माणूस

       
        "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे" - असे नेहमी म्हटले जाते. 'माणूस' हा असा कोणता प्राणी आहे की, ज्यामुळे त्याला महत्व द्यावे ? माणसाला 'जनावर' म्हटले तर बिघडले कुठे ? जनावर पोटासाठी धडपडते. माणसाचीही हालचाल, धडपड पोटासाठीच ना ? तरीही माणूसच श्रेष्ठ का ? स्वर्गात इंद्र, ग्रहात सूर्य, पाताळात शेष, तसा भूलोकात 'मानव' श्रेष्ठ ठरतो. त्याला एकमेव कारण म्हणजे देवाकडून किंवा निसर्गाकडून त्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट देणगी - 'बुद्धी' !

        या एकाच देणगीमुळे मानवाचे वेगळेपण आहे. डोके आहे म्हणून बुद्धी आहे ! (नियमाला अपवाद म्हणून कांदे-बटाटे भरलेले आढळणारच !) पुढे इंजिन म्हटल्यावर मागे डबे, प्रवासी, माल सारे काही आले. तद्वतच बुद्धी म्हणजे नम्रता, तत्परता, ज्ञान हे गुण आलेच ! कुठे कसे बोलावे व कुठे कसे वागावे याचे तारतम्य तो बाळगू शकतो. आजचा मानव सुजाण, सज्ञान व सुशिक्षित आहे ! आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्यास तो समर्थ आहे. तो स्वत: कष्ट करून ईप्सित साध्य करण्याइतपत तो स्वावलंबी आहे. लेखन, मुद्रण (विशेषेकरून भाषण) वगैरे कलात तो पारंगत आहे, हे कशामुळे ? बुद्धीच्या जोरावरच तो सर्व काही करू शकतो ! आजचे युग 'विज्ञान युग' का म्हणतात ? मानवाच्या कर्तबगारीमुळेच ! निर्जीव पाषाण युगातून त्याने चैतन्यमय औद्योगिक युगापर्यंत प्रगती करत आणली आहे !

        रस्त्यावरून जाण्यास मोटारी काय, हवाई उड्डाणास विमाने काय आणि सागर सफरीसाठी बोटी काय ? सारे चमत्कारच ! घरात बसून आजचा माणूस दूरवरच्या बातम्या श्रवण करतो. दूरचित्रवाणीवर 'दृष्टीआडची सृष्टी' पाहू शकतो. अगदी विचार न करता येण्यासारख्या , कल्पनेतही साकार न होणाऱ्या गोष्टींना माणसाने मूर्त स्वरूप दिले आहे .

        वानरजन्मातून मानवजन्म झाला म्हणतात. आता मानवजन्मातून यंत्रमानवाची निर्मिती झालेली आहे ! भूगर्भातील खाणीपासून ते चंद्रावरील मातीपर्यंत त्याच्या बुद्धीची प्रचंड झेप दिसून आली आहे ! सारी शास्त्रे तो कोळून पीत आहे. त्याची मजल कुठवर जाणार आहे कुणास ठाऊक !

        बी रुजते, फोफावते- कशामुळे ? त्याला मिळणाऱ्या पोषक वातावरणामुळे, जमीन, पाणी, हवा - यामुळे ! तसेच मानवाच्या बुद्धीचे आहे. आजूबाजूच्या कालमाना परिस्थितीनुरूप त्याच्या बुद्धीला चालना, प्रेरणा मिळत असते. प्रयत्नाचे खत,अनुभवाचे पाणी व स्मरणशक्तीची हवा यांमुळे त्याचा बुद्धीवृक्ष फोफावत असतो.

        केवळ बुद्धीमुळे माणूस श्रेष्ठ आहे काय ? सकलगुणसंपन्न मानवाला महत्व आहे- ते त्याच्याजवळील अंत:करणामुळे, त्यातील भावनांमुळे ! त्याच्या सुख, दु:ख, काम, क्रोध, लोभ वगैरे भावलहरीमुळे ! हे सारे असून एकतेत भिन्नता आपल्याला आढळते. जगातील माणसे एकसारखीच दिसत नाहीत. 'जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती !' एकच माणूस स्वत:कडे पाहतो- पण आरशातून त्याला दिसते ते डाव्याचे उजवे भाग झालेले ! एक दुसऱ्यासारखा नसतो. श्रीमंत-गरीब , उदार-चिक्कू हे सारे वर्ग बुद्धीच्या कमी-अधिक उपयोगानुसार पडतात ! पैशाने दरिद्री असणारा अंत:करणाने श्रीमंत आढळतो. काहीजण सुखात असतात. काहीजण दु:खातही सुख मानणारे निघतात. पैशांच्या मार्गावरून बुद्धीच्या साधनाने माणुसकीचे साध्य साधणारे विरळच !

        माणसाची प्रगती अधोगती त्याच्या गुणावगुणामुळेच होत असते. एक कर्तव्यदक्ष, दुसरा कर्तव्यच्युत ! एकाची वृत्ती अत्त्युत्साही , दुसरा आळशी ! पहिला सुष्ट, दुसरा दुष्ट ! साधे सरळ उदारमतवादी थोडेच !  Simple living and high thinking असणारे दुर्मिळच !

        माणसाच्या बुद्धीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जातीधर्म वगैरे मानत नाही ! पाण्याशिवाय विहीर म्हणजे भावनारहित बुद्धी ! पण आज असे म्हटले जाते की, आजचा मानव प्रेम, माया, ममता ह्यापासून दूर चालला आहे ! हा बुद्धीचा ऱ्हास म्हणायचा ? भावनेशी प्रतारणा समजावी काय ? पूर्वी मत, पिता, गुरु, वडीलजन यांचा यथोचित आदर होई. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली जाई. पित्याच्या आज्ञेखातर मातेचे मुंडके परशुरामाने उडवले खरे, पण तपश्चर्या सामर्थ्याने माता जिवंत होऊ शकली ! आजचा तरुण बाई बाटलीच्या नादात माता-पित्यावर शस्त्र उगारणारा आहे ! आजचा मानव आईची आज्ञा तंतोतंत पाळतो- पण ती आज्ञा असते - स्वत:च्या मुलांच्या आईची !

        आजच्या माणसाची बुद्धी स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्याशी ती समन्वय साधू पाहते ! आज मानवाला काम-धंदा-व्यवसायानिमित्त घरदार सोडावे लागते. शिक्षणात, कामधंद्यात एकाग्रचित्त झाल्यावर इतरांचा (सोईस्कर ) विसर पडतो, 'बिचाऱ्या'ला समाजाचे बोलणे खावे लागते ! वास्तविक मायापाश तोडण्याची, इतरांपासून दुरावण्याची त्याची इच्छा का असते ? आपापल्या कार्यात प्रवीण होऊन भवितव्य उज्वल करण्याचा प्रयत्न मानवाने केल्यास त्या वावगे काय ?

        प्रत्येक माणूस आपपल्या क्षेत्रात प्रगतीशील असतो. प्रयत्न व चिकाटी हे त्याचे साथीदार आहेत. छत्रपती शिवाजी, उदारमतवादी अकबर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक ही नावे त्यांच्या उपाधीमुळे चटकन ध्यानात येतात ! अहिंसावादी गांधीजी, लहानमुलांचे चाचा नेहरू, बालकवी ठोंबरे, स्वरसाम्राज्ञी लता- ही स्वकर्तृत्वाने तळपणारी नावे आहेत.

        हायड्रोजन व ऑक्सिजन एकत्र आले की पाणी तयार होते. तद्वत डोके व बुद्धी योग्य प्रमाणात 'माणूस' तयार करण्यास कारणीभूत होतात. एक गाय, देव अनेक- त्याचप्रमाणे एक माणूस पण त्याची रूपे अनेक आहेत, विविध आहेत !
.               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा