बरं झालं बाबा आज -

बरं झालं बाबा, आज  
जिवंत नाहीत तुम्ही 
सुखासमाधानाने मी 
छान लोळत आहे नेहमी ..

तुमच्या कष्टाच्या फंडातून 
घेतलेल्या दुचाकीवरून 
फिरतो मी दोस्त जमवून  
हिंडतो तिघ तिघ बसून ..

एका हातात पुडी धरतो 
दुसऱ्या हाताने शिस्तीत मळतो  
नसलीच कधी तर बिनधास्त
दोस्तापुढे हातही पसरतो ..

मस्त केसांचा कोंबडा उभारून 
चौकात उभा ष्टाईल मारून 
येणाऱ्या जाणाऱ्या आयटेम्स 
बघत बसतो डोळे भरून ..


चौकात जेव्हा उभा असतो 
काळवेळ मी पाळत नसतो
सावली जरी असली तरी 
गॉगलशिवाय फिरत नसतो ..

हिरवळ बघून शीळ घालून  
चकरा मारूनही दमत नाही 
कबुतरांची मोजदाद मी 
केल्याशिवाय रहात नाही ..

देवळात कधी जात नसतो 
देवाला पुजत बसत नसतो 
मात्र वाईनशॉप दिसताच 
प्रथम बाटलीला वंदन करतो .. 

अधी मधी चारचौघे जमून  
जोरात बेंबीच्या देठापासून  
पूर्वजांची आठवण काढून 
देत असतो आरोळ्या ठोकून ..

रस्त्याच्या मधोमध थांबतो 
बनारस कलकत्ता तोंडात कोंबतो 
लालभडक पिचकारी मारतो 
स्मार्ट सिटी रंगीन बनवतो ..

माझ्या हातून काही घडतही नाही 
दुनियेचे त्यावाचून अडतही नाही  
खाना पिना सोना जिंदगी माझी 
सिग्रेटीचा धूर हीच ओळख माझी ..

बाबा, सिग्रेटच्या प्रत्येक झुरक्यात 
तुमची आठवण होत असते 
प्यान्टच्या खिशातून हडपलेल्या 
नोटांची धुंदी स्मरत असते ..

काळजी केली नाही काल 
उद्याची मला नाही फिकीर 
तुम्ही नसल्यामुळे, आईची
कधीच ऐकत नाही किरकीर ..

दादाचे बोलणे नेहमीचेच 
इकडून ऐकत तिकडून सोडतो 
ताईच्या भविष्यवाणीला 
ठेंगा दाखवत मोकळा होतो ..

घरात लक्ष द्यायला मला 
नाही वेळ कधी मिळत 
अरबट चरबट खाण्याशिवाय 
दुसरे काही नाही गिळत ..

घरात लक्ष देत बसलो तर 
दोस्तांशी कसा जमायचा मेळ 
दोस्त आहे तर जिंदगीत 
रमतो जुगारी पत्त्याचा खेळ ..

आयजीच्या जिवावर बायजी उदार 
तुमच्या शिलकेवर माझी मदार 
मनसोक्त बेफिकीर बनलो आहे 
वाया गेलेला म्हणून गणलो आहे ..

बरं झालं बाबा, तुम्ही 
आता जिवंत नाहीत -
तुमच्या उपदेशाचे डोस
मला ऐकावे लागत नाहीत ..

नाहीतर येताजाता ते
ऐकत बसावे लागले असते  
माझ्या अख्ख्या जिंदगीला  
बरबाद व्हावे लागले असते ..
बरबाद व्हावे लागले असते ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा