"इषारा" - एक देणे !



               सध्या घराघरातून, वर्तमानपत्रातून , नजर टाकाल तिकडे एकच चर्चा आढळेल -' कित्ती  कित्ती  महागाई ही ! '  या चर्चेला लगेच जुन्या, अनुभवी, तज्ञ, जाणकार मंडळीकडून लगेच उत्तर येते - ' आमच्या वेळी नव्हती हो अशी म्हागाई ! आमच्या वेळी पैशाला पासरीभर वस्तू मिळायच्या ! ' (पण अजूनही ते लेकाचे चिक्कू आहेत तसेच आहेत !)  ह्यावर 'जुन्या---वगैरे' मंडळीकडे उत्सुकतेने नजर टाकली जाते. त्यांच्याभोवती कोंडाळे जमते आणि मग त्या वयस्कर मंडळींच्या' गप्पा उर्फ थापा' अशा काही रंगतात की, बस्स !
     
              या जुन्या मंडळींचा आजच्या पिढीला एक फार मोठा फायदा झालाय. त्यांच्याकाळी अस्तित्वात नसणारी टंचाई, महागाई हल्ली अस्तित्वात आल्यामुळे, साहजिकच तुलनेचा प्रश्न आला. पूर्वीची स्वस्ताई गडप झाली.  व्यापार करणार्‍याना एक सुसंधी प्राप्त झाली. जुलूम करणार्‍याना  आणि जनतेला नाना प्रकारे पिळून काढणार्‍याना, रान अगदी मोकळे झाले आणि या चिखलरूपी पार्श्वभूमीवर मराठी साहित्यात एक शब्दरूपी  कमळ उगवते झाले. त्याचे नाव 'इषारा'.

             येता-जाता- उठता-बसता देता येण्यासारखी गोष्ट, घ्यायला कठीण पण द्यायला सहज सुलभ गोष्ट, काळ-वेळ-स्थळ न जुमानता ऐकवण्यासारखी गोष्ट-  म्हणजे  'इषारा' !

            या इषाऱ्याचा भरपूर उपयोग हल्ली होत असल्याने, सर्वानाच त्याचे महत्व समजले आहे. या वापारावर कुणीही कसलीही- अगदी वटहुकूमानेही - बंदी आणू शकत नाही ! इतके ह्या इषाऱ्याचे महत्व !

           प्राथमिक शाळा सुरू होतात.  विद्यार्थी कुरकुर  न करता शाळेत हजर होतात. बाजारात क्रमिक पुस्तके आली नसल्याचे पालाकाना  माहीत असल्याने, तमाम शिक्षकवर्ग विद्यार्थ्याना मुद्दामच कडक इषारा देतात- "उद्या सर्वानी पुस्तके आणली नाहीत- तर वर्गात बसू दिले जाणार नाही !"  शाळेपासूनच हे इषाऱ्याचे  बाळकडू असे पाजले जाते !

          महानगरपालिकेचे रस्ते खडबडीत असतात. अशा रस्त्यामुळे चक्क रोड रोलरही बंद पडून, धूळ खात पडलेला असतो. अशा रस्त्यामुळे शेकडो अपघात होतात.  हजारो मृत पावतात ! आपल्या या रस्त्यांचा 'पराक्रमी प्रताप, संबंधित खात्याला समजून,  त्या खत्याकडून मग आमजनतेला एक 'इषारा' दिला जातो-       " सर्वानी आमच्या नादुरस्त आणि कुचकामी रस्त्यावरूनही,  आपली चांगली वाहने व्यवस्थित चालवून, आम्हाला सकार्य देऊन, वाहनकर त्वरित भरण्याची व्यवस्था करावी- अन्यथा वाहने जप्त केली जातील  ! "

          प्राप्तीकर खात्याकडून 'इषारा' दिला जातो- ज्या कारकुनानी(-च) अद्याप आयकर भरला नाही, (कर रुपये ४ पैसे २० फक्त भरलेला नसतो बरे का !) त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल! ते बिचारे सामान्य कारकून असल्यामुळे (-मंत्री किंवा अभिनेते नसल्यामुळे !) त्यांची मालमत्ता जप्त होऊन, सरकारला योग्य ते सहकार्य प्राप्त होते !

         कारखान्यांचे व्यवस्थापक कामगाराना 'इषारा' देतात- ' संपावर जाल, तर कामावरून काढले जाईल !' तरी पण 'इषारा' हा नुसता देण्यासाठीच असतो- ह्या कानाने तो ऐकून त्या कानाने सोडून द्यायचा असतो-     हे अनुभवाने माहित झालेले कामगार संप करतातच आणि उलट सर्व  फायदे पदरात पाडून घेतात !

            वरील सर्व प्रकारावरून, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की, 'इषाऱ्या'चे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे ! तो कुणालाही आणि कुणीही 'देऊ' शकतो.  तो कुणी घेवो अथवा न घेवो ! देवघेवीच्या व्यवहारावर जगत असलेल्या जगात हा एकमेव अपवाद आहे !
   
           दान दिल्याने वाढात असते, त्याप्रमाणे  इषारा  दिल्याने त्याचे महत्व वाढत असते. पहिला इषारा देऊन तो कुणी जुमानला नाही,  तर दुसरा द्यायची सोय असते .  समजा, तोही कुणी ऐकणार नसेल तर, तिसरा...... ह्या प्रमाणे संख्या वाढवता येते आणि आपली विसरत चाललेली उजळाणी पक्की होत जाते ! (क्लासेसवाले, प्लीज नोट धिस !).
          
          इषारा संख्येत  मोजता येतो,  त्याचप्रमाणे तो निरनिराळ्या स्वरूपात पहाताही येतो. उदाहरणार्थ, ज्यांच्यावर कसल्यातरी कारवाईचे 'नाटक' करायचे असते,  त्याला 'सौम्य' इशारा देता येतो, तर ज्यांचा वशिला, दबाव नसतो-  त्याना कडक असा इषार देता येतो ! "  लाईट चहा, कडक चहा, पेशल चहाप्रमाणेच सौम्य,कडक, त्याहून कडक इषारा- असे इषाऱ्याचे  प्रकार, स्वरूप असू शकते !

         एक गोष्ट ध्यानात घ्यायची- म्हणजे आपण  सारखासारखा नमस्कार केल्यामुळे, आपले पुण्य वाढत असते, त्याप्रमाणे ज्याला सारखासारखा इषारा (- मराठीत आपण ज्याला   "मेमो" असे म्हणतो !) मिळतो, त्याला सर्वाधीक  महत्व प्राप्त होते.  उदाहरणार्थ- आपले सरकार भाववाढीबद्दल व्यापारवर्गाला "सौम्य पासून ते अतिशय प्रचंड, महाभयंकर, तीव्र इषारे" देत असते, तरीही भाववाढ होतच रहाते आणि व्यापाऱ्यांना  त्यामुळे अतिशय  जास्त  महत्व येतच रहाते !

         'इषारा' माणसाच्या जीवनात  वैविध्य आणतो.  'केला इषारा जाता जाता ' या मराठी चित्रपटाच्या, तर 'इषारा' या हिंदी चित्रपटाच्या शीर्षकातही  हा शब्द मानाचे स्थान पटकवलेला दिसतो ना ?  'नुसत्या बोटाच्या इषाऱ्यावर  नाचवणे' हा वाक्प्रचार मराठीत गाजतो.  तर 'समझदारको इषार काफी' हा वाक्प्रचार हिंदीत गाजतो !  अशा रीतीने 'इषारा' हा शब्द  'भाषावादाला' मुळीच स्थान देत नाही ! तो सर्वाबद्दल  आपुलकीच  दाखवतो. 

          धोका, फर्मान, खून, नजर, सूचना या सहकारी शब्दांशी 'इषारा' जवळचे नाते ठेऊन आहे ! समुद्रकिनाऱ्यावर  स्मगलर लोक 'इषारा' देऊन 'माला'ची देवघेव करतात. तर 'लालदिवा भागात'ल्या ललना 'इषारा' देऊनच सडकसख्याहरीशी संधान साधून, जवळीकही साधत असतात !  श्रीमंत-गरीबीच्या भेदापासून इषारा दूर असतो. सरकार जनतेला इषारा देते, तर जनताही सरकारला इषारा देऊ शकते ! इषाऱ्याचा  वावर असा जनताजनार्दनात  असतो, तसाच तो सरकारदरबारीही आपल्याला दिसून येतो ! हिंदी चित्रपटसृष्टीत तर एका सुप्रसिद्ध व्यक्तीचे आडनावही चक्क 'इषारा' आहे.. आता बोला !
     
    वाचकहो ! आत्ताच स्वयंपाकघरातून लाटण्याच्या आवाजाने 'इषारा दिला' आहे ! इतका वेळ सांगितल्याप्रमाणे इषारा हा ऐकण्यासाठी नसतो, हे जरी खरे असले तरी- अपवादानेच नियम सिद्ध होत असतो ना ? लाटण्याच्या  इषाऱ्याचे महत्व सर्व विवाहिताना समजत असेलच ! आपल्या पाठीची कणीक नंतर तिंबून निघण्यापेक्षा, आपणच बायकोला ती  तिंबण्यात मदत केलेली काय वाईट !  काय हो, पटतय ना.... 

           अहो, पटणारच !  कारण  "समझदारको इषारा ...." ?           
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा