गणपती


१)  
   
बायको आपल्या कमरेवर एक हात ठेवून,
एका हातात लाटणे तसेच धरून तावातावाने,
तव्यावरची पोळी तशीच ठेवून, बाहेर दिवाणखान्यात येउन ओरडली,
" मला काही म्हणालात काय ? "

मी शांतपणे दोन्ही कानावर हात ठेवून,
आपली मुंडी नकारार्थी हलवत म्हणालो,
" ह्या बाहेरच्या गोंगाटापेक्षा मोठया आवाजात,
"मी तुला" काही बोलणे शक्य आहे काय ? "
.

२)   

बरीच सेलेब्रिटीज मंडळी बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला भेट देऊन आली.
बरे वाटले !

बऱ्याच वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचे कौतुक केले .
आणखी बरे वाटले !!

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,
किंवा झोपडीत किंवा पत्र्याच्या शेडमधील गणपतीचे फोटो झळकले असते तर.....

सोन्याहून पिवळे, असे खुद्द श्री गणेशालाही नक्कीच वाटले असते !!!
.


३)

श्री गणेशाचे भरल्या अंत:करणाने विसर्जन करून आलो.
गणेशाचे दहा दिवसांचे रूप, डोळ्यासमोर तरळताना डुलकी लागलीच.

- आणि दहा दिवसातल्या रोजच्या प्रमाणे श्री गणेश कानाशी पुटपुटून गेले...

" तुमच्या घरातून निरोप घेताना, मला खरेच वाईट वाटले रे .
किती शांतपणे, मन:पूर्वक, भक्तीसंगीतात मी गुंगलो.
धूप दीप नैवेद्य आरत्या सगळ्यात मी दंगलो.
पण ...

तुमच्या घराबाहेर आपण आलो आणि ... उगीचच बाहेर आलो, असे वाटले बघ !

पुढच्यावेळी मी येईन ...

जर ती धांगडधिंगा असलेली गाणी- हिडीस अंगविक्षेप- कर्णकटू वाद्ये नसतील तरच !!
बघ ! तुझे ऐकणार असतील सर्वजण--- तर मी येईन नक्की,
नाहीतर... माझाच सर्वांना कोपरापासून नमस्कार सांग सर्वांना ! "
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा