असाही एक खून -


             मोरगावला वासुदेव आणि नामदेव हे दोघे एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र ! एकमेकांना काहीच वावगे वाटू नये, अशी त्यांची जिगरी दोस्ती. शाळेत एकदा वासुदेवाच्या शेंडीला कुणीतरी गाठ मारली होती. रागाने लालबुंद झालेला वासुदेव सापडेल त्याला यथेच्छ बुकलत सुटला होता. शेवटी नामदेवाची पाळी आली. खाली मान घालून नामदेव म्हणाला- "मी चुकलो, पुन्हा कधी चेष्टा करणार नाही !" वासुदेव क्षणार्धात निवळला. टेबलाजवळ जाऊन त्याने सर्व मुलांची माफी मागितली. नामदेवाने त्याला कडकडून मिठी मारली.
असे हे दोन मित्र काळाबरोबर आपली मैत्री वाढवतच होते.

        अभ्यासात दोघांची चुरस असायची. कधी नामू पहिला, तर कधी वासू पहिला. कधी त्याच्या उलट, पण दोघांच्यामधे तिसऱ्याकुणाचा नंबर कधी आला नाही. खेळायच्या तासाला दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी- त्यामुळे खेळात औरच मजा ! दोघे एकाच संघात असणे, केवळ अशक्यप्रायच. तरी एकमेकांबद्दलचा द्वेष कधी कुणाला जाणवला नाही. खेळापुरता खेळ, तेवढ्यापुरताच दोघात हार-जीत- अशी ही दोन्ही गुणी बाळे मोठी झाली. दोघांच्याही ओठावर मिसरूड फुटू लागलं होतं . दोघानाही जाणवू लागल होत की, आपण आता कुणीतरी समजदार मनुष्य झालो आहोत !

        शालेय जीवन संपले !

        आयुष्याच्या नव्या वाटा शोधायचं जिकीरीच काम ठरवायचं वय आल ! वासुदेव आणि नामदेव दोघे एकत्र बसले. कॉलेजजीवन दोघांपैकी एकालाच शक्य होते. वासुदेवचे मामा सोलापुरात राहत होते. ते आपल्या भाच्याला शिक्षणासाठी ठेवून घेण्यास तयार होते !  नामदेव परिस्थितीन तसा गरीब, पण वासुदेव स्वभावाने त्याहून गरीब. वासुदेवने नामदेवला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह चालवला. आग्रह इतक्या थराला गेला की, वासू म्हणाला- "नामू , जाऊ दे ! कॉलेज शिकून तरी काय फायदा ? तू येत नाहीस, तर मीही सोलापूरला जात नाही !" नामूने त्याची कशीबशी समजूत काढली. चार हितोपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. ज्याला शिकण्याची व्यवस्था आहे, त्याने ज्ञानार्जन कसे करत राहावे, व ज्याचे शिक्षण मर्यादित आहे, त्याने त्यातूनच विकास कसा साधावा- यावर भलेमोठे व्याख्यान नामूने दिले.
       
        वासूला आपल्या गरीब मित्राची बौद्धिक पातळी हिमालयाहून उंच भासू लागली व मनाची श्रीमंती तर कुबेराच्याहून अपार असल्याचे आधी अनुभवलेच होते !

        पाहता पाहता दहा वर्षे निघून गेली ! दोन्ही मित्र आपापल्या व्यवसायात रममाण झाले.

             एके दिवशी रात्रीच, एक पोलीस फौजदार हाताखालच्या तीनचार शिपायांबरोबर मोरगावला काही कामानिमित्त आले. आल्याआल्या त्यानी पोलीसपाटलाला बोलावणे धाडले. जेवणखाण झाल्यावर तास दोनतास कामाबद्दल चर्चा झाली. दुसरे दिवशी सकाळी उजाडताच, पोलीसपाटलाचा कोतवाल नामदेव मास्तरकडे फौजदाराच्या हुकमाच्या तामिलीसाठी पळाला. त्याने मास्तरला निरोप दिला- "फौजदार सायबाने पटदिशीन तुमास्नी बोलीवलय !"

        मास्तर नुकतेच झोपेतून उठून, चुळा भरत होते. शर्ट टोपी अडकवून ते चावडीकडे घाईघाईत निघाले. चावडीजवळ हीsss गर्दी जमलेली. जो तो उठतोय आणि विचारतोय- "काय आक्रीतच घडलय म्हनायचं का वो ?"

        चावडीच्या पायरीशी मास्तर उभे राहिले. फौजदार साहेब चावडीतच येरझाऱ्या घालत होते. मधूनच आपल्या पल्लेदार मिशाकडे हाताचा पंजा उलटा वळवत होते. थोडी राखलेली दाढी व डोळ्यावरचा चष्मा त्यांच्या रुबाबदार देहयष्टीला आणखीनच भारदस्तपणा आणत होता. त्यानी मास्तरकडे एक नजर टाकली. थोडीशी त्रासिक मुद्रा करत ते चावडीतूनच आपल्या बुलंद आवाजात गरजले- "या गावातले मास्तर ना तुम्ही ?"

    नामदेव मास्तर नखशिखांत थरथरले. एक आवंढा गिळत म्हणाले- "हो, मीच मास्तर आहे."

        फौजदाराने मास्तरला चावडीत वर येण्याची खूण केली. स्वत:ला कसेबसे सावरत मास्तर वर गेले. आता पुढे काय घडणार, ह्या कल्पनेने सर्वांची उत्सुकता, भीती एकाचवेळी ताणली गेली ! आपल्या शिपायांकडे व आजूबाजूच्या गावकऱ्यांकडे आपली भेदक नजर टाकत फौजदार गरजले- "मास्तर, आम्ही तुमच्यावर खुनाचा आरोप ठेवतोय !"

        मास्तरने फौजदारसाहेबापुढे चक्क लोटांगण घातले. ते बघून फौजदार ओरडले- " उठा उठा ! हे शोभत नाही तुम्हाला. करुनच्या करून वर असा हा कांगावा आणखी ? आठवता का जरा - दहा वर्षाखाली याच गावातून, तुम्ही आपल्या "वासुदेव" नावाच्या मित्राला येथून हाकलले. त्यानंतर कधी कुणाला दिसलाय का तो ? बिचाऱ्याच्या "मैत्रीच्या भावने"चा तुम्ही खून केला मास्तर, खून ! आणि हो- तसा खून तुम्ही केल्यामुळेच, आज तुमच्यापुढे हा फौजदारचा पोशाख अंगावर चढवून मी इथे उभा आहे, समजलात का ?"

        एव्हाना मास्तरांचे डोळ्यातले अश्रू फौजदारांचे पाय ओलेचिंब करून राहिले होते. त्यांचे शरीर आनंदातिशयाने संकोचले.

        "वासुदेव-" म्हणत मास्तरांनी उठून फौजदारसाहेबाला मिठी मारली. एवढा मोठा तो फौजदार ! पण त्याचाही चष्मा घळघळा पाझरू लागला !

        फौजदार-मास्तरांच्या मिठीमुळे दोघांच्या डोळ्यातले अश्रू एकजीव होऊ लागले. त्यानी सर्वांच्या साक्षीने विशुद्ध मैत्रीची ग्वाही दिली !
.


(पूर्वप्रसिद्धी : सोलापूर समाचार. रविवार .०७/१२/१९७५)
.    
                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा