स्नेह फेसबुकातला-

काव्यास्वाद – लिहिणाऱ्या हातांचा उत्सव

जगण्यातले सत्य आणि स्वप्न मांडणारे गझलकार – विजयकुमार देशपांडे

माधव राघव प्रकाशन ताळगाव, गोवा  यासंस्थेतर्फे  ‘काव्यास्वाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एका कवी/कवयित्रीची कविता/गझल अथवा मुक्तछंदातील रचना घेऊन त्या रचनेचे  रसास्वादात्मक रसग्रहण करण्यात येणार आहेत. गझलकार, पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर तसेच कवयित्री चित्रा क्षीरसागर हे रसग्रहण करणार आहेत. या सदरात कवीचा अल्पपरिचय, प्रकाशित पुस्तके समाविष्ट करण्यात येणार आहे.

आज या उपक्रमात आपण भेटणार आहोत, सोलापूर येथील एक ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार देशपांडे यांना. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. आता ते निवृत्त आहेत. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले विजयकुमारजी  मात्र साहित्य क्षेत्रात रममाण झालेले आहे. सातत्याने लेखन करणारे विजयकुमारजी समर्थ रामदास स्वामींचा दिसामाजी काहीतरी ते लिहावे हा मंत्र आचरणात आणत आहे. परंतु लिहायचे म्हणून काहीही ते लिहीत नाहीत. सोलापुरातील बहुतेक दैनिकांतून आणि नियतकालिकांतून त्यांचे साहित्य नियमित प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांतून ते लेखन करीत आहेत. हायकू व चारोळ्या या अल्पाक्षरी काव्यापासून विडंबन, वात्रटिका कविता आणि गझल लेखनात त्यांचा हातखंडा आहे. काव्याबरोबरच गद्यलेखनातही त्यांनी झेप घेतली आहे. बालसाहित्य, लघुकथा, ललित लेखन आणि विनोदी तसेच निबंध आणि एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. फेसबुकवर आणि स्वतःच्या ब्लॉगवर त्यांचे सतत लेखन सुरू असते. सोलापूर आणि पुणे आकाशवाणीवरून त्यांचे काव्यवाचन झालेले आहे. त्यांचे दैव जाणिले कुणी हे अप्रकाशित नाटक असून, आभाळमाया आणि काव्यसुगंध  या दोन प्रातिनिधिक संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. त्यांचे स्वतःचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यातील एक चांदोबाचा दिवा हा बालकवितासंग्रह आणि सखे तुझ्यासाठी हा चारोळी संग्रह प्रकाशित झालेला आहे. पुण्यातील मराठीबोली समूहातर्फे लोकसाहित्यिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.  त्यांच्या फेसबुकवरील अनेक गझल व शेर तसेच कविता आणि विडंबने ही दाद मिळवून जातात. त्यांच्या पुस्तकांवर अनेकांनी परीक्षणात्मक लेखन केले आहे. ते त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळते. बँकेतली आकडेमोड करता करताच गझलेतील मात्रा मापन पक्के झाले. गझल निर्दोष कशी असावी याविषयी ते दक्ष असतात. त्यांनी अनेक वृत्तांमध्ये लेखन केले आहे. त्यांची विडंबने ही सात्विक असतात. त्यात उगाच ओढून ताणून काही नसते.

आता त्यांच्या गझलेचे आकलन करून घेऊ. अर्थात मी कुणी मोठा समीक्षक असल्याचा माझा दावा नाही. एक रसिक म्हणून आणि वाचनाची आवड नसल्याने तसेच स्वतः थोडेफार लेखन करीत असल्याने  त्यांच्या गझलेचे आस्वादक परीक्षण करू शकेन.
या गझलेत विजयकुमारजींनी जगाच्या रहाटगाडग्याचे यथार्थ वर्णन केले आहे. लोकांचे स्वभाव नेमक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची स्थिती देशापुढे अनेक समस्या निर्माण करणारी आहे. लोक अनेक व्यथांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थिती लोकांच्या मनाचे वर्णन करणारी ही गझल आहे.

गझल उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो

उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो
जागोजागी घडे पालथे जरी पाहतो

घेत राहतो रोजच फाशी कुणीतरी पण
कुठला नेता पोट उपाशी धरून बसतो

एक  वेगळी तुजवर कविता कशाला करू
नजरेसमोर कायम प्रतिमा तुझी ठेवतो

गावामधल्या सुधारणाची रोज वल्गना
पण त्यासाठी शहर कुणीही सोडत नसतो

होते माती जास्ती धरता  हाव जर मनी
माहित असले तरी न संधी कोण सोडतो
--------
अनलज्वाला वृत्तात लिहिलेल्या या गझलेच्या पहिल्याच शेरात ते सतत उपदेश आणि फक्त उपदेशाचा मारा करणाऱ्या लोकांवर ते शेरेबाजी करतात. काही लोकांना आपल्या पायाखाली काय जळते हे न पाहता दुसऱ्याच्या चुका दाखवणेच समजते. किंवा तीच त्यांची वृत्ती असते. ते म्हणतात, मला तू सतत उपदेशाचे डोस कशाला पाजतोस रे बाबा, तुझ्या नशिबाचे पालथ घडे मला जागोजागी दिसतात. उणेदुणे स्वतःचे कुठे दिसते कुठे असा प्रश्न मनात येतो. आपले काहीच धड नसताना, आपल्याला काही अनुभव नसताना उपदेशाचे डोस पाजणे प्रत्येकाला छान जमते.  ही जनमानसाची वृत्ती आहे.
शेतकरी, तरुण आणि स्त्रिया असे कुणी कुणी नैराश्याने ग्रासलेला आहे. बेरोजगारीमुळे प्रत्येक जण व्यथित आहे. शिक्षण घेऊनही नोकरी किंवा रोजगार मिळेलच अशी खात्री नाही, शाश्वती नाही कुणाला भाकरीची अन् गरज आहे चाकरीची अशी प्रत्येकाची स्थिती आहे. अनेकदा पदव्यांचे भेंडोळे घेऊन कंपन्यांच्या दारोदारी फिरणारे तरुण आणि दुसरीकडे नोकरकपातीची भीती, शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुगीनंतर भावच मिळत नाही. त्याच्या मालाला मातीमोलाने मागितले जाते. कर्जाचे डोंगर उरावर घेऊन शेतकरी जगत असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आहे. सावकार काय आणि बँका काय सतत तगादे लावतात. जप्तीची भाती घालतात. अशा परिस्थितीत त्याचे जगणे सतत भीतीच्या सावटाखाली असते. अशा सतत आत्महत्येच्या व भुकेने व्याकुळ झालेल्यांच्या आत्महत्या वाढत असताना निर्ढावलेले नेते मात्र एसी कार्यालयात बसून नुसते योजनांचे भेंडाळे जाहीर करतात. त्यांच्या भुकेने व्याकुळ होऊन कुणा नेत्याने कधी उपोषण केल्याचे ज्ञात नाही.
गझलमध्ये प्रेमाचा संदर्भ आला नाही तरच नवल. विरह, प्रेम, प्रणय आणि भावुकता हे गझलेमध्ये येत असते. गझलकार म्हणतात,  माझ्या हृदयात तुझे स्थान अढळ आहे. आणि माझ्या मनात तुझी प्रतिमा सतत उजळत असते. मनी वसे ते नयनी दिसे (स्वप्नी तर दिसतेच) असे असल्याने सखीची प्रतिमा सतत माझ्या नजरेसमोर आणि मनात असल्याने तिच्यावर वेगळी कविता लिहिण्याची गरजच नाही. साक्षात प्रिय सखी सतत अवतीभवती असल्याने तिचे वर्णन कुणासाठी करायचे. स्वान्तःसुखाय अशी साहित्य साधना करायची असताना माझी प्रत्येक कविता ही सखीवर आणि सखीच असते, मग कविता आणि सखी वेगळी कुठे आहे, असे गझलकार या शेरात म्हणतात.
नोकरीच्या निमित्ताने शहरात गेलेल्या चाकरमान्यांना आणि ग्रामीण भागातून निवडून आलेला नेता सतत विकासाची व ग्रामसुधारणेची पुडी सोडत असतात. आपले गाव सुधारले पाहिजे अशी वल्गना चाकरमानी करीत असतात. नेतेही करीत असतात, परंतु प्रत्यक्ष गावात जाऊन सुधारणांच्या योजना राबवण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, या बोचऱ्या परिस्थितीची जाणीव हा शेर करून देतो. नुसत्याच वल्गना करणे हा माणसांचा स्वभाव आहे. आपल्याला काही करायचे म्हटले की काढता पाय घेण्याच्या वृत्तीवर हा शेर प्रहार करतो.
शेवटच्या शेरात गझलकार म्हणतात,  प्रत्येक माणसाचा स्वभाव हा अधिकस्य अधिक फलं प्राप्त करून घेण्याचा असतो. अनेकदा तो इतकी हाव करतो की, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हे माहीत असूनही तो आणखी मागतच असतो कधी देवाकडे कधी आप्तस्वकियांकडे. सामान्य माणूस असो की अब्जाधीश त्याला संपत्तीची हाव असतेच. आजकाल तरुण तरुणींना आपण अधिकाधिक सुंदर दिसावे अशी हाव असते मग ते प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घेत असतात, परंतु त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात, याची कुणाला तमाच नसते, हे हा शेर सूचित करतो. अति तेथे माती हा सिद्धान्त गझलकाराने मांडून तरीदेखील माणसे मला हे हवे ते हवे, अधिक हवे अशी कामना करतात. हे सगळे माहीत असले तरी एखादी संधी उपलब्ध झाल्यास कुणीही लाभ मिळवायचे सोडत नाही.  या गझलेच्या प्रत्येक शेरात असा शाश्वत संदेश गझलकाराने दिला आहे. 
कृपया कविता अथवा गझल आणि रसग्रहणावर अभिप्राय नोंदवा..

_____ प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ९०११०८२२९९
तासगाव, गोवा
०२/०६/२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा