नऊ चारोळ्या -

दैव -
क्षणैक वासना
बळी निष्पाप जाई -
सग्यासोयऱ्याना
जगण्यास ताप होई ..
.
आशा -
कोण जाणे उद्याचे जिणे
जगणे होईल का नाही -
जमेल तसे जगावे म्हणतो
वाट पाहू दे मरणालाही ..
.

सुटका नाहीच -
'करवा चौथ' पुरती आज
गरज चाळणीची भासते 
उद्यापासून हाती पुन्हा   
 नेहमीचे लाटणे असते !
.

दलाली दंगा -
काय करू आम्ही सांगा
तुम्हीच आता  पांडुरंगा 
आमच्या रांगेभवती का 
दलालांचा चालू  दंगा !
.

दु:ख -
कितीदा ऐकवशील तू मला
"पावसात भिजायची हौस मला"-
तू नसताना, माझ्या आसवांचा
कसा दिसणार पाऊस तुला!
.

काळजी -
काळजी करत बसल्यामुळे...
झोप पाखरासारखी उडून जाते -
 झोप उडून गेल्यामुळे
काळजी गोचिडासारखी चिटकते !
.

मौनाचे हत्यार -
कुणी वाराने जखमी करते
कुणी शब्दाने जखमी करते -
जगावेगळी तिची रीत पण  
मौनाने ती जखमी करते !
.

काय करावे -
खडाजंगी सासू सुनेची 
चालली होती जोरजोराची -
"तुम्ही मधे पडू नका "
तंबी होती 'महिला दिना'ची ..
.

बायकोगिरी  -
काय करावे समजत नाही 
सभा गाजवून येतो मी -
बायको समोर दिसताक्षणी 
मान का खाली घालतो मी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा