गुंतता कलह हे


ऑफिसचे काम लवकर आटोपले.
इकडे तिकडे न भटकत घरी पोहोचलो .


दारातच सगळीकडे सामसूम शांतता असल्याची जाणीव झाली .
आपल्याच घराजवळ आल्याची खात्री करावी की काय -
असेही क्षणभर वाटून गेले.


ल्याचकीने दार उघडले.
आत गेल्यावर डोक्यात उजेड पडला. 


अपेक्षेप्रमाणे फक्त टीव्हीचाच आवाज दिवाणखान्यात घुमत होता.


आई, बायको आणि सूनबाई डोक्याला डोके लावून,
मालिका पाहण्यात मग्न होत्या. 


शांतता भग्न पावणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊन चहा केला.
मालिकेची ब्रेकची वेळ साधून तिघींपुढे तीन कप ठेवले !

आपसूकच तिन्ही माना माझ्याकडे वळल्या.
" अरे -
अहो -
अय्या -
आज लवकर कसे ? "
तिन्ही पिढयांचे उद्गार.. एकापाठोपाठ कानावर पडले.


तब्ब्ल दोन मिनिटांचा ब्रेक असल्याने, तिघींना उद्देशून एकच प्रश्न विचारला..
" काय असते या मालिकेत गुंतून जाण्याएवढे ?" 


आई आधी उत्तरली -
" अरे बाबा, तोंडात बोट घालायला लावणाऱ्या,
सुनेच्या एकेक हिकमती / करामती बघण्यात काय मजा येते म्हणून सांगू...... ! "


घाईघाईने आईचे उत्तर पूर्ण होण्याआधीच सूनबाई उद्गारली
" अहो बाबा, आणि बर का.. अगदी अचंबित करणाऱ्या,
अविश्वसनीय अशा सासूच्या उचापती / कुरापती पाहतानाही,
अगदी थक्क व्हायला होते हो ! मस्त धमाल येते ! "


त्या दोधीकडे आळीपाळीने बायको पाहत असतानाच ,
ब्रेक संपला आणि माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत,
तिन्ही डोकी उलट्या दिशेला वळली !


निमूटपणे चार कप हातात धरून,
मी बेसिनच्या दिशेने वळलो ..... !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा