'''''''''' उद्घाटन ''''''''''''


" केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार "-


                हे प्रसिद्ध वचन,  आमच्यामते थोडेसे बदलू पहात आहे. कारण हल्ली 'देशाटना'ची जागा 'उद्घाटन' घेऊ पहात आहे . म्हणून 'केल्याने उद्घाटन...' हेच योग्य वचन ठरेल ! शिवाय दूर ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे असेल, तर त्यात देशाटन आपोआपच साधले जाते. आजकाल कानमंत्र द्यायचा झालाच तर तो उद्घाटनविषयक देणेच सोयीस्कर !

               मयताचा दाखला आणल्याविना एखादा इसम मृत झाल्याचे सरकार-दरबारी जसे सिद्ध होत नाही, तसे एखादा उद्घाटनसमारंभ आयोजित केल्याशिवाय नियोजित कार्य सुरू केलेले आहे, हे सर्वांना समजणार नाही, असाच (गैर-)समज सध्या सर्वत्र प्रचलित आहे .

              एखाद्या डॉक्टरने प्रसुतीगृह बांधले, त्याचे उद्घाटन होते.  त्याशेजारीच 'कुटुंबनियोजन'केंद्र सुरू केले तरी त्याचेही उद्घाटन करतात. एवढेच काय पण, पुढेमागे एखादी स्मशानभूमी झाली, तरी तिचे उद्घाटन लोक वाजतगाजत धूमधडाक्याने करतील. हौसेला मोल नाही, हेच खरे !

                  बरे, महागाईच्या काळात उद्घाटन समारंभ थोडक्या खर्चात, वेळात, त्रासात होतो म्हणता ?  छे ! सन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून तयारी, तशी मोठ्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी साध्या रिबिनीपासून तयारी करावीच लागते ना !   उद्घाटन पुढील वर्षाच्या तीनशे पासष्टाव्या दिवशी असले, तरी "रिबिनी" शोधण्यास आजच सुरुवात करावी लागते !

               दुसरी एक गंमत म्हणजे, उद्घाटन कधी व कशाचे करावे, हा मुद्दा पुष्कळदा गौण ठरून, उद्घाटनासाठी कुणाला बोलवायचे, ह्या प्रश्नावरच वादंग माजतो. शेवटी एकाचीच 'एक ना धड भारंभार' उद्घाटने केली जातात !

               असे सांगतात की, एका  बहुमजली टोलेजंग इमारतीचे उद्घाटन व्हावयाचे होते. इमारत बांधण्याआधी एकदा भूमीपूजनाने उद्घाटन झाले होते . नंतर पायाभरणीच्या निमित्ताने एक उद्घाटन ! पण इमारत बांधून पूर्ण झाल्याचे एक उद्घाटन करणे आवश्यक होते. म्हणून त्या इमारतीच्या ५/६ भागीदारात चर्चा सुरू झाली. एकाच्या मते त्या गावच्या नगरपित्यास, दुसऱ्याच्या मते जिल्हाधिका-यास, तिसऱ्याच्या मते
एखाद्या मंत्र्यास बोलावण्याची आवश्यकता होती. यावर वरताण म्हणूनच की काय, चवथ्याने त्याच्या लग्नाच्या चवथ्या नूतन पत्नीस उद्घाटनासाठी बोलावण्याचा हट्ट धरला.....म्हणे !   त्या भागीदारात शेवटी उद्घाटनसमारंभासाठी बोलावण्याच्या व्यक्तीबद्दल तंटा माजून.... इतका काळ  लोटला की, अखेरीस नगरपिता, जिल्हाधिकारी, एक मंत्री आणि चवथ्याची जुनी पत्नी-  हे सर्वजण त्या टोलेजंग इमारतीच्या उद्घाटनासाठी जेव्हां आले, त्यावेळी ती इमारत पार भुईसपाट होऊन गेली होती !

               उद्घाटन  ज्याच्या हस्ते करायचे, अशाच्या बाबतीतही एक गंमत विशेषकरून आढळते. आपल्याला असे दिसून येईल की, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीबाबत काहीही गम्य वा माहिती वा स्वारस्य नसते, अशीच व्यक्ती उद्घाटक म्हणून आमंत्रित केली जाते ! उदाहरणार्थ - एखाद्या टेलरिंग फर्मच्या उद्घाटनास सुतारास, तर एखाद्या 'बुद्धीविकासकार्य'संस्थेच्या उद्घाटनास एखाद्या पुढाऱ्याला पाचारण केले जाते ! लहान मुलाच्या केस कापण्याच्या उद्घाटनास (-'जावळ') तर, चक्क  त्याच्या मामास बोलावले जाते !

               वास्तविक पाहता, केशकर्तनालयाच्या उद्घाटनास एखाद्या कुशल अनुभवी नापितास, तर नगरपालिकेच्यासंबधी उद्घाटनास नगरपित्यालाच पुढे बोलावणे योग्य नाही काय ?  पण मग 'रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी' ही म्हण तरी कशी सार्थ ठरणार म्हणा !
    
             सर्व उद्घाटन-समारंभांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास असे आढळून येईल की, अशा समारंभांना बोलावलेली उद्घाटक-व्यक्ती ही विवाहित असते ! तसा काही नियम असावा, ही शक्यता पण कमीच आहे ! परंतु, जिकडे पहावे तिकडे, उद्घाटक व्यक्ती सहकुटुंब (-शक्य असल्यास सहपरिवार) आलेली दिसतेच !  परवा तर म्हणे,  एका ब्रम्हचर्याश्रमाच्या उद्घाटनासाठी एक महाशय आपल्या पत्नीसह (जी अष्टपुत्रा सौभाग्यवती होती.) आले होते !
 

              उद्घाटनसमारंभाचा सोहळा तरी  काय वर्णावा हो !  अशा प्रत्येक समारंभाचे वर्णन 'झालेत बहु, होतील बहु, परंतु यासम (रद्दी-) हाच' ! अशा धर्तीवर छापून येतो. उद्घाटकाच्या प्रवासाची, राहण्याची, खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवताठेवता बिचाऱ्या व्यवस्थापकाच्या नाकी नऊच काय पण,  दहा-बारा तर नक्कीच येत असतील ! शिवाय, उद्घाटकाबरोबर (स्व-)हितचिंतक, फोटोग्राफर, हारतुरेवाली मंडळी जातीने हजर असतातच ! या गदारोळात असा काही फोटो पेपरात छापून येतो की, बिचाऱ्या वाचकाला संभ्रम पडावा- '  हा त्या उद्घाटनसमारम्भाचा फोटो आहे का, चुकून कुठल्या एखाद्या प्रेतयात्रेच्या फोटोचा ब्लॉक छापला गेला आहे ! '  पण 'फोटो छापून येणे' हीच गोष्ट उद्घाटक आणि आयोजक यांच्या मते महत्वाची - मग फोटो कसला का असेना !

               'अशी उद्घाटने- असे उद्घाटक' या विषयावर देखील खूपसे लिहिता येईल. एका मंत्रीमहोदयांना एका विवाहसमारंभाची पत्रिका दिली. सवयीनुसार, मंत्रीमहोदय विवाहमुहुर्तानंतरच आले.  मंडपात घुसले आणि गडबडीत, ताबडतोब कात्रीची मागणी करू लागले . ज्यावेळी त्यांच्या हातातल्या अक्षतांकडे लक्ष वेधले, त्यावेळी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की, आपण येथे कुठल्याच उद्घाटनाची रिबीन कापण्यासाठी आलेलो नाहीत !

               स्त्रिया केसाने गळा कापू शकतात, तर ' निदान आपण कात्रीने रिबीन तरी कापू शकतो का नाही ',  हे पाहण्यासाठी उद्घाटनसमारंभ अस्तित्वात आलेले असावेत, असा आमचा अंदाज आहे !

                "उद्घाटनाने येई मनुजा मोठेपण" अशी म्हण उगाचच का पडली आहे ? त्यामुळे माझे ध्येय सध्यातरी एखादा "उद्घाटक" होण्याचे आहे.
 

                वाचकहो, "उद्घाटक पाहिजे" अशी जाहिरात कुठे तुम्हाला आढळली, तर मला कळविण्याची व्यवस्था करा हं !
.                          
         
              

                       
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा