बर्याच वर्षानी, परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. सकाळची वेळ असल्याने, नित्रमहाशय देवपूजेत मग्न होते. मी दिवाणखान्यात स्थानापन्न झालो. सहज मेजाकडे नजर टाकली. म्हटल, एखादा पेपर वाचायला मिळतो का ते पहावे. आश्चर्य म्हणजे, एक नव्हे तर दहाबारा वृत्तपत्रे (-आणि तीही ताजी !) तेथे विराजमान झालेली दिसली ! मी चाट पडून खाली पडणार होतो, पण वेळीच सावरून बसलो !
माझ्या मित्राबद्दल आदर द्विगुणीत झाला होता. पण नंतर त्याच्याकडूनच कळले की, ही सगळी हपीसातली वृत्तपत्रे आहेत म्हणून ! तो म्हणाला- "पेपरवाला आधी ती सगळी माझ्या घरी टाकतो व ती सर्व वाचून मी हपीसात नेतो ! " पण काहीही असो- त्याला वृत्तपत्र वाचण्याची जबरदस्त आवड आहे, एवढे मात्र खरे. वृत्तपत्र वाचणे, ही माणसाची दैनिक भूक आहे ! ती भागल्याखेरीज त्याला चैन पडत नसते. झोपेतून सकाळी उठल्याबरोबर, सर्व विधी आटोपल्यावर, एका हातातल्या चहाच्या कपाबरोबर त्याला दुसऱ्या हातात पाहिजे असते ते "वर्तमानपत्र"- बिस्कीट नसले तरी चालते !
आमच्या शेजारच्या बंडोपंताना वर्तमानपत्राचे आणि झोपेचे फार वेड आहे. त्याना झोपेतून उठवलेले अजिबात चालत नाही, तसे झाले तर ते रौद्र रूप धारण करतात ! अशावेळी सौ. बंडोपंत एक नामी शक्कल लढवतात. बंडोपंतांची झोपमोड झाली, तर लगेच त्या मुकाट्याने बंडोपंतांच्या समोर "दैनिक माशामार"चा अंक धरून उभ्या रहातात ! खलास- बंडोपंत सौ.ला कौतुकाने शाबासकी देत, सुहास्यमुद्रेने तो दिवस हसतमुखाने पार पाडतात !
वृत्तपत्राची किमयाच न्यारी आहे ! प्रत्येक घरात एखादे "वर्तमानपत्र" असणे, हे त्या घराची प्रतिष्ठेची बाब बनली आहे ! ते त्या घराबद्दलचे आदराचे लक्षण होते ! भले मग ते कुणी वाचत असो, वा नसो ! गमभन शिकणार्या शेंबडया बालकापासून ते (-वेळप्रसंगी दुसर्याची चाळशी घेऊन वाचणा-या) म्हाताऱ्यापर्यंत सर्वाना आवडत असते- ते "वर्तमानपत्र" !
वर्तमानपत्र म्हणजे एकप्रकारचे "शोभादर्शक"आहे ! त्याच्या प्रत्येक पानगाणिक प्रत्येकाची आवड फिरू लागते ! एखाद्याला चित्रपटाच्या जाहिरातीचे पान आवडते, तर एखाद्याला नुसत्या जाहिराती वाचण्याची आवड असते. मनोरंजन-पुरवणी एखाद्याला आवडते, तर एखाद्याला व्यंगचित्राचे पान आवडते. काही शौकिन "शुभराशी"चे आकडे पहात रहातात, तर काही आपले भविष्य काय आहे, ते कुतूहलाने चाळतात !
काहीजणांचे वर्तमानपत्र-वाचन म्हणजे भराभर ठळक मथळे वाचत सुटणे. या शहाण्यांचा पाच मिनिटात पाच पानांचा फडशा पाडून होतो. पण दोन तासानी, आपण एखाद्या ताज्या बातमीची चर्चा केली, तर "अरेच्चा, ती बातमी कशी काय वाचली नाही बुवा मी !" असे आपल्यालाच हे शहाणे उलट विचारतात !
काही महाभाग पेपरवरच्या उजव्या-डाव्या चौकटीपासून, ते पार शेवटच्या पानावर खाली असलेल्या प्रकाशन स्थळापर्यंत- डोके खूपसून बसतात ! या व्यक्ती दोनचार तास खपून "एक रूपया-एक अंक टाईप मोबदला" मिळण्यासाठी मुद्राराक्षसाचे विनोद/उपसंपदकांच्या डुलक्या शोधत बसतात ! पण त्या निमित्ताने, त्यांच्या "कौन बनेगा करोडपती"विषयक ज्ञानात भर पडत असते खरी ! केव्हाही काहीही विचारा- उत्तर पटकन तयारच असते !
"वर्तमानपत्र" काढणारा खराच धाडसी असतो ! आपल्या पेपरच्या कीर्तीचे शिखर आणि अपकीर्तीची दरी- यामधला तोल त्याला डोंबा-यापेक्षा जास्त कुशलतेने संभाळायचा असतो ! कधी तोट्यात, तर कधी फायद्यात, असा 'कभी खुशी कभी गम'चा त्याचा व्यवहार चालू असतो! बहुधा खुशीत हा धंदा चालत असावा !
गल्लोगल्लीत आपापल्या व्यथा चव्हाट्यावर मांडणारी पत्रलेखकाची एक वेगळीच जात असते. गावातला व्यापार वाढवू इच्छीणारी जाहिरातदार व्यापारीमंडळी असतात. डोक्याला खुराक देणारी कोडी बनवणारी मंडळी असतात. आपला वर्तमानकाळ भूतकाळात दडवून, दुसऱ्यासाठी "साप्ताहिक" "मासिक" रेडीमेड भविष्य तयार करणारे ज्योतिषी असतात ! आकडेमोड करून उजळणीत पारंगत होणारे 'मटका-राजे' असतात !
स्त्रीला "चालतेबोलते वर्तमानपत्र" समजले जाते ! ह्या स्त्रीलादेखील वर्तमानपत्रातला 'महिला विभाग' डोळ्याखालून घातल्याशिवाय (आजचा नवीन पदार्थ- पाकक्रिया) तोंडातला घास घशाखाली उतरत नसतो !
वर्तमानपत्राचा उपयोग म्हणजे "वाचन" इतकाच नसतो ! ते अष्टपैलू असते. किराणा दुकानातली रद्दी म्हणून आपण पैसे मिळवतो. तर किराणादुकानदार माल देण्यासाठी याच्याच कागदांचा उपयोग करतो. प्लास्टिकवर बंदी असल्याने वर्तमानपत्राच्या पाकिटाना मागणी आहे ! बागेजवळ भेळपुडा म्हणून याचे तुकडे वापरतात. वेण्या,गजरे,फुले-विक्रेते वर्तमानपत्राचे तुकडे गुंडाळून, ते सुवासिक बनवून देतात. विशिष्ट ऋतूत डास,माशा,चिलटे मारण्यासाठी याचा उपयोग होतो ! काहीतरी चाळा म्हणूनही आपण बसल्याबसल्या त्याच्या घड्या घालतो, पुन्हा उलगडतोच- असे हे 'करमणुकीचे साधन' बनते ! काम न करता दमल्यामुळे येणारा घाम घालवण्यासाठी, वारा घेण्यासाठी आपण वर्तमानपत्राचीच घडी- 'पंखा' म्हणून- वापरतो ना ? हॉटेलात बसून, 'पन्नास पैशाचा चहा आणि जोडीला फुकटात वाचायला पेपर' असा दुहेरी फायदा करून घेणारे चेंगट दिसतात. सहलीत आणि प्रवासात खाद्यपदार्थाना आधार वर्तमानपत्रच देत नाही काय ?
दूरच्या प्रवासात, एकमेकांचा परिचय करून घेण्याचे "वर्तमानपत्र" हे एक उत्तम साधन आहे, हे अनुभवाने कळते ! आपण यष्टीत आणि रेल्वेमधे आरक्षण त्याच्या मदतीने करू शकतो- वर्तमानपत्र ठेवून जागा पकडून ! बऱ्याचवेळेला आपल्या ध्यानात तारीख,वार,महिना रहात नाही. अशावेळी वर्तमानपत्र आपल्या मदतीस धावते !
वर्तमानपत्र आणि वाचक यांचे अतूट नाते आहे. ते परस्परावलंबी आहेत. वाचकावर त्याचे जीवन अवलंबून आहे, तर त्याचा उपयोग केल्याखेरीज वाचकाला चैन पडत नाही ! अडल्या-नडल्या वाचकाला त्यातूनच एखादी वहिनी "फुकटचा सल्ला" देत असते. काही विवाहित जोडप्यांना त्यात घटस्फोटाची 'जाहीर नोटीस' देऊन आपले भावी जीवन सुखी बनवता येते ! बेरोजगाराना "पाहिजेत"च्या जाहिराती आशेचे किरण दाखवतात. जुन्यापुराण्या वस्तूना "जाहीर लिलावाच्या" जाहिरातीतून दाद मिळते. नवोदित वकिलाना 'जाहीर नोटीस' हा आधारस्तंभ असतो ! "बाजार भावा"वर नजर फिरवताच कुणाला किती भाव आहे, ते समजते ! वर्तमानपत्र जाहिरातीवर जगते, तर जाहिरातदार जाहिरातीवर जगतात !
"वर्तमानपत्र" हे एक प्रकारचे मधमाशाचे पोळ आहे. वाचकरूपी मधमाशा त्यातील मधावर सदैव टपलेल्या असतात ! ज्याला हवा तो अन् हवा तेवढा मध वाचक चाखू शकतो ! वर्तमानपत्र वाचकाला जिवंत ठेवते. दैनंदिन ताज्या बातम्या पुरवून, त्याचे ज्ञान वाढवते ! "सुविचार" वाचायला लावून- त्याचे मन सुसंस्कारित, शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करते !
जीवन जिवंत ठेवणारे माध्यम म्हणजे "वर्तमानपत्र"! एकाचे विचार दुसऱ्याला, तर दुसर्याचे विचार जगाला पोचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे.
जीवनात सोबतीला कुत्र, संसारात कलत्र, शपथेला तुळशीपत्र आणि वाचकाला "वर्तमानपत्र" हवेच !
.
agadi barobar
उत्तर द्याहटवासंध्या,
हटवाप्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार .
mastach
उत्तर द्याहटवाअनामित,
हटवाप्रतिसादाने हुरूप वाढतोच.
मन:पूर्वक धन्यवाद .
mast sir
उत्तर द्याहटवाशरद,
हटवाआनंद वाढला.
दाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार !
khup chaan
उत्तर द्याहटवाअक्षय -
उत्तर द्याहटवाआनंद वाढला !