" अहो, ऐकलंत का ?" - स्वैपाकघरातून अरुणाचा आवाज आला.
अनिल नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. बुटाचे बंड सोडत असतानाच कानावर पहिला प्रश्न येऊन आदळला.
"हो ! ऐकल !"- संथपणे तो उद्गारला.
पुन्हा अरुणाने विचारले- "काय ऐकलं ?"
टायची गाठ सोडताना अनिल त्रासिक मुद्रेनेच म्हणाला- "दुसर काय ऐकणार ? तू आता मला "अहो, ऐकलंत का" म्हटलेलं ऐकलं !"
"इश्श्य ! नेहमीच कशी थट्टा सुचते हो अशी तुम्हाला ? मी इतकं आपलेपणान विचारते आणि तुम्ही मात्र कपाळाला आठ्या घालताय !" - पदराला हात पुसत, बाहेर येत अरुणा फिस्कारली.
" आज किनई मी बटाटेवडे केलेयत तुमच्यासाठी !" - ती म्हणाली.
त्यावर तो उद्गारला- म्हणजे आज आमचा 'बकरा' करायचाय वाटत तुम्हाला !"
त्याचा विनोद न समजून ती पुढे म्हणाली - "मी किनई आज जुन्या पेठेतल्या तुकाराम क्लॉथ स्टोअर्समधे जाणार आहे. तिथे कापडाचा जंगी सेल चालू आहे म्हणे! माझ्यासाठी संक्रांतीला एक छानशी काळी साडी आणि तुमच्यासाठी प्यांट व बुश्कोटला पिसेस आणणार आहे. खर तर सांगणारच नव्हते मी तुम्हाला, पण आठ्यांच्या संख्येत आणखी एकीची भर नको, म्हणून सांगून टाकल !"
अरुणाची बडबड निमूटपणे ऐकत अनिल आपले काम आटपत होता. टॉवेलने तोंड पुसून, केसातून कंगवा फिरवत तो म्हणाला-
"अग पण कपाटात डझनभर नव्या साड्या असताना, व मला न फाटणारे पण फक्त उसवणारे अर्धा डझन कपडे असताना अजून खरेदीची आवश्यकताच काय ?"
अरुणा अगदी निश्चयाच्या सुरात म्हणाली- "हे बघा, आता ह्या खेपेस मी तुमचं काही एक ऐकणार नाहीय्ये ! मी जाणार म्हणजे जाणारच ! माझ्या भाऊबीजेच्या पैशातून मी माझ्या आवडीची खरेदी करणार ! पंचवीस टक्क्यांनी स्वस्त सेलमधले कापड मिळवण्याची सोन्यासारखी संधी मी वाया काही जाऊ देणार नाही म्हटल !" एवढ बोलून पुन्हा ती स्वैपाकघरात वळली .
अनिल छोट्या आनंदला खेळवण्यात मग्न झाला. नाही म्हटल तरी अनिलचे लक्ष आतच लागले होते. बटाटेवड्याचा खमंग वास त्याला बेचैन करू लागला होता. तेवढ्यात अरुणा चटणी व बटाटेवड्याच्या थाळ्या घेऊन बाहेर आलीच. एखाद्या नवीन झालेल्या नाटकाच्या प्रयोगावर एखाद्या जाणकार टीकाकाराने तुटून पडावे, तसे अनिल त्या थाळीवर तुटून पडला. अर्धा वडा तोंडात कोंबून तो अरुणाला म्हणाला- "हे बघ अरु, पन्नास रुपये हवे तर मी माझ्याजवळचे तुला देतो, पण त्या सेल-बिलच्या भानगडीत तू पडू नकोस. अग, जुना, विटका, न खपलेला माल 'सेल'च्या नावाखाली खपवतात हे दुकानदार लोक !"
कधी एकदाचे खाणे संपते व मी दुकानात जाते, अशा गडबडीतल्या अरुणाला हे पटेल तर ना ! ती म्हणाली- "शेजारच्या लताताईनी त्यांच्या दुकानातून पंचाहत्तर रपयांना आणलेली साडी आहे ना, मी तश्शीच साडी तुम्हाला आज पंचावन्न रुपयात आणून दाखवली म्हणजे झाले ना ?"
त्यावर अनिल एवढेच म्हणाला-" तुम्हा बायकांना तरी काही समजून घेण्याची बुद्धी सुचणे अशक्यच म्हणा !"
सर्व तयारी झाल्यावर अरुणा जाण्यास निघाली. जाताना तिने अनिलला बजावले- "आनंदला घरीच ठेवत्येय हो मी. त्याच्याकडे नीट लक्ष द्या. नाहीतर तिन्ही सांजेच घोरत पडाल. येतेच मी अर्ध्या पाउण तासात."
पायात चपला अडकवून अरुणा गेलीसुद्धा. ती गेलेल्या दिशेकडे पहात अनिल पुटपुटला- "अर्धा नि पाउण तास म्हणजे आता सव्वा तास तरी शांतता मिळेल !"
जुन्या पेठेतल्या 'त्या' दुकानासमोर ह्या भल्यामोठ्या रांगा लागलेल्या होत्या. पण तानाजी घोरपडीच्या सहायाने जसा सिंहगड (सिंहगडच ना नक्की ?) सरसर चढून गेला होता, त्याच कौशल्याने अरुणा आपल्या बडबड्या स्वभावाने ओळखीपाळखी काढत दुकानाच्या शेवटच्या पायरीवर पोचलीसुद्धा ! आपला मेकप आणि हातातली पर्स सांभाळताना तिची कोण त्रेधा उडत होती. पण गुलाबाचे फूल पाहिजे असल्यास, त्याचे काटे टोचून घेणे भागच असत, याचा तिला अनुभव होता.
अखेर तिचा नंबर लागला ! तिला पाहिजे तशी साडी व अनिलसाठी कापड तिने घेतले. पंचवीस टक्के कमिशन मिळाल्याने तिला पंचवीस वर्षांनी आयुष्य वाढल्याचा आनंद झाला होता. कधी एकदा घरी जाऊन अनिलला 'लताताई'च्या नाकावर टिच्चून आणलेली साडी दाखवते, असे तिला झाले होते. ती घराकडे लगबगीने निघाली.
"आई गsss!".... तिला अचानक ठेच लागल्याने ती अस्फुट किंचाळली. तेवढ्यात चप्पलचा अंगठा तुटल्याचे तिच्या ध्यानात आले. तिने मनात ठरवले- "पुढच्या वेळेस चपला देखील सेलमधेच घ्यायच्या !"
अनिल आनंदला खेळवण्यात अगदी गर्क झाला होता. अरुणाने येतायेताच लताताईना आपल्या घरी 'खरेदी' पाहण्याचे आमंत्रण दिले होते. "हुश्श ! दमले ग बाई !" म्हणत तिने कॉटवर अंग झोकून दिले. अनिलने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले होते. तो निवांतपणे व्हरांड्यात येरझाऱ्या घालत थांबला. आनंद खरेदीच्या पुडक्याशी झोम्बाझोम्बी करत बसला.
तेवढ्यात लताताई आल्या. "काय अरुणाबाई, आज बरीच खरेदी केलेली दिसत्येय !" असे विचारत त्या खुर्चीवर बसल्या. त्यावर एक कटाक्ष व्हरांड्याकडे टाकत अरुणा मुद्दामच मोठ्याने म्हणाली- "हो ना ! हे नकोच म्हणत होते, काहीही आणायला. पण ह्यावेळेस मीच त्यांचे ऐकले नाही. " तिने अनिलसाठी आणलेले प्यांटपीसचे पुडके सोडले.
"खरच ! छान आणले हो !" - लताताई म्हणाल्या. अंगावर मुठभर मांस चढलेली अरुणा साडी दाखवणार, तेवढ्यात अंगावर उंदीर पडावा, तशी ती किंचाळली !
....... कारण आनंदने साडीचे पुडके आधीच सोडले होते आणि उलगडलेल्या साडीच्या एका भागावर बसून साडीला असलेल्या भल्यामोठ्या 'भगदाडा'तून डोके काढून मिस्कीलपणे तो हसत होता !
.
(पूर्वप्रसिद्धी- "सोलापूर समाचार"-२०/०५/१९७९)
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा