जगात जन्मलेल्या प्रत्येक वस्तूला एका परिणामाचे फळस्वरूप प्राप्त होत असते. तो परिणाम म्हणजे "निकाल" ! तो अनुकूल असू शकतो अथवा प्रतिकूलही असू शकतो. जन्माचे शेपूट धरूनच मृत्यू जन्माला आलेला असतो- मृत्यु हाच शेवटचा निकाल !
'निकाल' हे प्रत्येक गोष्टीचा शेवट, असे त्रिकालाबाधित सत्य आहे. परमेश्वराने स्त्री जात निर्माण केली आणि तेथूनच सर्वांच्या 'निकालास' सुरूवात झाली. स्त्री अर्भाकास जन्म देते, तेव्हाच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात ! मुलगा का मुलगी होणार- या प्रश्नाकडे आशेने पहाणारा 'भावी' बाप 'तिळे' जन्मल्याचा 'निकाल' ऐकतो, तेव्हा तर बिचा-याचा पार निकालच लागलेला असतो !
'निकाल' मनुष्याला आशावर्धक बनवतो, त्याचप्रमाणे तो निराशेच्या खोल दरीत ढकलूनही देऊ शकतो. निकालापोटी मनुष्याच्या अंगी विस्मय, नैराश्य, उत्साह, चैतन्य, वार्धक्य, शैशव, आळस वगैरे वगैरे अगणित भानगडी येतात.
बालकाचा जन्म होतो, तो 'निकाल' आणतो की पृथ्वीवर आणखी एकाची लोकसंख्येत भर पडली म्हणून ! आईला मुलगी हवी असते, तर बापाला हवा असतो मुलगा. दोघांच्याही मनाला अनुकूल लागेल तो 'निकाल' कसला ? परमेश्वर बिचारा दोघांच्याही आशेचा पार निक्काल लावतो ! तो अर्भकास जन्म देण्याआधीच त्या कोवळ्या जिवाला 'कायमचाच निकाल' देऊन टाकतो. निकालापासून चार हात दूर असलेला परमेश्वर हाच एक महाभाग आहे- त्याला कशाची काळजी, चिंता, पर्वा नसते. तो अगदी 'निकालप्रुफ' असतो !
आम्ही लोक कर्मदरिद्री ! हरघडीला आमच्यासमोर निकालाच्या नागाचा फणा वर काढलेला आहेच ! शाळेत शिरल्यापासून निकाल जो आपल्यापाठीशी लागतो, तो थेट मृत्यूने आपला निकाल लावल्यावरच पाठ सोडतो.
हल्ली बालकाची मुलाखत बालवार्गासाठी घेतली जाते. त्या मुलाखतीच्या 'निकाला'नंतर शाळेतल्या प्रवेशाच्या निकालाने बालकाच्या आयुष्याची सुरूवात होते. आणि त्या मुलाखतीच्या निकालावर त्याला वर्गात हजर होण्याचा कॉल मिळतो ! एकदा ते प्रवेशाचे किचकट काम झाले की- तिमाही,चौमाही, सहामाही, वार्षिक परीक्षा आल्याच. परीक्षा आणि तिचा निकाल, ह्यांची नेहमी हातमिळवणी असतेच ! ही जोडी सर्वांचाच पिच्छा पुरवते ! त्याचप्रमाणे निकाल आणि निराशा यांचे बरेच जवळचे नाते आहे, हेही अनुभवाने समजते !
वशिला नसेल तर, मुलाखतीच्या आधीच आपल्याला निकाल माहित होतो. पैसा नसेल तर, मेडिकल- इंजिनीअरींगच्या लायनीतला निकाल आधीच समजला जातो ! 'निवडणुकीचा निकाल' ही सर्वात सनसनाटीची बातमी असते. या निकालावर सारे जग इकडची उलथापालथ तिकडे करीत असते ! निवडणुकीचा निकाल हे जगातले कितवे आश्चर्य आहे, ते तुम्हीच ठरावा ! निवडणुकीच्या निकालाआधी अनेक निकालांची साखळी तयार झालेली असते ! वेळ,पैसा,कागद, धीर,उत्साह वगैरे या निकालामागे धावतात. निकालानंतर कुणाची पोळी भाजते तर कुणाला टाळी वाजवत बसावे लागते. असा हा निकाल दुतोंडी प्राणी आहे !
लॉटरीचा निकाल कुणाला फायदा वा कुणाला नुकसान देईल, हे सांगता येत नाही. आमच्या शेजारच्या काकाच्या मावसभावाच्या मामेचुलत्याच्या भाच्याला लॉटरीचा निकाल फायदेशीर ठरल्यापासून, माझा जबरदस्त ओढा त्या लॉटरीच्या मागे आहे. त्या ओढ्यामागे, पैशाचा ओढा वाहतो आहे- पण निराशेचे माप पदरात पडेपर्यंत आशेचे पाप 'निकालातूर'च रहाणारच आहे!
'निकाल' हा एकप्रकारचा लोहाचुंबक आहे ! लाचेचे लोखंड व निकाल या दोघात आकर्षण फार आहे. कोर्टात निकालात निघालेल्या फायली लाच दिली की, निकालात निघतात म्हणे. उद्योगविनीमय केंद्रात लाच दिली की, निकाल आपलाच नंबर बरोब्बर वर सरकवतो, म्हणे. लाच दिली की, दलालाकडून घरपोच कुठलाही परवाना मिळू शकतो. 'आधारा'ला दलालाचा 'आधार' असतो. पैसे दिले की तो बरोबर 'आधरा'चा निकाल लावून आधार देतो ! लाच दिली की, मध्यस्थ दलाल त्रयस्थाकडून आपल्याला हवा तो 'निकाल' लावतो !
भूत आणि वर्तमान यांच्यामधील फरक म्हणजे- निकाल ! निकाल एकेकाला होत्याचा नव्हता करतो ! पावसाची वाट उत्कंठतेने पहाणार्या चातकासारखी सवय माणसाला लागली आहे, निकाल ह्या गोष्टीमुळे ! प्रत्येक गोष्टीचा निकाल तो पहात बसतो ! उद्याचा निकाल आज पहाण्याच्या निष्फळ प्रयत्नात माणूस ज्योतिषाला आपला 'हात' दाखवतो, पण निकाल हा देवाचा संकेत असतो, हे जाणून असणारा ज्योतिषी त्याला चांगलाच 'हात दाखवतो'!
'मा फलेशु कदाचन !' असे पुराणात सांगितले गेले असतानाही, मनुष्य निकालाचीच अपेक्षा धरत असतो ! "पुढे काय, पुढे काय ?"- हाच प्रश्न विचारत निकालाची वाट तो चालत रहातो. मग त्याला कधी वाळवंट , कधी काटेरी मार्ग, तर कधी हिरवळ पायदळी तुडवावी लागते!
जगात एकमेकाना निकाल दाखवण्यात, एकमेकांचा निकाल लावण्यात, निकालात निघण्यात ही आपली चराचर सृष्टी गजबजलेली आहे ! पण अजूनही आपल्या लक्षात येत नाही की, निकाल हा पूर्वनियोजितच असतो- तो द्यावा घ्यावा लागत नसतो. 'परमेश्वरी संकेत म्हणजेच निकाल !'
आपली धावपळ ही नेहमी व्यर्थच असते. उद्या पेपरात छापून येणारा निकाल, आजच वाचण्याचा प्रयत्न हास्यास्पद असतो ! लग्न झाल्यावर प्रपंचाचा भार आपल्यालाच वहावा लागणार आहे, हे माहित असणारा माणूस विनकारणच आपला संसार कसा होईल- या प्रश्नाच्या निकालाची वाट पहात रहातो. 'संसार होईल तसा होईल ' असे मानणारा माणूस विरळच !
आहे त्या स्थितीत तडजोडीने का होईना- पण हसतमुख राहाणारा, आशावादी माणूसच जगण्यास लायक वाटतो. इतरांचा तर, निकाल पाहण्यातच आयुष्याचा पार निकाल लागलेला असतो !
"निकालासाठी जगलास तर निकालात निघालास, निकालावाचून राहिलास तरच खरा जगलास" असे आवर्जून म्हणावेसे वाटते!
वाचकहो ! हे लांबत चाललेले 'निकाल-पुराण', पेपर वाचून लगेच निकालात काढू नका बरे का ! नाही तर रद्दीच्या दुकानात भेटलात तर, एकेकाचा चांगलाच 'निकाल लावीन' हं !
.
jbardast nikal deta deta chintela kadhi nikalat kadhalatsamjalach nahit
उत्तर द्याहटवादेवयानी,
हटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद !