प्रामाणिक

                    ऑफिसमधून येऊन घरी नुकताच कॉटवर पहुडलो होतो. परंतु आमच हे सुख कुठल बघवतय दुसऱ्यांना ! इकडून हुकूम सुटला- "हे पहा, अजून अर्धा तास रेशनच दुकान उघड आहे. घरात चहाला साखर नाहीय ! लवकर जा आणि घेऊन या !" धडपडत उठलो झालं ! गरज होती ना चहाची !

                       पण अशावेळी सर्वच गोष्टी कुठल्या वेळेवर व्हायला ? कार्ड, पिशव्या, पैसे, सायकल या साऱ्या गोष्टी जमवण्यापासून तयारी. ज्वारी आणावयास म्हणून शेजारच्या राघूअण्णांनी गेल्या आठवड्यात नेलेल कार्ड, त्यानी शेजारधर्माला जागून अद्याप परत केलेलं नव्हत. पोरांनी शाळेला नेलेल्या पिशव्या, घरी यायची वेळ झाली होती. दारात स्टँडला लावलेली सायकल आमच्या मेहुण्यानी लंपास केली होती. आपलीच सायकल, आपलाच मेहुणा. सांगतो कुणाला ?

                   मी पुन्हा कॉटवर येऊन आरामात तक्क्याला टेकून बसलो. तेथूनच ओरडलो- "सायकलसकट सर्व वस्तू आधी एकत्र जमव, तोपर्यंत मी उठणार नाही बर का ग !"

               माझ्यापेक्षा दुप्पट जोराने आतला आवाज कानावर आदळला- "मला तेवढाच धंदा नाही बर का हो ! संध्याकाळचा स्वैपाक आटपायचा आहे." त्यापाठोपाठ दोन चार भांड्यानीही आवाज करून, आतून आलेल्या आवाजाला अनुमोदन दिले !

                  इतक्यात- "अण्णा, सायकल मोडली, मोडली", असे ओरडत धाकटे युवराज शंखध्वनी करत कॉटजवळ आले. पुन्हा मी उठलो (आराम हराम है ना !). दारातून पाहिलं- आमचे मेहुणे सायकलच्या चेनशी कुस्ती खेळत होते. त्यांना आधी राघूअण्णांकडे पिटाळले व चेन बसवली. धाकट्या युवराजांच दप्तर फेकून, पिशवी मोकळी केली. तेवढ्यात थोरले युवराज आलेच. त्याचंही दप्तर काबीज केलं. कार्ड, पिशव्या नि सायकल या तिन्ही गोष्टी अस्मादिकानीच जमवल्या !

                        शर्ट-पायजमा अंगात चढवला आणि सौ.ला चहासाठी आधण ठेवण्याची सूचना देऊन घरातून बाहेर पडलो. सायकलवर टांग मारली. चहाची इतकी तलफ आली होती की बस्स ! पण हॉटेलात जाऊन पंधरा पैशांचा गुळाचा चहा घेणे, खिशालाही परवडणारे नव्हतेच ! शिवाय एक तारखेला अजून आठ दहा दिवस अवकाश होता.

                  "आर ए बाबा, डोळ फुटलं का र तुझ ?" - असे शब्द कानावर येताच, चहाची तलफ क्षणार्धात नष्ट झाली. काय घडल हे पाहण्याच्या उद्देशाने मी इकडे तिकडे पाहिले. मी चक्क एका भाजीवालीला सायकलने ढकलले होते. भाजी पार इतस्तत: विखुरली होती. "ह्या इसमाने आज जरा जास्तच घेतली असावी !"- अशा संशयाने सर्वांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. माझा 'कारकुनी' चेहरा अधिकच केविलवाणा झाला ! न उतरता मी सायकल तशीच दामटली !

                   रेशनदुकान येताच हायसे वाटले. गर्दी विशेषशी नव्हतीच. माझा नंबर लवकर लागला. पावती घेतली व पैसे देण्यासाठी खिशात हात घातला मात्र-
खिशातून पैशाऐवजी, रिकामा हातच बाहेर काढला. कारण गडबडीत पँटऐवजी पायजमा घातला, त्याचा हा परिणाम ! पावती व कार्ड दुकानात ठेवून, पुन्हा घराकडे निघालो. दारातच सौ.चे स्वागत कानावर आले- "पैसे राहिले वाटते न्यायचे ." काही न बोलता मुकाट्याने घरात शिरलो. हँगरवरची पँट खसकन ओढली. दोन्ही तिन्ही खिसे नीट चाचपले. पण छे ! खिसे रिकामेच होते. बुशशर्टचेही खिसे पाहिले. कागदाच्या तुकड्याशिवाय काहीच आढळले नाही.

                    "अग ए - " म्हणत, तणतणत स्वैपाकघरात गेलो. "पैशाच पाकीट घेतलस का ग ?" - तिला विचारले.

                         "मी कशाला घेत्येय ? पहा इकडे तिकडे, ठेवलं असेल तुम्हीच कुठेतरी !" सौ.चे उत्तर.

                      शहाण्यासारखा विचार करून, आधी सौ.ची पर्स हातात घेऊन, त्यातले पाच-सहा रुपये घेतले आणि परत दुकानाकडे निघालो ! म्हटल पाकीट नंतर शोधता येईल !

                     दुकान बंद व्हावयास आल होतंच . पट्कन रेशन ताब्यात घेतल, पैसे दिले आणि निघालो. वाटेत विचार केला. पाकीट तर खिशात नक्कीच असल पाहिजे पँटच्या. कारण सौ.ने फारतर त्यातले पैसे काढून घेतले असते. मुलेही कधी पँटला हात लावत नाहीत. त्यामुळे त्यानी पाकीट घेणेही अशक्यच. ऑफिसातून निघालो, त्यावेळी पाकीट खिशातच होत. विसरण्याची शक्यता नाही. हां ! एखादेवेळेस सिगारेटच्या दुकानात विसरलं असेल.

                   मी सायकलचा रोख पानपट्टीच्या दुकानाकडे वळवला. "या साहेब." पानपट्टीवाल्यान स्वागत केलं. मी "माझ पाकीट दुकानात विसरलं काय ?" याची चौकशी केली. सिगारेट घेताना मी पाकिटातूनच पैसे काढून दिले होते.

               "वा साहेब ! विसरला असतात, तर घरी आणून दिल असत की तुमच्या !"

                    तेही खरच होत म्हणा ! कारण तो पूर्णपणे परिचित होताच मला. खरंच कुठे गेल बर मग माझ पाकीट ?

                       घरी आल्यावर सर्व कपडे, कोनाडे शोधले. सर्वांकडे नीट चौकशी केली. पण पालथ्या घड्यावर पाणी. कुणीच पाहिलं नव्हत माझ पाकीट . आता मात्र माझा धीरच खचला. पाकिटात सुमारे वीसएक रुपये तरी सहजच होते. सकाळीच एका मित्राकडून, उसने म्हणून नेलेले पैसे त्याने परत दिले होते. तेवढ्यात सौ.ने 'साखरे'चा चहा टेबलावर आणून ठेवला. मी तो घेतला, पण तेव्हा तरी मला तो गुळाचाच वाटला ! सुन्न होऊन मी आरामखुर्चीवर बसलो. मुलेही चिंताक्रांत चेहरा घेऊनच अभ्यासाला लागली. सौ.ने मात्र मला उपदेश केला- "अहो तुम्ही तरी काय करणार त्याला ? आपल्याच नशिबात नव्हते ते पैसे, असे समजा ."

                      "पान वाढली आहेत. जेवून घ्या !" - सौ.चा हुकूम सुटला. निराश अंत:करणानेच आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवण अर्धेमुर्धे होताच माझ्या आडनावाने कुणीतरी खिडकीतून हाक मारली. "कोणाय ?" असे विचारत सौ.ने दार उघडल. आम्ही आपल जेवतच होतो ! एवढ्यात सौ. माझे पाकीट हातात घेऊनच आली.

                 "माझ पाकीट !" मी हर्षातिरेकानेच ओरडलो.

                 "आधी पोटावर लक्ष द्या, मग पाकिटावर !"- सौ. म्हणाली. पण सौ.च्या असल्या विनोदावर लक्ष देण्याइतका मी शुद्धीवर नव्हतोच मुळी ! भरभर जेवण करू लागलो होतो मी- कधी न जेवल्यासारखा . बाहेर सौ. कुणाशीतरी बोलत होती. माझ्या कानावर थोडे थोडे शब्द येत होते.

                 "पानपट्टीच्या दुकानाजवळ पाकीट सापडलं. पाकिटावर नाव, पत्ता होता. म्हणून आलो !" - लहान मुलाचा आवाज येत होता.

                "थांब हं ! चहा घेऊन जा बर का !" - असे त्याला सांगून, सौ. स्वैपाकघरात आली. तिचीही कोण धांदल उडालेली दिसत होती. मीही सर्वांना उद्देशून म्हणालो- "बघा ! आजच्या युगात असा प्रामाणिकपणा कुठे आढळायचा नाही. पाकीट चांगल्याच्याच हाती पडल म्हणून बर ! नाहीतर चुरमुरे फुटाणे खात बसावे लागले असते आठवडाभर ! जगात अजूनही अशी प्रामाणिक माणस आहेत, म्हणून चाललय बर हे जग !" इतक्यात मला जोराचा ठसका लागला.

                "अहो, सावकाश जेवा आधी नि मग भाषण ठोका !" सौ.ने दटावले. चांगला तांब्याभर पाणी प्यालो. हात धुतले नि मग बाहेरच्या खोलीत आलो. बारा तेरा वर्षांचा एक मुलगा चुळबुळ करत उभा होता.

                "बस रे इथ !" मी त्याला म्हणालो.

                "नको. जातो मी ! अंधार जास्त पडतोय !" तो म्हणाला.

                त्याला बळेच खुर्चीवर बसवले. मी पाकीट उघडून पाहिले . एकोणीस रुपये व थोडीशी चिल्लर ! सर्व ठीक होते. एक अधेली त्याच्या खिशात मी बळेच कोंबली.  त्यासरशी तो फारच भेदरला !

               "अरे, असा घाबरतोस काय इतका ?" - मी समजावणीच्या सुरात त्याला म्हटलं . मी त्याची आणखी चौकशी करणार, इतक्यात सौ.ने चहाची कपबशी आणली. त्याने "कशाला कशाला ?" म्हणत चहा संपवला. तो उठला व "नमस्कार, येतो मी !" म्हणून निघाला. मीही त्याच्या पाठीवरून हात फिरवून "असाच प्रामाणिक रहा हं, बाळ" म्हणत शाबासकी दिली. त्याची चौकशी करायची राहूनच गेली.

                      तो गेल्यावर मग मजेत आमच्या गप्पा-चर्चा सुरू झाल्या. थट्टा-मस्करी सुरू झाली. आपापले मनोरथ, विचार कसे खुंटले होते, पाकीट नसण्यामुळे - याची सर्वांनी चर्चा केली. पाकिटामुळे सर्वांच्याच जिवात जीव आला होता. एखादे पारितोषिक लढाईत जिंकून आणल्याप्रमाणे, सर्वजण वारंवार पाकिटाकडे पाहत होतो. एखादा तास सहज झाला !

                    "अय्या ! मला कीर्तनाला जायचं आहे की साडेआठला ! विसरलेच होते मी !" सौ. मधेच उघून उभी राहिली आणि टेबलाजवळ गेली.

                  "घड्याळ हातातच राहू दिलंय वाटत आज-" अस म्हणून तिने माझ्या हाताकडे पाहिलं.

                    "म्हणजे ?" मी ओरडतच कॉटवरून उठलो. टेबल व टेबलाचे खण पालथे घातले. पण छे ! घड्याळ नव्हते.जेवण्याआधी मी वेळ पाहूनच टेबलावर रिस्टवॉच ठेवल्याचे मला पक्के स्मरत होते. हातात तर घड्याळ नव्हतेच !

                अचानक माझ्या डोळ्यांसमोर मघाच्या "त्या' मुलाची चुळबुळ व त्याचा भेदरलेला चेहरा उभा राहिला.

               मी त्याच्या खिशात हात घालताच- तो दचकल्याचे मला आता जाणवले. पण आता काय उपयोग ?

               प्रामाणिकपणाने पाकीट मिळवले गेले, पण रिस्टवॉचची धोंड बसली होती ! वर पुन्हा साखरेच्या चहाचा कप.

              "छे ! या जगात प्रामाणिकपणा राहिला नाही, हेच खर !" असा विचार मनात आला.

.
(पूर्वप्रसिद्धी: २१/०७/१९६८. रविवार सकाळ)
.                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा