लॉटरी

             लांबलचक झिपऱ्या वाढलेल्या, कित्येक महिने त्यांना तेल पहावयास मिळाले नसावे, अर्धी खाकी चड्डी आणि वर मळकट सदरा- अशा अवतारात 'तो' माझ्यासमोर बसलेला होता ! हाताचे तळवे आणि बोटांची नखे काळपट दिसत होती. लांबूनही त्याला 'बूटपॉलिशवाला' म्हणून ओळखणे अवघड गेले नसते. त्याचा अवतारच होता तसा !

        त्याच्या चेहऱ्याकडे आणि माझ्या हातातल्या 'तिकीटा'कडे मी आळीपाळीने पाहत होतो. माझ्या कुतूहलमिश्रित नजरेला त्याच्या अंतरंगाचा ठावठिकाणा घेणे जमेनासे झाले होते !

        "साहेब, मी खरच सांगतोय, या तिकिटावर माझा काहीही हक्क नाही" - तो पुन्हा पुन्हा मला बजावत होता.

        माझी मन:स्थिती द्विधा झाली होती. हातात आलेली लक्ष्मी लाथाडू नये म्हणतात, पण ही चक्क 'लुबाडलेली लक्ष्मी' ठरली असती ! माझ्या हातात त्या मुलाने दिलेले एक लॉटरीचे तिकीट होते आणि माझ्या टेबलावर पसरलेला वृत्तपत्राचा कागद त्या तिकीटाची किंमत 'एक लाख रुपये' असल्याचे सांगत होता ! माझ्या मनाच्या विचारांच्या झोक्याची आंदोलने क्षणाक्षणाला वाढतच चालली होती.

        "हे बघ बाळ, रुपया तुझा होता. लॉटरीच्या एजंटकडून तू तिकीट विकत घेतलस . पेपरात नंबरही तूच पाहिलास, तेव्हा या तिकिटाचा मालक तू स्वत: एकटाच आहेस." - मी त्याला समजावणीच्या स्वरात म्हटल .

        "मुळीच नाही साहेब. मी तिकीट विकत घेतल असल, तरी तो रुपया माझा नव्हता." त्याने केविलवाण्या चेहऱ्याने सांगितले.

        "म्हणजे ? कुठे चोरीबिरी तर केली नाहीस ना !" मी चिडूनच विचारल.

        "छे छे ! चोरी नाही केली साहेब."

        "मग ?"

        त्याच्या चेहऱ्यावर सांगाव की नाही, अशी चलबिचल स्पष्ट दिसत होती. मी हातातल तिकीट पेपरवेटखाली व्यवस्थित ठेवलं आणि खुर्चीवरून उठलो. त्याच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत म्हणालो, "बाळ, मला तुझ्या घरातल्या वडील माणसासारखा समज."


      तो उसळून म्हणाला -"तुमच्यासारख्या देवमाणसाची नख पाहण्याचीदेखील लायकी नाही साहेब माझ्या घरच्या माणसांची, साहेब !"

        "सांग सांग. मुळीच घाबरू नकोस, मी दुसऱ्या कुणालाही काही सांगणार नाही."- मी त्याला म्हणालो.

        "आपल्या बँकेसमोरच्या कोपऱ्यावरच मी बूटपॉलिशचा धंदा करतो, साहेब."
        मी उद्गारलो- "मला ठाऊक आहे ते !"

        बँकेचे साहेब आपल्यासारख्या य:कश्चित पोराला ओळखतात, या जाणिवेन तो किंचित्काळ सुखावलेला दिसला. डोक्यावरचे केस डाव्या हाताने उलट्या पंजाने मागे सारत तो म्हणाला- "तो शनवारचा दिवस होता. तुमच्या बुटाना मी पॉलिश केले. तुम्ही मला आपल्या पाकिटातून पाच रुपयाची नोट काढून दिली. मी तुम्हाला चार रुपये सत्तर पैसे परत-"

         "तू पैसे परत दिलेस आणि मी ते पाकिटात न मोजता ठेवले."- मी मधेच म्हणालो.

        तो खाली मान घालून म्हणाला-"तो तुमचा मोठेपणा झाला साहेब. मी तुम्हाला चार रुपये सत्तर पैसे देण्याऐवजी तीन रुपये सत्तर पैसेच परत दिले होते."

        "अरे मग एखाद्या रुपयाच काय एवढ मनावर घेतलस तू ?" - माझ्यातल्या 'मोठेपणा'न प्रौढीन विचारल. 

        "तुम्ही गडबडीत निघूनही गेलात. मी रोज हिशेब ठेवत असतो. त्यामुळे एक रुपया तुमच्याकडून जास्त आल्याचं मला त्या संध्याकाळीच समजल. मी घरच्यांना ते सांगितल . मला त्यानी शाबासकी दिली आणि कुणालाही न कळू देण्याबद्दल सुनावलं. साहेब, आजवर कुणाच्या नव्या पैशालाही मी फुकट हात लावला नाही. पण-"

        त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागल. तशातच तो बोलू लागला, "मी रुपया परत करणारच म्हणून घरच्यांना सांगितल. मला आईन त्याबद्दल खूप शिव्या दिल्या, तिथे बाकीच्यांचं काय सांगू ? मोह फारच वाईट ! एकदा रुपया परत करावा वाटे, तर एकदा वाटे बँकेच्या साहेबाला एक रुपयाची काय किंमत ! शेवटी विचार करून- मारुतीच्या पायाशपथ  सागंतो साहेब, मी त्याच रुपयाच हे लॉटरीच तिकीट घेतल होत आणि पेपरात नंबर पाहून पहिल्यांदा तुमच्याकडेच आलो."

        काही कळण्याच्या आतच त्याने माझे पाय धरले. बुटावर पाण्याचा शिडकावा चालूच होता !

        "साहेब, खरच मी चोर नाही हो. तुम्हाला वाटतो का मी चोरासारखा ?" - तो मला विनवणी करून विचारत होता.

        "उठ बाळ, उठ ! तू चोर तर मुळीच नाहीस, पण तुझ्यासारखा मनाने श्रीमंत तर कुठेच सापडणार नाही साऱ्या शहरात ." मी त्याला हाताला धरून उठवले.

        त्याच्याच नावावर मी बँकेत खाते उघडून, त्याच्या सल्ल्याने त्या रकमेचा विनियोग करण्याचे मनात पक्के ठरवले. लाखमोलाच्या तिकिटापेक्षा अशी लाखमोलाची अंत:करणे परमेश्वराने निर्माण केली, तर काय बहार होईल, याचा विचार करण्यात वेळ जात असतानाच-

        "साहेब, तुमच्या डोळ्यात पाणी ?" - तो बूटपॉलिशवाला विचारत होता.

 आणि ....मी ओल्या हाताने 'मुदत ठेवी'चा फॉर्म शिपायाकरवी मागवण्यासाठी घंटी वाजवली.
.

(पूर्वप्रसिद्धी: स्वराज्य शनिवार १७.०९.१९७७)
.

             

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा