संस्कृतमधे "आळस माणसाचा शत्रू आहे !" अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. पण मला तरी ते अजिबात पाटलेले नाही ! इतर काही न करता, केवळ एका जागी बसल्यानेच वाल्याचा वाल्मिकी झाला ना ?त्याच्या आळसामुळेच आज आपण रामायण शिरोधार्य मानत आहोत !
सर्वांना स्वर्गसुख मिळते ते रविवारी- म्हणजे सुट्टीच्या दिवशी ! रविवार हा तर आळश्यांचा वार ! अतिउत्साही लोकही याची मौज लुटतात. सरकार-दरबारलाही आळस येत असतो, म्हणून खास आळसाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सुट्टीचा वार ! शाळेला, न्यायालयाला, कचेरीला, आणि कामाला सुट्टी !
ठराविक वेळेस ठराविक काम करणर्यास "आळस" म्हणजे एक पर्वणी ! कचेरीतला कर्मचारीवर्ग आठवडाभर काम न केल्यामुळे दमलेला असतो. त्या कामाचा शीण ते रविवारी आळसात घालवतात. आळसामुळे सकाळची झोप जास्त मिळते. पुरुषवर्गाचा दाढीवरून हात फिरवायचा वाचतो ! तर गृहिणीना स्वैपाक उशीरा केला तर चालतो. मुलाना तर अभ्यासात आळस , कामात आळस, त्यामुळे खेळायला उत्तम संधी !
आम्ही भारतीय लोक आदरातिथ्याबद्द्ल भलतेच प्रसिद्ध ! या आदरातिथ्याला आमच्या आळसाची जोड मिळते. मग आम्ही सासुरवाडीला पळतो. पाहुणचार झोडतो. सुस्तावतो आणि आळसावतो ! त्या आळसामुळे आमची नेहमीची ठरलेली गाडी हमखास चुकवतो. आणि मग पुन्हा सासुरवाडीतच मुक्काम ठोकून आठवडाभर पाहुणचार झोडतो !
माझा एक तर्क आहे- आळसामुळे अपघात कमी होतात ! धांदरट, उत्साही लोकाना अपघाताला सामोर जास्त वेळा जावे लागते ! आळसामुळे मेंदूला कुठल्याच गोष्टीची चिंता नसते, काळजी नसते, विवंचना नसते ! शरीराला कष्ट पडत नाहीत किंवा शरीरही झिजत नाही. पहा बरे- किती फायदे आहेत "आळसा"चे !
पोलिस चोराला पकडण्याचा आळस करतो. चोराला त्यामुळे उपजीविकेचे साधन मिळते. ते दोघेही अशारीतीने परस्परावलंबी बनतात ! आळस सर्व प्राणीमात्रास आवश्यक आहे. तुम्ही काम करतानाही आळस येईल आणि काम न करता तर त्याच्याशी अधिकच जवळीक साधता ! तो तुमच्या अंगात भिनलाच म्हणून समजा !
आळसामुळे तर माझे नेहमी फायदे होतात. रेल्वेगाडी फलाटावर येऊ लागताच, सगळे पुढच्याच डब्याकडे पळतात, तर मी आळस करून निवांत शेवटचा डबा पहातो - जो बहुधा रिकामा असतो.
एक दिवस काय झाले - बायकोला आळसामुळे झोपेतून सकाळी उठायला उशीर झाला. "लौकर निजे लौकर उठे" - हे सुभाषित पार चुलीत घालून टाकले तिने ! ही उशीरा उठल्याने साहजिकच पुढील सगळे कार्यक्रम उशीरा होत गेले. माझी कचेरी दहाला उघडते. स्वयंपाक तर झाला नव्हता. वेळेवर स्वयंपाक न झाल्याने, मी फार चिडलो होतो. मी पटकन कचेरीला जाताजाता खाणावळीतून डबा घेऊन गेलो ! मधल्या सुट्टीत डबा उघडला आणि पहातो तो काय - तोंडाला चक्क पाणी सुटले हो ! पूर्ण शिजलेला भात, लिंबाची रसरशीत फोड, नीट शिजलेल्या दाळीची आमटी, घट्ट दही, छानशी कोशिंबीर, चटणी, मस्त वांग्याची स्वादिष्ट भाजी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोलगरगरीत वर्तुळाकार नजरेत भरणार्या- व्यवस्थित भाजलेल्या चपात्या ! अहाहा- लग्न झाल्यानंतर मी प्रथमच असे हे "पूर्णान्न" पहात होतो ! कारण जन्मदात्रीपासून वेगळे राहिल्यापासून, मला जेवताना दिसणारे पदार्थ म्हणजे- खडेदार तांदळाचा भात, आमटी नावाचा पाणीदार द्रवपदार्थ, चपात्या नामक कणकीचे विविध आकाराचे पापुद्रे किंवा जाड भाकरीसारखे दिसणारे प्रकार ! आमचा प्रेमविवाह असल्याने, मला नुसते पाहूनच तिचे पोट भरत असते, त्या नादात मला पोट आहे, ते नेमके ती विसरते ! लाडाची कन्या असल्याने "संस्कार, स्वयंपाक आणि संसार" याकडे लक्ष देण्यास शिकवण्यात माहेराकडून थोडासा आळस झाला असावा, असे वाटते !
तर सांगायचा मुद्दा हा की, तिच्या त्या दिवशीच्या आळसामुळेच मला असे रुचकर चवदार अन्न पहायला आणि खायला मिळू शकले ! हल्ली मी आठवड्यातले काही दिवस कचेरी सुटल्यावर घरी जेवायचा आळस करून, चक्क त्या माझ्या आवडत्या खाणावळीत जाऊन जेवत असतो ! ( कृपया तिला जाऊन सांगू नका हं कुणी ! ) माझे वजन आता चारशेवीस ग्रामने वाढले देखील आहे !
आळसामुळे आपल्यामागे कसली कटकट रहात नाही. कारण आपणच सर्वात मागे असतो ना ! आळसामुळे मी शाळेत कधी अभ्यासच केला नाही. मग शिक्षा मिळायची ती मागे उभे राहायचीच ! मग मी आपला मागे एकटाच उभा राहून निवांतपणे डुलकी घेत असे ! नाहीतरी कुणीतरी (बहुतेक मीच-) म्हटले आहेच की- " आज करे सो कल कर, कल करेसो परसो ! "
आळस नसणारी माणसे किडमिडीत असतात, शांती म्हणजे काय ते त्याना ठाऊकच नसते ! सदा पहावे तेव्हा- काम काम आणि काम ! त्याना कामाचे वेडच लागलेले असते ! आळशी माणसाचे त्या उलट- चांगली अगडबंब, स्थूल, गुबगुबीत बनतात ती ! त्याना एकच काम पुरत- चुटक्या वाजवत जांभया देणे !
पूर्वी म्हणे एका मंत्र्याने कर चुकवण्याचा आळस केला - तो मंत्री लगेच पीएमच्या गळ्यातला ताईत बनला की हो ! आम्ही आपले पाणी पट्टी, घर पट्टी, असल्या पट्ट्याकडे लक्ष देत बसतो, त्यामुळे नगरपालिकेचे अधिकारी आमच्याकडे बघण्याचा लगेच आळस करतत !
मतदारानी योग्य उमेदवाराना मत टाकण्याचा आळस केला, म्हणून तर आज अनेक आळशी नेतेच मंत्री झालेले दिसतात ! ह्या आळसाचे महत्व जाणूनच की काय, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण गेल्याकाही वर्षात "आळसा"मधे खूपच प्रगती केलेली दिसतेय- पंचवार्षिक योजनाना आपण सप्तवार्षिक योजना बनवल्या ! विकास योजना झकास होत्या, त्या सगळ्याचे तीन तेरा करून भकास केल्या !
परमेश्वाराने तर वरताण केली. पाऊस पाडण्यात त्याने केलेल्या आळसामुळे तर एका गावांत मारुतीने डोळ्यातून पाणी काढले म्हणे ! पाऊस नसला तरी, आमचे पुढारी आश्वासनांचे भरघोस पीक काढतात ! आम्ही त्या आश्वासनावर विश्वास ठेवून, शेतीत आळस करून स्वस्थ झोपत बसतो.
लक्षात आले ना, कसा आहे "आळस- जिवलग मित्र !" तो आपल्याजवळ असेपर्यंत आपण असेच निवांत बसू शकतो. ना कामाचा व्याप, ना डोक्याला ताप !
आमच्या घरी सिनेमाला जायची टूम कुणी काढली की, मी लगेच "आळशी अजगर" बनतो ! सर्वजण तयारी करतात- बाहेर पडण्याची- पण तयार व्हयायला मी बराच आळस करतो. माझ्या आळसामुळे मग बस चुकते. पण त्यामुळे फायदे किती होतात ? बसचा खर्च, सिनेमाचा खर्च, मध्यांतरातला खाण्याचा खर्च, सिनेमा सुटल्यावर भेळपुरी-आईस्क्रीमचा खर्च ! अबब ! हा सगळा खर्च केवळ माझ्यामुळे वाचतो. घरात काटकसर होते. बरीच शिल्लक पडते आणि ती महिना अखेरीला उपयोगी येते. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीला जबाबदार कोण ?
" आळस- जिवलग सखा ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा