" तुम्ही एवढे सुशिक्षित ....! "


          बसथांब्यावर बससाठी थांबलो होतो. संध्याकाळची वेळ ! गर्दी "मी" म्हणत होतो. कारण कुणाची सिनेमाची वेळ झालेली, तर कुणाची फिरायला निघायची ! बससाठी खास रांगेत असे कुणीच नव्हते. कारण बस वेळेवर सोडणे हे जसे 'महापालिका परिवहना'ला ठाऊक नाही, तसेच रांग नीट  धरणे,  हेही समस्त नागरिक प्रवाशांच्या रक्तातच नाही !  रांगेत उभे नसतानाही पटकन आपला पाहिला नंबर पटकावणे- ही आमची वैशिष्ट्यपूर्ण बाब !

           बससाठी बहुतेक 'मध्यमवर्गी सभ्य माणसे'च उभी होती !  एवढयात बस आली- कसाबसा माझा प्रवेश आत झाला. आणखी तीन-चार जणांना आत जागा मिळताच वाहकाने दोनदा घंटी वाजवली, तरी एक प्रवासी  बसमध्ये चढत होताच ! ते पाहून वाहकसाहेब आपल्या कमावलेल्या 'खास' आवाजात खेकसलेच, "अहो महाशय, तुम्ही एवढे सुशिक्षित ....! " पण वाहकाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो प्रवासी चट्कन खाली उतरला देखील ! 


            .......बस पुढे निघाली अन् तिच्याशी स्पर्धा करीत माझ्या मनातले विचारही धावू लागले !  जगात खराच सुशिक्षित कोण आहे ? तो कसा ओळखावा ? आपण किती शिकावे, म्हणजे दुसऱ्याने आपल्याला सुशिक्षित म्हणता येईल ? किंवा काय केल्यास 'सुशिक्षितपणा'स बाधा येईल ? सुशिक्षितांचे काही खास 'नियम व  कर्तव्य' याबद्दलची लक्षणे आहेत काय !

           उपरीर्निर्दिष्ट उतरलेला प्रवासी 'सुशिक्षित' हे संबोधन प्राप्त होताच खाली उतरला ! ते संबोधन त्याला भूषणावह वाटले असेल की, गालीप्रदान ? एखादा मनुष्य रस्त्यावर चालताना ठेचकाळतो. इतरांच्या मुद्रेवर लगेच भाव उमटतो - " एवढा हा सुशिक्षित दिसतोय, पण नीट पुढे बघून चालता येऊ नये ? "
    
          गर्दीत चालताना एका गृहस्थाचा (खरोखरच-) चुकूनजरी  दुसऱ्या महिलेला ओझरता धक्का लागतो, तरी  इतरेजन टवकारून पहातात-         " एवढा सुशिक्षित दिसतोय आणि असले धंदे ! " एक जोडपे आपल्या अपत्यास घेऊन फिरावयास निघते.त्या अपत्याच्या डोईवर एखादे गोंडेदार काश्मिरी टोपडे मजेत विराजमान झालेले असते . तेवढ्यात कोण्या त्रयस्थाच्या हालचालीने, ते टोपडे स्थानभ्रष्ट होऊन खाली पडते. ते पाहून एक 'सोवळा' आवाज पुटपुटतो - " एवढे मेले सुशिक्षित दिसतात, पण पोराकडे पहायलासुद्धा वेळ नसतो यांना ! "   ही आणि आणखी अशी कितीतरी उदाहरणे वानगीदाखल देता येतील !

          मनुष्याचे जीवन चाकोरीबद्ध आहे. मनुष्याने अमुक रीतीनेच वागले पाहिजे, राहिले पाहिजे, बोलले पाहिजे , चालले पाहिजे ! या चाकोरीबाहेर जाऊन त्याने दुसरे काही केले की लगेच त्याच्यातला तथाकथित 'सुशिक्षितपणा' डळमळीत होऊ लागल्याची कोल्हेकुई सुरू होते . त्याच्या काचेच्या प्रतिमेला तडा जाऊ पाहतो !

          गंमत म्हणजे हा 'सुशिक्षितपणा'चा मुखवटा एका विशिष्ट वर्गाभोवातीच आढळतो. श्रीमंत मनुष्य इतर लोकांच्या रागालोभाची पर्वा  करत नाही. दरिद्री माणसाला तर स्वत:च्याच जिवाची पर्वा नसते. हे दोन्ही वर्ग मन चाहेल तैसे स्वैर वर्तनाने  जीवन जगू शकतात ! उरला तो सुशिक्षितपणाचा मुखवटा सांभाळणारा "मध्यमवर्ग" !

          प्राणापेक्षा अब्रूला, जीवापेक्षा स्वाभिनाला जपणारा 'मध्यमवर्ग' ! या वर्गाचे जीवन नेहमीच संभ्रमात, दोलायमान स्थितीत ! सर्व गोष्टी धाडसाने कराव्या तर वाटतात, जीवनाचा आनंद स्वच्छंदीपणाने मनमुराद लुटावा तर वाटतो.... पण ! आजूबाजूचे टपलेले चेहरे, रोखलेल्या नजरा आपल्याला नांव ठेवतील का या विचारानेच अर्धमेला होऊन मनांत खंत करत रहातो - हाच तो मध्यमवर्ग ! कारण हाच तो "तुम्ही एवढे सुशिक्षित-" ला  भिणारा सुशिक्षित वर्ग आहे !

           या सुशिक्षित वर्गानेच नियमितपणाने आयकर भरला पाहिजे ! भले कुणी मंत्री लाखो रुपये चुकवो किंवा कोटीचा कर कुणी नट-नट्या न भरोत ! पाच आकडी पगार घेणारा वरिष्ठ कार्यालयात कधीही येवो, पण आपल्यावरचे हजेरीपत्रकावरचे लाल फुलीचे अरिष्ट टाळण्यासाठी मात्र वेळेवर या वर्गानेच यायला हवे ! महिन्याला ठराविक जादा काम करून त्याने प्रपंचाशी तोंडमिळवणी केलीच पाहिजे. इतर वर्गानी भले वंश-विस्तार कितीही केला, तरी 'हम दो हमारा एक'चा नारा यानेच केला पाहिजे ! यानेच आपले कुटुंब मर्यादित ठेवले पाहिजे. बस रिकामी असली तरी, वाहकाने दोनदा घंटी मारून 'खाली उतरा' म्हटले की त्याने पाय निमूटपणे मागे घेतला पाहिजेच !

           या मध्यमवर्ग-सुशिक्षितांचे जीवन चाळीशी निगडीत पाहिजे . कर्ज काढून एखाद्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद व्हायलाच पाहिजे . याच्या घरांत दूधवाल्याच्या आरोळीपाठोपाठ रोज सकाळी एखादे दैनिक घरांत फेकले गेले पाहिजे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे मुलाबाळांच्या कल्याणासाठी त्याने सावधगिरी म्हणून नजीकच्या 'स्टेट ब्यांके'त 'आज'च खाते खोलले पाहिजे !

          श्रीमंत वर्ग उच्च शिक्षित असो वा अडाणी ! त्याचे फारसे बिघडत नाही . दरिद्री वर्ग तर अडाणी-अशिक्षित असतोच.  तेव्हां वर लिहिलेली लक्षणे ज्याला लागू पडत नाहीत, तो सुशिक्षित नसलाच पाहिजे ना !

           जन्मापासून मरेपर्यंत मध्यमवर्गाने चाकोरी सोडू नये . वहिवाटीने पडलेला रस्ता या वर्गाने सोडला की, दाही दिशांनी आक्रोशाचा डोंब उसळतो- " तुम्ही एवढे सुशिक्षित ...! " ( म्हणजेच - तुम्हाला एवढीसुध्दा अक्कल असू नये ? )

          सुशिक्षित मध्यमवर्ग शिवीपासून अलिप्त राहिला पाहिजे. त्याच्या घरांत अभंग-ओवीचाच वावर असायला हवा.  गुंडगिरी त्याला सोसत नाही. संप बंद निदर्शने यांची झळ त्यालाच पोचते. म्हणून विध्वंसक कार्याची त्याला अलर्जी आहे !

           माझा उतरण्याचा थांबा समोरच्या काचेतून दिसू लागलाय ! मी बसमधून खाली उतरण्याची आधीच तयारी करत आहे, पुढे पुढे सरकत आहे. कारण बसथांब्यावर बस थांबण्याआधीच मी दाराशी हजर असायला हवे ! 


         नाही तर ..... मी एक मध्यमवर्गी साधासुधा माणूस असल्याचे, वाहक अचूक ओळखेल आणि जाहीर गर्जना करील-    " काय राव ! तुम्ही एवढे सुशिक्षित ..! "  
त्याचे शब्द कानावर आधी येण्यापेक्षा, मीच पटकन उतरण्याची पूर्वतयारी केलेली काय वाईट !
.                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा