शिकार

                              "बसप्पा, ए बसप्पा !"
     - बंडूने टेबलावरील घंटी बडवल्यावर, तोंडाने शिपायाला हाका मारायला सुरुवात केली. डोक्यावरची टोपी गुडघ्यावर ठेवून स्टुलावर बसलेला बसप्पा एका हाताने आपले डोके कराकरा खाजवत बसला होता. साहेबानी आपल्याला बोलावल्याचा आवाज त्याच्या कानात कसाबसा शिरला. पटकन डोक्यावरची टोपी पुढा-याच्या टोपीसारखी कलती ठेवून, चपलेत पाय अडकवून 'आलो साहेब' अशी आरोळी ठोकतच तो बंडूच्या केबीनमधे शिरला.

"साहेब, आपण मला बोलीवलात ?" बसप्पाने विचारले.

"होय साहेब, मी तुम्हालाच बोलावलं बर का !" चिडूनच बंडू उत्तरला.
       
                   पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्याची मुद्रा धरण करून बसप्पा एकदम 'चूप' झाला ! पण त्याच्या कानांना थोडेसे कमी ऐकू येत होते, त्याला तो तरी काय करणार म्हणा ! बंडूला तो हे सांगणार कसे ! नाहीतर बंडूने त्याचे नाव 'बहिरप्पा' ठेवायला कमी केले नसते.

              एक रुपयाची नोट खिशातून काढून ती बसप्पापुढे धरत बंडू म्हणाला- "हे बघ, पोस्टात जा. ऐंशी पैशांची कार्ड घेऊन वीस पैसे परत आण !"

        ती नोट हातात घेऊन तिची घडी घातली व बसप्पा खोलीबाहेर निघाला.

        "वेंधळाच आहे लेकाचा !" स्वत:शीच पुटपुटत बंडूने समोरच्या उत्तरपत्रिकेच्या गठ्ठ्यात तोंड खुपसले.

        बंडू धडपडे 'महाराजा महाविद्यालया'त 'बायोलॉजी विभागा'चा प्रमुख होता. तो एमेस्सीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्या मानाने त्याला हे प्रमुखपद लवकरच मिळाले होते. दिसण्यात तो रुबाबदार होता. नवीन कपड्यांचा त्याला फार षौक. फ्रेंच राज्यकर्त्याप्रमाणे त्याने गालावर केसांचे कल्ले राखले होते. चालू फ्याशनचा तो भोक्ता होता !

        अशा या बंडूची महाविद्यालयात इतरांवर छाप न पडेल तरच नवल !
पी.डी.पासून लास्ट इयरच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचा घोळका सदैव त्याच्या अवतीभवती असे ! किंबहुना गोपीतला कृष्ण अशी त्याची चेष्टा त्याचे सहकारी करत !

        या घोळक्यानेच बंडूचा सारा घोळ झाला. त्याच्या बायोलॉजी विभागात दोन डेमोनस्ट्रेटर्स होत्या. मिस सुनंदा कावळे नि दुसरी मिस कुंदा सावळे !

        सुनंदा कावळे ही महाविद्यालयाच्या प्राचार्याची कन्या ! रंग काळाकुळकुळीत, दोन दात ओठांच्या सदैव पुढे येण्याच्या स्पर्धेत टपलेले, आखूड केसांना लांबलचक गोंडे बांधलेले ! (बंडूला 'त्या'कडे पाहून म्हशीच्या शेपटाची आठवण होई !) असे एकंदरीत 'ध्यान' (हा बंडूचा खास शब्द!) होते ते !

        ह्या उलट कुंदा सावळे ! काळीसावळी पण स्मार्ट शरीरयष्टी होती तिची. चुणचुणीत व टपोरे डोळे असलेली 'कुंदा' पहिली की, बंडूला 'विजय स्वीट होम'मधील 'कुंदा'ची आठवण व्हायची व नकळत त्याची जीभ ओठावरून फिरायची !

        ह्या त्रिकुटात गंमत अशी झाली होती की, सुनंदा कावळे टपली होती बंडूच्या प्रेमावर, तर याची गंधवार्ता नसणारा बंडू पडला होता कुंदा सावळेच्या प्रेमात ! सदैव विद्यार्थ्यांच्या घोळक्यात असणारा बंडू अक्षरश: वैतागला होता. दोन सविस्तर मनाची होत होती !

        बंडूने आज मनाचा निश्चय केला होता. काही झाले तरी आज कुंदाची गाठ घ्यायचीच ! गेले दोन तास त्याने उत्तरपत्रिकांचा गठ्ठा बाजूला फेकून दिला होता. एक चिठ्ठी त्याने प्रयत्न करून लिहिली होती. "आज ठीक सव्वाचार वाजता कँटीनजवळच्या बागेत ये.-बंडू "

        हे साधे सुटसुटीत वाक्य लिहायला त्याला पाचसहा कागदांची रद्दी वाया घालवावी लागली. पुन्हा पुन्हा आपली चिठ्ठी तो वाचत होता. पूर्ण समाधान झाल्यावर त्याने ती पाकिटात घातली. इकडे तिकडे कोणी नाहीसे पाहून, त्याने पाकिटाचे हळूच चुंबन घेतले. आता कुंदा भेटली की बस्स ! तिची 'शिकार' झालीच !

        बसप्पा डुलत डुलत बंडूच्या केबिनमधे शिरला. "साहेब, ही घ्या दोन कार्ड आणि ऐंशी पैसे परत !" दहा पैशांची आठ नाणी त्याने बंडूच्या पुढ्यात टाकली व तो हातातली कार्ड बंडूला देत म्हणाला.

        "बसप्पा, मी तुला आठ कार्ड आणायला सांगितली होती ना ?" - बंडूने विचारले .

        "नाही ! दोन कार्ड नि ऐंशी पैसे परत आणायला सांगितले होते साहेब !" डोक्यावरची टोपी नीट करत बसप्पा उत्तरला. ह्या मूर्खाशी हुज्जत घालण्यात काहीच अर्थ नाही, असे बंडूला वाटले. त्याने टेबलावरचे पाकीट उचलले. ब्स्प्पाला तो म्हणाला - "आता हे तरी काम नीट कान देऊन ऐक जरा ! हे पाकीट म्हत्वाचे आहे. 'प्रॅक्टिकल' हॉलमधे सावळे म्याडमना हे पाकीट देऊन ये. "

        बसप्पाने पाकीट घेतले. तो निघाला. "दुसऱ्या कुणालाही देऊ नकोस हं !" - पुन्हा एकवार बंडूने बजावले. "होय साहेब !" - असे म्हणत आपली मुंडी हलवत बसप्पा 'प्रॅक्टिकल' हॉलकडे निघाला.

        चार वाजून दहा मिनिटांनी बंडू सर्वांना चुकवून कँटिनजवळच्या बागेत आला. आंब्याच्या झाडाखाली त्याने आपला हातरुमाल पसरला आणि त्यावर त्याने अलगद बैठक मारली.

        एकेक सेकंद त्याला एकेक युगासारखा भासत होता ! त्याच्या डोळ्यासमोर कुंदाची मोहक मूर्ती उभी राहिली. बगिचात चिमणा-चिमणीचे एक जोडपे एकमेकाशी हितगुज करत बसले होते. काही रम्य कल्पना मनात येऊन बंडूने क्षणभर डोळे मिटले......

        दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे गच्च झाकले गेले ! "अरेच्चा, अगदी वेळेवर आली की ही !"- असे म्हणत त्याने हळुवारपणे आपल्या डोळ्यावरील हात बाजूला काढले. एका हाताने चक्क त्या हाताच्या मालकिणीला पुढे ओढले आणि स्मित करत तिच्याकडे पहिले !

        "बाप रे !" -असा उद्गार बंडूच्या तोंडून स्वाभाविकपणे बाहेर पडला. समोर दिसत असलेली, ती 'कुंदा' नव्हती- ती 'सुनंदा' होती ! तिचे ते पुढे आलेले दोन दात सुळ्यासारखे आपल्या छातीत कुणीतरी खुपसत असल्याचा त्याला भास झाला !

        "तू... तू.... तुम्ही ! इथ कशाला आलात ?" बंडूने कसेबसे विचारले.

        "तुम्हीच मला आमंत्रण पाठवले होते की बसप्पाकडून !" आपल्या पोलक्यातून ते 'पाकीट' बाहेर काढत सुनंदा कावळेने उत्साहाने उत्तर दिले !

        आता मात्र बंडूला आपल्याभोवती बसप्पा व हजारो कावळे 'कावकाव' करत घिरट्या घालत आहेत असे वाटले आणि मूर्च्छा येऊन तो पाठीमागेच कोसळला !

        मिस सुनंदा कावळे आपल्या चिमुकल्या रुमालाने त्याला वारा घालू लागली.

        कँटीनमधला रेडिओ गात होता-
 "शिकार करनेको आये थे, शिकार होके चले ....!"
.

(पूर्वप्रसिद्धी : सोलापूर समाचार -रविवार-१४-११-१९७१)     
.
       
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा