे लेख लिहून मी माझ्या जवळच ठेवले. लिहिणे योग्य आहे का वगैरे विचार मनात आले. पण हे वास्तव नेमक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे.....
ठरते गरीब पोरगी "भिकारी"
का हो फाटक्या कपडयातली
फिरते ललना "फॅशनातली"
तोकडया फाटक्या वस्त्रातली...

हे वास्तव मांडतानाच 'गिधाड' नावाच्या त्यांच्या चारोळीतून महिलावर्गाला ते सावधही करतात ....
'ओढणीला जपून पोरी
अंगावर ठेव ग जरा -
क्षणात फिरती अवतीभवती
वखवखत्या नजरा ..'

मानवाच्या आरोग्यसाठी 'योग्य आहार' किती महत्वाचा आहे, हे सांगणाऱ्या आणि आधुनिकतेच्या आणि जिभेच्या आहारी जाऊन घरातलं पारंपारिक पौष्टिक आहाराला विसरत जाणाऱ्यांसाठी या दोनोळी....
'पिझ्झा नि बर्गराचे सारेच गान गाती
मी नेहमी भुकेला खाण्या दही धपाटे..'

जीवनामध्ये 'शिस्त' हवी. शिस्तीतल्या जीवनाचं एक वेगळंच सौंदर्य आहे. एका रेषेत जाणाऱ्या मुंग्यांकडे पाहून माणसाच्या बेशिस्तीवर प्रहार करणारी ही त्यांची चारोळी....
'न्याहाळतो मी सावकाशपणे
शिस्तीत जाणाऱ्या मुंग्यांची रांग
बघत बसतो हताशपणे
बेशिस्तीतल्या माणसांची रांग !'

आपल्या म्हणजे माणसाच्या आणखी एका स्वभावदोषावर श्री देशपांडे यांनी नेमकं बोट ठेवलंय.....
'दोषच शोधत बसाल जर
मित्रांच्याही स्वभावातला
तर लागणार नाही वेळ
शत्रूंची पैदास व्हायला ।'

श्री विजयकुमार देशपांडे यांच्या लेखणीमधे परखडत, मार्मिकता आहे. या सोबतच त्यांच्याकडे 'विनोदबुद्धी' आहे, मिश्कीलता आहे. विशेषकरून त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या अर्धांगिनीवरच्या चारोळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या पतीच्या मिश्किलतेला पूर्णपणे स्वीकारलेल्या वाहिनीसाहेब देखील तितक्याच कौतुकाला पात्र आहेत. यांच्या प्रत्येक चारोळीच्या बहुदा त्या पहिल्या 'वाचक' असतील.
बायको माहेरी गेली की,
माझ्या अंगावर काटा येतो.
सासरी असली की गुलाब बहरतो,
हे वेगळे सांगायलाच हवे काय !

व्हावे तू राधा मी कृष्ण मनी नेहमी वाटत असते
आठवता पण घरची रुक्मिणी मनोरथाला वेसण बसते..

आपल्या अर्धांगिनीसोबत प्रतिसृष्टी निर्माण करण्याची त्यांची संकल्पना....
'आण चांदणी तू तिकडून
आणतो चंद्र मी इकडून
करू निर्मिती गगनाची
स्वतंत्र आपण दोघे मिळून... '

'चांदोबाचा दिवा' या बालकविता संग्रहामधल्या एका कवितेतल्या या सुंदर ओळी .....
बागेमधली विविध फुले
रांगांमधुनी कशी बहरती
रंग लेऊनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती !

अशा असंख्य चारोळ्या, कविता, हायकू श्री देशपांडे यांनी तयार केलेली आहेत. त्यांचं हे समृध्द साहित्याचं वाचन करणं केवळ आवश्यकच नाही तर ते आपल्या साऱ्यांचं कर्तव्य आहे, असं मी समजतो. श्री देशपांडे हे 'बँक अधिकारी' म्हणून निवृत्त झाले असले तरी ते विधायक विचारातून मुक्तपणे 'शब्दघन' बरसविणारे एक 'आदर्श समाज शिक्षक'च आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.चारोळ्या, हायकू या सोबतच ते तितक्याच नावीन्याने वात्रटिका, भक्तिगीते, विडंबने, विनोदी किस्से, ललित लेख लिहिण्याचा त्यांच्या प्रपंच सुरूच आहे. त्यांचे हे वैविध्यपूर्ण साहित्य सोलापूर संचार, समाचार, विश्वसमाचार, केसरी या वर्तमानपत्रांमधून आणि अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. पुणे आकाशवाणीवरून त्यांनी बालकवितेचं वाचन केलेलं आहे. सोलापूर आकाशवाणीने त्यांच्या लेखनाची वेळोवेळी दखल घेतलेली आहे.

@ आदर्श - रसिक वाचक

@ आवड -लिखाण, वाचन, संगीत ऐकणे आणि वाजवणे, मनसोक्त चालत राहणे.
@ प्रकाशित पुस्तके - 'चांदोबाचा दिवा' - बाल कविता संग्रह - (दोन आवृत्या), 'सखे तुझ्यासाठी' - चारोळी संग्रह - (दोन आवृत्या)

@ ब्लॉग - 'लेखन प्रपंच' - https://mee-videsh.blogspot.com/

माझ्या या लेखनाला विराम देण्यापूर्वी त्यांचा हा 'मनोदीप' जो आपल्या प्रत्येकासाठी आहे.......
'नीट पेटवा दीप मनाचा
येऊ द्या शुभ्र प्रकाशाला -
साठवत राहू नका मुळीच
अविचारांच्या काजळीला ..'

स्वतःची ओळख करून देताना अतिशय नम्रपणे... "किंचित लेखक आणि थोडाफार कवी" असं म्हणणारे श्री विजयकुमार देशपांडे सरांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची सारी स्वप्ने, संकल्प लवकरच साकार होवो, याच शुभेच्छांसह .... !

- अरविंद सिद्धेश्वर म्हेत्रे
९८८१५५०२००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा