आप जैसा कोई जिंदगीमे आये....

                     पगाराचा दिवस उगवला अन मावळला ! संध्याकाळचा सूर्य स्वत:च क्षितिजरेषेच्या मीलनाने लालबुंद होऊ पाहत होता. पहिलटकरणीचे स्वागत ज्या उत्साहाने माहेरी होत असते, त्या उत्साहात प्रत्येक 'मिळवता' पुरुष आपल्या घराकडे पगाराच्या प्रसन्न सायंकाळसमयी निघालेला असतो ! मीच कसा अपवाद असणार ? पार्क मैदानाजवळ मोगऱ्याचा गजरा घेताच माझी पावले घराकडे झपझप निघाली !

        दाराच्या चौकटीतच पॉलिस्टरची फिकट गुलाबी साडी व म्याचिंग पोटिमा (खर म्हणजे 'ढेटिमा'!) ब्लाउज परिधान करून अगदी 'कशी करू स्वागता'च्या स्टाईलने अस्मादिकांची सौभाग्यवती सुहास्यवदनाने सामोरी आली ! डोक्यावरील सैलशा शेपट्यातला गुलाब तिच्या गालजोडीशी स्पर्धा करायला आसुसला होता ! प्रत्येक दिवाळसणासाठी जावई जसा टपून बसलेला आढळतो, तशी अवस्था पगाराच्या दिवशी सौ.ची झालेली आढळते !

           आमच्या लग्नाला दहा वर्षे होऊन, एकमेकांच्या सहकार्याने पाळण्याच्या सर्कशीची कसरत मोजून तीनवेळा आम्ही केली होती ! पण तीनवेळा ती पाळी चुकली, तरी एक तारखेला अस्मादिकांच्या अशा 'सुहास्य'मय स्वागताची पाळी
दहा वर्षात अद्याप चुकली नाहीच !

        तिच्या सुहास्याला शक्य तितक्या कारकुनी-स्मिताने प्रत्युत्तर देत मी घरात प्रवेश मिळवला. बटाटेवड्यांचा खमंग वास आसमंतात दरवळत होताच. गनिमाने आघाडी तर चांगलीच उघडली होती. दारूगोळा ठासून भरला होता. निमूटपणे मी रुमालातला 'गजरा' तिला दाखवून 'पांढरे निशाण' फडकावले ! वड्यांचा हल्ला परतवण्यास माझी जीभ मोर्चे बांधू लागली आणि सुमारे पंधरा मिनिटानंतर.....

        निवांतपणे वॉश घेऊन मी कॉटवर पेपर चाळत पडलो होतो. तेवढ्यात स्वैपाकघरात भांड्यांची उतरंड कोसळल्याचा आवाज आला. पेपर बाजूला टाकून मी त्वरेने आत गेलो. खर तर 'भूत भूत' म्हणूनच मी ओरडणार होतो, पण मघाशी चुळबुळ करणारी जीभ आता का स्थिर झाली कुणास ठाऊक ! समोरच्या अलौकिक दृश्याने माझे डोळे विस्फारले गेले !

        भांडी-कप-बशा-चमचे-थाळ्या या साऱ्यांचा खच इतस्तत: पडला होता. मी काहीवेळापूर्वीच आणलेला गजरा चोळामोळा होऊन निर्माल्यवत पडला होता. आणि या साऱ्या गबाळात सौभाग्यवती 'कडकलक्ष्मी'च्या अवतारात उभी ! डोक्यावर मिरवणारा गुलाब एखाद्या 'मेलेल्या' प्रेताप्रमाणे निश्चेष्ट होऊन तिच्या पायाशी पडला होता. केसाच्या प्रेमळ शेपटाने आता घट्ट बुचड्याचे रूप धरण केलेले होते, एक हात            
 कमरेवर आणि दुसरा हात 'लाटणेधारी' बनला होता !

        मघाच्या शांत पार्श्वभूमीवर आताचा हा उग्र तमाशा पाहून वाटलं तिच्या पार्श्वभागावर एक सणसणीत लाथ ठेवून द्यावी ! पण तो मोह मी क्षणार्धात टाळला, अन्यथा माझी लाथ लचकण्याखेरीज दुसर काय घडल असत !

        सौ.ला निमूटपणे शरण जात ऑफिसात हेडक्लार्कला (कामापुरता) जसा मृदू आवाजात किंचाळतो- तसा, मी वदलो-
"काय झालं राणीसरकार ! एखादा उंदीर अथवा झुरळ तर नाही ना दिसले आपल्याला कुठे ? झुरळाची मिशी टोचली नाही ना कुठे ? उंदराचे शेपूट तर लागले नाही ना कुठे ? "

        पण ती (महामाया ?) गप्पच उभी ! भर दिवसा तिच्या अंगाला स्पर्श करण्याच्या दुर्मिळ संधीने मी तिच्याजवळ जाणार, एवढ्यात- बहुधा माझा कुटील हेतू ओळखून ती चंडिका डाफरली -
"दूर व्हा ! पुढे याल तर खबरदार !"

मी- "अग पण एवढ - "

"एक शब्द बोलू नका ! या अशा अवतारात मी मुद्दामच उभी राहिलेय !" ती खेकसली.

मी डिवचले- "कशासाठी ?"

"मी तुमचा निषेध करतेय !" आपले टपोरे डोळे गरगरा फिरवत ती ओरडली.

"अग पण कारण तरी सांगशील की नाही (-माझे आई !)"

"मला आधी सांगा, माझ्या निषेधाची नोंद तुम्ही घेतलीय का ?"

"अर्थातच ! वाटल्यास 'अक्कलहुषारीने, राजीखुषीने, नशापाणी न करता, डोके ताळ्यावर ठेवून' सट्यांपपेपरवर तसे लिहून देऊ का ?"

ती चिडली- "फालतू बडबड पुरे !"

 पहा म्हणजे झाली की नाही कमाल ? विनोद करणारा जातो जिवानिशी नि ऐकणारा म्हणतो फालतू बडबड ! विनोदी लेखकांची कुचंबणा करणाऱ्यांचाही खर तर निषेध करायला हवा !

        तलवारीचे वार सपासप करावे तसे लाटणे माझ्यापुढे फिरवत ती (कैदाशिण ?) आणखी जवळ आली. त्यावेळी तिचे तसे रूप पाहून, एकाहून एक वरचढ विशेषणे मला स्मरणात येऊ लागली होती. परंतु स्थलसंकोचास्तव ती सारीच्या सारी विशेषणे इथे छापणे केवळ अशक्य आहे ! गरजू नवऱ्यानो, क्षमस्व !

        ती म्हणाली- "थट्टा-विनोद करण्याची ही वेळ नाहीय. मी रियली सिरीयसली तुमचा खराच निषेध करतेय !"

        आज सकाळी बहुतेक कुठल्यातरी पेपरात 'निषेध' विषयावरचा अग्रलेख तिने वाचला असण्याची शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी संथ स्वरात म्हणालो- "ठीक आहे !"

        माझ्याकडे एक विजयी स्मित फेकून ती कडाडली- "आज घरी कशाला आलात ?"

        नेहमीच्या सवयीने 'झक मारायला' असे शब्द माझ्या ओठावर आले होते, पण त्याचक्षणी पंधरा मिनिटापूर्वीची 'गुलाबी सुहास्यवदना' अशी सौ. डोळ्यासमोर उभी राहिली ! स्वत:ला सावरत मी उद्गारलो-
"आपण आधी कॉटवर बसून निवांत बोलू म्हणजे काही वाटाघाटीची शक्यता-"
त्यावर ती थोड्या खालच्या पट्टीत किंचाळली- "पण कॉटवर काही दगाफटका (उर्फ चावटपणा ! हे सूज्ञास सांगणे न लगे !) नाही करायचा काही. तर माझी तयारी आहे !"

        एका हाताने पिंजारलेल्या झिंज्या सावरत दुसऱ्या हाताने- खाटिक सुर परजतो त्या थाटात- लाटणे फिरवत ती माझी मानगूट पकडल्यागत बाहेरच्या खोलीत आली !

        आम्ही दोघे 'कॉटस्थ' झालो. शेवटी अक्कलवंतालाच गरज असल्याने काही काळानंतर  मीच बोलायला सुरुवात केली.
"का ग अबोला , का ग दुरावा
अपराध माझा असा काय झाला ?"

        तिनेही ताबडतोब धमकावले-
"भुला नही देना सैया
आज पहली तारीख है !"

        अशारीतीने उभयपक्षी 'संगीत' वाटाघाटीना प्रारंभ झाला. वातावरण थोडेसे निवळले. म्हणून मी डायलॉग फेकला- "आखिर कहना क्या चाहती हो !"

"पगाराचे पैसे कुठे आहेत ?" तिने आपल्या थंड नजरेने मला पुरते न्याहाळत थोड्याशा कठोर स्वरात (म्हणजे नक्की कसे कुणास ठाऊक ! पण वाचायला बरे वाटले ना ?) विचारले. मी मुकाट्याने कॉटवरून उठलो. हँगरवर टांगलेल्या पँटकडे निघालो.

        "थांबा !" - तिने आपल्या भेदक आवाजात हुकूम सोडला. मी 'हँडसअप' करून मागे वळलो. तिने लगेच फायरिंग सुरू केले. "तुम्ही बाथरूममध्ये असतानाच मी पँटशर्टचे खिसे तपासलेत. दोन रुपयांची एक नोट आणि दहा पैशांच्या तीन नाण्यांखेरीज इतर काही नाहीय त्यात !"

        "बाप रे !" - मी मनातच पुटपुटलो. सी.आय.डी.खाते एका कुशल नि कर्तबगार महिलाधिकारणीला मुकल्याची चुटपूट मला लागली. माझे मौन पाहून सौ. त्वेषाने उसळली- "कुठल्या मित्राला दिलाय सगळा पगार उसना ?"

        मी गुळमुळीत उत्तरलो- "कुणालाच नाही !"

        "मी खर्च करते, म्हणून दुसऱ्या कुणाजवळ ठेवलाय ?"

"मुळीच नाही !" मी शांतपणे म्हणालो.

"मग कुठल्या वाईट व्यसनात उडवला ?"

या बयेन आता मात्र कहरच केला हं ! मी जरा रागानेच ओरडलो-
"इतकी वर्षे आपण संसार केला
हेचि फल काय मम तपाला ,
सोन्यासारखी तीन मुले आपल्याला
तरी संशय का मनी आला ?"

त्यावर बेडरपणे ती सौभाग्यवती उद्गारली कशी- "उगाच गाण्यामधे ओरडू नका. नऊ वर्षे आणि अकरा महिने न चुकता एक तारखेला तुमचा पगार मला मिळत आलाय ! आजच का असे व्हावे मग ? आणि हे पहा- खिसेकापूने पाकीट मारल्याची थाप पचणार नाही, आधीच सांगून ठेवते !"

        "म्हणजे एक तारीख असूनही, मी घरी आल्याबरोबर पगाराचे पाकीट तुझ्या हातात आले नाही, म्हणून हा तुझा निषेध (उर्फ मूर्खपणा !) आहे तर !" - असे पुटपुटत मी रेडिओ लावून कॉटवर आरामात हातपाय पसरले. ('चावट' वाचकासाठी खुलासा- सौ.ने तेथून उठण्याची आधीच तत्परता दाखवलेली होती ! सौ.चा चेहरा भलताच चमत्कारिक झाला होता, मी तिच्याकडे जळजळीत नजरेने पहात म्हटले-
"हे पहा सौभाग्यवतीबाईसाहेबमहोदया ! असे बिनबुडाचे आरोप करणे खर म्हणजे आपला आजवरचा सुखी संसार लक्षात घेता चांगले नव्हे ! त्याबद्दल मीच तुझा निषेध करायला हवा ! इतकी बेछूट बडबड नि आक्रस्ताळी विधाने करायला तू काय स्वत:ला विरोधी पक्षाची पुढारीण समजतेस ? पण जाऊ दे. मी तुझ्यासारखा क्षुद्र मनाचा नाही. अग, तू मला नुसते विचारले असतेस तरी मी सगळा प्रकार सांगितला असताच ना !"

        एव्हाना तिच्या वर्तनाची शहानिशा होऊन, माझी बाजू भक्कम ठरून मी बेफिकीर झालो होतो. कधी नव्हे तो माझा आवाज 'चढू' लागला, अन तिचा चेहरा 'पडू' लागला. दोघानाही एकमेकांचा नवीन अवतार पहायला मिळाला. मोठ्या रुबाबात मी एक वाक्य फेकले- "मी शुद्ध प्रेमाने आणलेल्या गज-याची तू इकडे इतकी दयनीय अवस्था करशील याची, हे स्त्रिये, मला कल्पांतापर्यंतही  कल्पना आली नसती, तस्मात् मी तुझा त्रिवार धिक्कार करतो !" यावर सौ.ची अपेक्षित प्रतिक्रिया मला पहायची असल्याने मी डोळे मिटून स्वस्थपणे पडून राहिलो !

        वादळ थांबून, पावसाच्या सरी कोसळल्यागत तिच्या डोळ्याला धारा लागल्या. कुठलेही रबर तुटेपर्यंत ताणू नये, असा सूज्ञ विचार करून डोळ्यानीच मी तिला जवळ येण्याची खूण केली. हातातले लाटणे बाजूला ठेवून, डोक्यावरचा 'शिरपेच' त्यातल्या त्यात व्यवस्थित करत खाली मान घालून सौ. समोर बसली. मला वधूपरीक्षेची आठवण आली. पुन्हा एकदा मी तिला मनातून 'पसंत' केलं. इतकी शालीन, आज्ञाधारक, सोज्वळ वगैरे अर्धांगी मला एकट्यालाच मिळाल्याने माझा ऊर अभिमानाने भरून आला ! त्या अभिमानाच्या भरात होणाऱ्या मोहाला मी कटाक्षाने टाळले. मी समजावणीच्या स्वरात म्हटले- "अग, आज एक तारीख आहे, हे मी विसरलो असे वाटले तरी कसे तुला? तस असत तर महिन्यातला एकुलता एक गजरा मी आणला असता का ?"

        "पण मग आज पगार कुठे -"

               "ह्या महिन्यापासून पगारवाटपाची पद्धत बदलली आहे ."

               तिच्या पापण्या कुतुहलाने फडफडल्या. तिची पाठ हळुवारपणे थापटत (निम्मा गड सर केला होता ना मी !) मी सांगू लागलो- "आजवर पगाराची रक्कम 'रोख' मिळत होती. पण यापुढे ज्याच्या त्याच्या बँकखात्यात पगाराचे पैसे 'जमा' करणार आहेत."

        "ते का म्हणून ?" तिने विचारले.

        "कॅशिअरना एकाच दिवशी बर्डन पडू लागले म्हणून ! आम्ही सर्वानी मिळूनच असा निर्णय घेतला. ज्याला लागतील त्या दिवशी प्रत्येक कर्मचारी आपल्या खात्यातून पैसे आवश्यकतेनुसार काढून घेईल." मी समजावून सांगितले.

        माझ्या उत्तराने तिचे समाधान झाले. मुलांना शाळेतून यायला अजून वेळ असल्याने तिचा हात प्रेमाने माझ्या 'टकला'वरून (उगाच कशाला खोट सांगू !) फिरू लागला.

        "आणि त्यामुळेच माझ्या खिशात दर महिन्याप्रमाणे पाकीट भरलेले नाही ! तू सुतावरून असा स्वर्ग गाठशील याची मला सुतराम कल्पना नव्हती ! मी आपला आपल्या नाकासमोर आणि तेही सरळ पाहत चालणारा एक सभ्य कारकून ! तुमचा तो "निषेध- फिषेध" आम्हा पामरांना कसा कळणार ?....एक तारखेच्या पगाराचे अप्रूप तुम्हा बायकांना इतके वाटते ?"

        त्यावर सौ.ने "चुकले हो मी !" म्हणत चक्क माझे पाय धरले की हो ! नंतर माझ्या कानाजवळ आपले तोंड धरून ती पुटपुटली - "यापुढे मी महिलामंडळ आणि वर्तमानपत्र यापासून कायम चार हात दूर राहणार गडे !"
त्यावर मी लगेच "मग अजून अर्धा तास जवळ ये ना गडे !" म्हणत               
तिला जवळ ओढले.

        थोड्या वेळाने....कपाटातून माझे चेकबुक काढून एक 'चेक' मी फाडला. त्याची पावती सौ.ने लगेच 'च्युक' करून दिली !

        मी तिचा मुखचंद्र अलगद माझ्या करांजलीत धरताच, आमचा रेडिओ गाऊ लागला-

"आप  जैसा कोई मेरी जिंदगीमे आये ......."

.

(पूर्वप्रसिद्धी: संचार.रविवार.३०/०३/१९८६)
.    
                        
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा