वेळ ...

वेळ ...

कुठल्याही गोष्टीची " वेळ " फार फार महत्वाची असते.
म्हणजे एखादी घटना, गोष्ट
योग्य त्याच वेळेवर झालेली, घडलेली, जपलेली,
जाणलेली शोभून दिसते- आवश्यक असते,
 हे लक्षात येणे फार उत्तम !

लग्नाचा मुहूर्त योग्य वेळी साधला पाहिजे ..
उद्याचे काम आज करा,
 हा उपदेश उद्याच्या मुहूर्तासाठी आज पाळून चालेल ?

ऑपरेशनची वेळ डॉक्टरानी सांगितलेली योग्य ..
तिथे आपण "आज -आत्ता- ताबडतोब " चा हेका धरणे योग्य आहे ?

मला कामाची खूप खूप आवड आहे..
म्हणून कार्यालयात चोवीस तास घालवणे, 
मूर्खपणाचे नाही का ठरणार ?

बायकोला साड्यांची आवड आहे ..
एकाच वेळी चार साड्या खरेदी करणे आणि एकदम दोन नेसायला लावणे,
हा वेडेपणा नाही काय ?

काळ-वेळ न पाहता झिंगणारा बेवडा ,
अंथरूण पाहून पाय न पसरता- वेळी अवेळी मटका लावणारा,
खिशात दमडा नसतांना जुगार खेळणारा,
चार चौघात वेळ काळ न पाहता बिडीचे झुरके ओढणारा,
ह्या असल्या व्यसनी लोकांना वेळेचे महत्व पटवून द्यावे काय .. देत बसल्यास कुणाच्या वेळेचा अपव्यय होणार आहे हो ?

शहाण्याला शब्दाचा मार वेळेला दिलेला बरा ..
उधळलेल्या जनावराला योग्य वेळीच चाबकाचे फटकारे लगावलेले ठीक ..
मूर्खाचा नाद वेळीच सोडलेला चांगला ..

आपला शहाणपणा आणि दुसऱ्याचा मूर्खपणा वेळीच जपलेला ...?

एखाद्या मित्राचा वाढदिवस ठराविक दिवशी आहे,
हे माहित असतांना,
 "आगाऊ"पणाने शुभेच्छा देण्यात काय हशील ?
अगदी विसरूनच, लक्षात नाही राहिला तर,
 कालांतराने क्षमायाचना करून शुभेच्छा देण्याची वेळ साधणे - 
ही देखील मैत्री जपण्याची कलाच !

अरेच्चा .. नेहमीप्रमाणेच काळवेळ न बघता बरळत सुटलोच की --
 इतरांना वेळेचे महत्व समजावून सांगता सांगता, 
मला स्वत:ला ते कधी कुठल्या मुहूर्तावर समजणार कुणास ठाऊक ?
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा