" नको ते तारुण्य ! "


            जिकडे तिकडे संप, बंद, घेराव, मोर्चा, चळवळ- कसली ना कसली तरी घडामोड चालूच असते ! एखादा दिवस येतो आणि शांतता देऊन जातो, असे आढळेल तर  शपथ !  ह्या सगळ्या घडामोडी,  हे सारे उपद्व्याप कुणामुळे होत असतील, तर ते बहुतेक गद्धेपंचविशीच्या आसपासच्या तरुणांमुळे !
          

            लहान पोराना काही काळात नसते.  आपण सांगू तशी ती  वागतात.  ' चल बैठ जा' ' चल झूम जा 'च्या तालावर सांगू तशी नाचतात. त्यान्च्या  पाठीशी कुणीतरी करता करविता असतो, त्यामुळे ती  पोर बिचारी सुखी असतात. कशाचा व्याप नाही, काळजी नाही की कसली चिंता नाही ! ' भोपळ्यात बी खुशाल ' असतात.
म्हाता-या लोकांचे तर मन मेलेलेच असते. काहीच न करता आल्यामुळे त्याना म्हातारपणामुळे सेवा-निवृत्त व्हावे लागते.  आता 'आमच्या वेळी असे नव्हते'  किंवा  'आमच्याइतके  तुम्ही काय करता-खाता-पिता, शिंच्यानो ! ' यासारखे उद्गार काढण्याखेरीज, त्याना आता दुसरा काही उद्योगच नसतो !


          लहान पोरांचे तसे, तर म्हाता-यांचे हे असे ! एकंदरीत दोन्ही पिढ्या निष्काळजीच असतात !  उरली मग मधली 'तरुण' म्हणजेच 'कर्तबगार' 'उद्याचे भावी आधारस्तंभ'  'उसळते रक्त '... वगैरे वगैरे असलेली 'तरूण' पिढी ! कुठलीही गोष्ट घडली - ती चांगली असो वा वाईट असो- तिचे खापर फुटणार  ह्याच मधल्या तरुण पिढीवर ! अशा वेळेस कधी कधी जीव जाम वैतागून जातो, 

आणि  म्हणतोच - " नको ते तारुण्य ! "

           लहान शेंबड्या पोरीपासून ते म्हाताऱ्या  आजीबाईपर्यंत सा-यांचा डोळा या 'तारुण्या'वरच ! यात (- म्हणजे तारुण्यात !)  तरुण स्त्री-पुरुष दोन्ही आले.  नाहीतर लगेच 'तरुण स्त्रिया' (बहुधा स्त्रिया नसणारच! कारण  त्या स्वत:ला 'मुली'च समजत असणार !) मोर्चा काढायच्या लगेच !  तर सांगायचा मुद्दा असा की, सर्व तरुणाना आज 'स्वतंत्र' जिणे असे उरलेलेच  नाही !
         लहान पोराने सांगावे- 'दादा, मला एक वहिनी आण ',  तर म्हाता-याने सांगावे- ' अरे बाळ, जरा गाय छाप  आणून दे ना जरा !'  एकूण काय की, तरुण पिढी कामाच्या रगाड्यात चांगलीच पिळून निघते आहे !
           

         अठरा वर्षाच्या आतील पिढीला ती  नोकरीस 'ना-लायक' असतात, म्हणून 'आराम',  तर साठ वर्षावरील म्हातारे नोकरीला 'ना-लायक' असतात, म्हणून जुलमाचा 'रामराम' ! मधल्या मधे मरते ती  मधली ही तरुण पिढीच !

            नोकरी करावी ती  ह्या तरुण पिढीनेच !  सारे कुटुंब पोसावे, ते ह्या तरुण पिढीनेच !  लग्न करून कुटुंब वाढवावे, तेही या तरुण पिढीनेच- तर कुटुंब नियोजन करावे, तेही ह्याच तरुण पिढीने ! यापेक्षा दुसरा विनोदी "विरोधाभास" जगात  दुसरीकडे कुठे आढळेल काय ?
 

             आता "लाईन"चे युग सुरू झालेले आहे. म्हाताऱ्यांना  'रांग धरा' म्हटले, तर त्यांचे पाय दुखतात, कंबर धरते, डोळे जळजळतात- ह्या तक्रारी सुरूच !  ( ह्याच म्हाता-यांचे डोळे एखाद्या कट्ट्यावर बसून, एखादी 'गुलछडी' रस्त्यांतून जाताना- ह्या टोकापासून ते पार त्या टोकापर्यंत बघताना-  मात्र कसे त्रास देत नाहीत , हा डोळ्याच्या डॉक्टरला संशोधनाचा विषय ठरावा !)  हे म्हातारे स्वत: लाईन कुठलीच धरत नाहीत, पण  त्या तरुणानी  एखादी 'लाईन धरली' की,  लगेच यांचा तांबडा सिग्नल तिथे टपकलाच म्हणून समजा !
तरुण करीत असलेली 'थेरं' पाहून,  स्वत:चा 'म्हातारचळ' विसरून;  हे बेटे'  (खरे म्हणजे 'थेरडे' म्हणावयास हवे, पण पुन्हा त्यांच्या मोर्च्याची भिती आहेच ना ! )


           लहान पोरावर रेशन, रॉकेल इ.ही लाईन धरावयास लागते, ती पाहून जीव खालीवर होतो. कारण त्यांच्या धांदरटपणामुळे पैसे हरवणे, माल कमी येणे, उशीर लागणे-  या गैरसोयी वाढतात. त्यामुळे 'लाईन' मारायची ( सॉरी !)- धरायची जबाबदारी तरुणावरच येते ना !
                 

          ऐन तारुण्याचे दिवसही 'तारुण्यपिटीका'मुळे  नकोसे वाटतात. ते नोकरी धरणे, ते ऱ्यागिंग, ते बॉसिंग,  तो प्रपंच,  ती  खदरावळ संभाळणे, पाहुण्या-रावळयांची सरबराई, त्यांचे मानापमान संभाळणे, त्यातून होणारे संशयकल्लोळ ! छे छे, सार्‍या जीवनाचाच  तरुणाना उबग यायला लागतो. ' हे परमेश्वरा, लहान ठेव किंवा एकदम म्हातारे कर !  पण  "नको ते तारुण्य !"- ह्या  असेच तरुणाना म्हणावे वाटत असेल !

                   'जवानी दिवानी' ही रूपेरी पडद्यावरच पाहायला बरी वाटते.  'तरुण तुर्क-म्हातारे अर्क' मधील आपल्याला 'अर्क'च किती 'हा' वाटतो !  'लहानपण देगा देवा -' म्हणण्यातली गोडी  अवीट- फक्त  म्हणण्यापुरतीच !  'हे करा- ते करा आणि करता करता मरा-'  हेच तरुण पिढीचे जीवन-सूत्र बनले आहे. ह्या पिढीला स्वास्थ्य, समाधान, विरंगुळा काही आहे का हो ?  कोणत्याही गोष्टीतून, कामातून त्याला अंग झटकून, मोकळे असे होता येतच नाही !  कारण 'तरुण' हा नेहमी 'उत्साही'च कार्यकर्ता असतो म्हणे !
                 

                   थोडक्यात सांगायचे तर, लहान पिढी ही 'दही', तर म्हातारी पिढी ही 'लोणी' असते ! माझा म्हणण्याचा मुद्दा लक्षात आला असेलच ! मधली म्हणजेच 'तरुण पिढी' ही "ताक" असते-  कुणीही यावे आणि कुठेही कितीही  घुसळून जावे ! पटते ना मी दिलेली उपमा ?  पटली तर व्हय म्हणा की मग !
 

                अरेच्चा ! एक गोष्ट विसरलोच मी !  आता ही तरुण पिढी हे सगळे वाचून, स्वस्थ  थोडीच बसणार आहे ! बघा- निघाला त्या पिढीचा एक मोर्चा, घोषणा देतच -  " नको ते तारुण्य ! "  
.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा