कॅलेंडर

                              बँकेतली "वर्षाखेर" एकदाची संपली! पाहता पाहता वर्ष संपले की ! भिंतीकडे नजर गेली. संपलेल्या वर्षाची  कॅलेंडरे, फासावर लटकावलेल्या कैद्याप्रमाणे खिळ्यावर विषण्णपणे अपराधी मुद्रा आणून उगाचच हेलकावे खात होती ! संपला त्यांचा आता भाव ! मी उगीचच मनातून शहारलो. मी बँकेत रोखपाल असल्याने ओळखी बऱ्याच होत्या. 'सेवेसाठी' आमची बँक असल्याने नमस्कार चमत्कार बरेच होतात ! या ओळखीपोटीच ही कॅलेंडरांची 'कलेवरे' भिंतीवर लटकत होती !

        जुन्या वळणाचे घर असल्याने, भिंतीवर नजर ठरणार नाही, इतकी असंख्य कॅलेंडरे होती. खरच , मनुष्याला 'रोटी, कपडा और मकान' यानंतर आठवण होते की, मकानात एक तरी  कॅलेंडर हवेच ! साध्या झोपडीपासून ते राजेशाही टोलेजंग इमारतीपर्यंत पहा, एक तरी कॅलेंडर आत आपल्याला आढळेलच ! एकप्रकारचे जबरदस्त आकर्षण कॅलेंडरबद्दल 'मानवी स्वभावा'ला असते. "जिस घरमे कॅलेंडर नही, वो घर घरही नही" असा डायलॉग एखाद्या पिच्चरमधे फेकला, तर प्रचंड दाद प्रेक्षकांच्याकडून त्याला दिली जाईल, हे नि:संशय !

        शेवटी कॅलेंडर म्हणजे एक 'कोरा कागज'च की ! त्यावर दिनांक, वार, वर्ष वगैरे जी माहिती लिहिलेली असते, त्याला जास्त महत्व असते ! पण या 'ढोंगी' जगात ही सर्व प्रकारची माहिती दुय्यम ठरते ! कारण हे जाहिरातींचे युग आहे. बोलेल त्याची 'अरगट'युक्त बाजरी खपेल, परंतु न बोलणाऱ्याचे 'बन्सी गहू' खपणार नाहीत- असे हे युग आहे. पहावी तिकडे जाहिरातच दिसते. सकाळी उठल्यावर दाताला लावण्याकरता 'बोकड'छाप पांढरी टूथ पावडर ते रात्री झोपण्यासाठी 'ससा'छाप मच्छरप्रतिबंधक अगरबत्ती- या साऱ्या जीवनावश्यक वस्तूंची जाहिरात वाचणे/पाहणे आज अत्यावश्यक होऊन बसले आहे !

        जाहिरातीसाठी 'स्वस्त आणि मस्त' असे प्रभावी साधन म्हणजे
कॅलेंडर ! जाहिरातदारांचे जाहिरातीचे काम झाले, मालाचा खप झाला, भिंतीवर कॅलेंडर लावणाऱ्या घराची शोभा व शान वाढली ! एकंदरीत सर्वजणच खूष !

     
कॅलेंडरांची विविधता तरी किती, आकार किती, प्रकार किती...अबब ! त्यांचा शोध लावणाऱ्यांची खरोखरच धन्य होय ! टेबल-कॅलेंडरपासून ते चारचार फूट लांबरुंद अशी कॅलेंडरे, एक पानी ते चौदा-पंधरा पानी नुसती बगळ्यांसारखी पांढरी ते इंद्रधनुष्याचे रंग ल्यालेली, पंचांगमधे आढळणाऱ्या कॅलेंडरपासून ते कॅलेंडरवर छापलेले पंचांग .. एक का दोन .. शंभर तऱ्हा या कॅलेंडरांच्या ! पुराणातील 'देवा'पासून ते पिक्चरमधील 'देवी'पर्यंत साऱ्यांनाच यावर आग्रहाचे स्थान ! हा पुरुष, ती बाई- प्रेमाचा रंगीत त्रिकोण ते सरकारी लाल त्रिकोण- कश्शाकश्शाचा भेदभाव या कॅलेंडरवर केलेला नसतो ! ब्रह्मचाऱ्याच्या खोलीपासून ते 'अष्टपुत्रा सौभाग्यवती'च्या देवघरापर्यंत कॅलेंडरला प्रवेश असतो !

        'शितावरून भाताची परीक्षा' असते, तशीच
कॅलेंडरवरून घरादाराची परीक्षा करण्यातही काहीअंशी यश मिळते ! उदाहरणार्थ पहा- एका घरातील भिंतीवर या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत, एक इंचही जागा न सोडता, कॅलेंडरे अडकवली आहेत. पहिले एका देवाचे, दुसरे नटीचे, तिसरे एका कुत्र्याचे, चौथे चौपाटीवरील कुण्या एकाच्या 'जिवाच्या मुंबई'चे- असली कॅलेंडरे कुणाच्या घरात असणार हो ? ती लावलेली असणार- एका मध्यमवर्गीय 'कारकुना'च्याच घरात ना ! त्या लावण्यात एकच दृष्टी असते, 'फुकट' मिळाले की लाव ! त्या लावण्यात सौंदर्यदृष्टी, निसर्गप्रेमदृष्टी, दैवताबद्दलची श्रद्धा- वगैरे वगैरे काहीही पहायची नसते ! या उलट एखाद्या गुटगुटीत बालकाचे कॅलेंडर एका कोपऱ्यात, दुसऱ्या कोपऱ्यात एखाद्या देवाचे, समोर एखादे सुरेख निसर्गदृष्य दाखवणारे कॅलेंडर- हे आपल्याला क्लासवन अधिकारी किंवा डॉक्टर-इंजिनियर यांच्या बंगल्याशिवाय कुठे दिसणार ? सदैव फडफडणारे, भरपूर बारा पानांचे, तिथी-वार-नक्षत्र असलेले, ठळक टायपातले कॅलेंडर व्यापाऱ्याशिवाय कुणाच्या घरात आढळणार ! तारखा, वार व महिने काढले जाऊन उरलेली नुसतीच चित्रे , जिच्याकडे पुन्हा पुन्हा पहावे अशी अर्धवट उघडी बाई असलेले, काहीवेळा निरनिराळ्या पोझमधील तरुणी असणारी, घड्याळाचे पट्टे व रेडिओ यांची एकमेकाशेजारी जाहिरात असलेल्या अर्धवस्त्र तरुणीची व उरलेली सर्व 'चालू' नटीची कॅलेंडरे- असलेले घर कुणाचे असणार ?.....एवढेसुद्धा ओळखू येत नाही ? अहो, ते असणार आमच्याच एखाद्या 'ब्रह्मचारी' दोस्ताने 'टर्म बेसिस'वर घेतलेले घर !

           जाहिरातदारांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या कल्पकतेचा भरभक्कम पाया म्हणा अथवा
कॅलेंडर घेणाऱ्यांच्या मूर्खपणाचा कळस म्हणा, आपण तर दोन्हीवर खूष आहोत ब्वा ! व्यापारी माल खपवण्यासाठी, 'अमुक इतका माल घेतल्यास एक कॅलेंडर मोफत' अशी जाहिरात करतो. त्याच्या ह्या कल्पकतेचे लगेच गिऱ्हाईकांच्या मूर्खपणामुळे स्वागत केले जाते ! काय तडाखेबंद खप होतो, त्या कॅलेंडरांचा व पर्यायाने मालाचा ! व्यापारीरुपी कोळी कॅलेंडररुपी आकड्याचा गळ टाकून, गिऱ्हाईकरुपी माशांना हातोहात पकडतो ना ? लोक तरी किती मूर्ख हो ! 'आम्ही अमृतकुंभ देतो- अगदी घरबसल्या फुकट !' -असे व्यापाऱ्यांनी म्हटले तरी हे मूर्ख लोक त्या देणगीचा अव्हेर करतील ! परंतु विषाच्या दोन इंची बाटलीबरोबर एक कॅलेंडर 'फुकट' मिळणार असेल, तर त्यासाठी दहा कि.मी. कोण यातायात करतील हेच लोक !

        अर्थात प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही
कॅलेंडरची एकप्रकारची 'नशा'च चढलेली असते ! घरात जन्मणारे पहिले 'सजीव' कॅलेंडर अन भिंतीवर येणारे पहिले 'निर्जीव' कॅलेंडर- या दोन्हींचे मनुष्याला फारच अप्रूप वाटते ! वर्षाच्या सुरुवातीला मनुष्याला कॅलेंडरे गोळा करण्याचा छंदच जडतो ! सुनेचे बाळंतपणाचे पुरेपूर नऊ महिने भरल्याचे जे समाधान सासूला वाटते, तेच- किंबहुना त्याहून अधिकच समाधान मनुष्याला आपल्या घरातील भिंती भरपूर कॅलेंडरानी भरल्यावर वाटते !

        असे हे '
कॅलेंडर-माहात्म्य' रंगवावे तेवढे रंगणार आहे. परंतु संन्याशाच्या संसाराला 'शेंडी'पासून तयारी करावी लागते तशी आता मला, भिंतीना कॅलेंडरांचा प्रपंच संभाळावयास लावण्यासाठी, 'खिळ्या'पासून तयारी करावी लागणार आहे. निदान नव्याचे नऊ दिवस तरी ! नंतर काही काळाने जाळी-जळमटे लागलेली, अर्धवट फाटकी, वेडीवाकडी टांगलेली  कॅलेंडरे पहावी लागणारच आहेत म्हणा !
.                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा