" नको असलेले पाहुणे, शेवटी त्यांच्या गावी रवाना झाले आणि आमच्या जिवात जीव आला ! "
- ही काय भानगड आहे, ते समजण्यास 'अनुभव' घ्यायलाच हवा ! 'पाहुणे ' ही गोष्ट वास्तविक सर्वाना हवी वाटणारी आहे. कारण ते थोडेच दिवस रहातात, बहुधा बरोबर साखर- तांदूळ आणतात आणि जाताना मुलांच्या हातावर खाऊही ठेवतात !
पण अनेक दिवस मुक्काम थकणारा, 'माझे नाही तर माझ्या काकाचे घर' मानणारा, मोकळ्या हाताने व रिकाम्या खिशानेच दुसऱ्यांच्या घरात वावरणारा असा- ' पाहुणा' नामक प्राणी दिसला की, आमचे धाबे दणाणते बुवा ! असल्या पाहुण्यांचा अनुभव फारच भयानक असतो . ' कधी एकदाचा तो कटतोय' अशी वाट पहातच, त्याची उत्तम बडदास्त राखण्याचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडणारा, हाच खरा 'नटसम्राट' कसा, ते अनुभावानेच तुम्हाला समजेल !
तर सांगायचा मुद्दा हा की, आजकाल अनुभवाचा जमाना आहे. टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय आणि बऱ्यावाईट अनुभवांची शिदोरी जवळ बाळगल्याशिवाय मानवाला आपल्या आयुष्याचा रथ हाकताच येणार नाही ! अनुभवी असणे, हाच आजच्या युगाचा आदर्श आहे. परदेशी जाऊन स्वदेशी परत आलेल्या मानवास पहिला प्रश्न पत्रकार विचारतात, तो हाच की, " आपल्याला ह्या दौऱ्यात काय काय अनुभव आले ? " ज्याचे अनुभव अधिक, त्याला भाव अधिक मिळतो. तुम्हाला म्हणणं पटतंय कां पहा ! जरा सविस्तरच सांगतो हं -
एका वर्तमानपत्रातली ही जाहिरात पहा- " उमेदवार पाहिजे ! शिक्षणाची अट वगैरे पुढीलप्रमाणे - उमेदवार कमीतकमी पी एच डी असावा, किंवा काहीच न शिकलेला असल्यास किमान ३० वर्षाचा त्याला कामाचा अनुभव असावा ! " आहे की नाही कम्माल ? 'एक सुप्रशिक्षित उमेदवार आणि एक अशिक्षित पण अनुभवी उमेदवार' यात अडाण्याचाच गाडा पुढे रेटला जातोय की नाही ? कशामुळे हो ?
आजीबाईजवळ अनुभवांच्या गोष्टींचा बटवा असल्यामुळे, लहान मुले तिच्याचभोवती गोळा होतात ना ! अनेक भलेबुरे अनुभव घेऊनच पुष्कळ संशोधक चांगल्या नावारूपास येतात. शिक्षणाला अनुभवाची जोड असणे, म्हणजे सुगंधी सोने सापडण्याचा अनुभव घेण्यासारखेच !
अनेक मुलाखती देऊन पदवीधर उमेदवार अनुभवाने पुढे येऊ शकतो. खूप वधुपरीक्षेतून तावून सुलाखून म्हणजेच अनुभव घेऊन एखादी तरुणी उत्तम गृहिणी बनू शकते ! मुलींसाठी आपली पादत्राणे झिजवणारा वधुपिता आपल्या अनुभवामुळेच दुसऱ्यांना "लाल त्रिकोण" दाखवण्यास क्वालिफ़ाईड ठरतो .
आयुष्याचे सार अनुभवांमधे एकवटलेले आढळते. अनुभवांच्या ठेचा बसून मनुष्याला शहाणपणा येतो. "एकवार अनुभव हीच यशाची खात्री" देणारे, शेवटी यशाला कात्रीही लावतात, ही गोष्ट अनुभवानेच कळते ! दारावरचे अनेक फिरते विक्रेते असे यशाला कात्री लावणारे दिसतात. विद्यार्थ्याना पुच्छगतीने प्रगतीपथावर नेणारे काही "अनुभवी" मार्गदर्शक आपल्याला गाईडसवर विराजमान झालेले दिसतात. अर्थात स्वत:ला आलेल्या काही खास अनुभवाने विद्यार्थीही "अनुभवी" होऊन वरील अनुभवांपासून चार हात दूर रहातात. ही पण एक झलक- अनुभवाचीच !
लग्नसमारम्भाप्रसंगी याद्या-बैठका-कोठी यासाठी अनुभवी माणसे अनुभव असणाऱ्यानाच का नियुक्त करतात, ते अनुभव आल्याशिवाय नाहीच उमजणार ! अनुभवी तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवाशांना कसे अगदी अचूक "सावज" म्हणून हेरतात, हे पाहण्यासाठी एकदा अनुभवच घ्यायला हवा ! अनुभवांच्या अनेक पेडानी जीवनाचा दोरखंड मजबूत होत जातो ! वाईट अनुभवांती माणूस चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतो, तर चांगल्या गोष्टी अनुभवणारा माणूस वाममार्गाचा अनुभवही घेऊ इच्छितो. अनुभव हे असे दुहेरी हत्यार आहे !
भरबाजारात सर्वांच्या समोर घसरून पडण्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का कधी ? मद्द्याची चव अनुभवानेच कळते, असे म्हणतात. पण एखाद्या मद्द्यप्याला नको तिथे, नको तसे लोळताना पाहिल्यावर कुणाला बरे तसल्या अनुभवाचे अप्रूप वाटेल ? दुसऱ्याला आलेल्या अनुभवापासून आपल्याला कोणता अनुभव येईल, हे अनुभवानेच ज्ञात झाले पाहिजे !
अनुभवाबरोबर भाव जास्त खाता येतो, याचा मलाही अनुभव आलेला आहे. माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी "बॉस"ने एक आकडेतक्ता मला टंकलिखित करायला सांगितला होता. त्यात काहीतरी गफलत असल्याची शंका आल्याने मी बॉसला तसे म्हटले. तर थंडीने कुडकुडणार्या दातांप्रमाणे तो उसळला - " हे पहा मिष्टर टायपिष्ट ! तुमच्यापेक्षा चार पावसाळे (- का पैसे ! ) मी जास्तच खाल्लेत, तेव्हां माझ्या चुका काढत बसू नका ! " बॉसने चार पावसाळ्याचा अनुभव पाठीशी जास्त घेतल्याने आणि मी नोकरीत पूर्ण अननुभवी असल्याने, मी निमूटपणे परत फिरलो. बॉसचा हा पहिलाच अनुभव माझ्या भावी कारकीर्दीला फार अनुभवी ठरला !
गिऱ्हाईकापासून येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांती दुकानदार शहाणा होऊ शकतो. माणसाच्या प्रत्येक पावलागणिक अनुभव त्याला पुढे पुढे ढकलत असतो. "अनुभवी हो" असे नुसते म्हटल्याने, अनुभवी होता येत नाही, तो प्रत्यक्ष घ्यावाच लागतो ! कंडक्टर -प्रवासी, वकील-अशील, डॉक्टर-पेशंट , विक्रेता-ग्राहक ह्या सगळ्या जोड्या एकमेकांच्या सहवासातच एकापेक्षा एक अनुभवाने वरचढ होतात !
माझ्यामते सर्वात अनुभवी कोण असेल तर तो म्हणजे साडी विक्रेता ! आशा निराशेच्या हिंदोळ्यावर, त्याला चोखंदळ स्त्री-ग्राहकांचे अनुभव घेत झुलावे लागते. त्यांच्या चंचल स्वभावाचे प्रत्यंतर, तो हरघडीला अनुभवत असतो. शंभर साड्यातून महिलावर्गाची रंगाबाबत चिकित्सा, त्यांचे काठपदरांविषयी पसंती-नापसंतीचे चीत्कार, त्या डीझाईन्सबद्दल हजारो हुंकार आणि सरतेशेवटी शंभरातील एकाही साडीची पसंती नसण्याचा उद्गार ऐकणे- म्हणजे त्या विक्रेत्याच्या सहनशीलतेचा अंतच की हो ! पण अनुभवाने तोही सोशिक बनतो ना ! " ही नको ती - ती नको तिच्या पलीकडची -" ह्या असल्या कोलाहलात, त्याला अनुभवाने रममाण व्हावेच लागते. शिवाय साड्यांचा तो भलामोठा उत्तुंग डोंगर रचून, त्यातून तळाशी असलेलीच साडी नेमकी एखाद्या विशालकाय पुरंध्रीने निवडताच ...., पुन्हा दर भाव ह्यांची घासाघीस- त्या विक्रेत्याला स्वस्थ चित्ताने ऐकून घ्यावी लागते ! स्त्रियांच्या स्वभावाला मनोभावे शरण जाऊन, अनुभवाने स्थितप्रज्ञ राहू शकणाऱ्या अशा त्या अनुभवी विक्रेत्याची धन्य होय !
थेटरापाशी चालू असलेल्या काळ्याबाजारातले तिकीट निर्भीडपणे घेण्यास, अनुभव लागतो. रेशनच्या रांगेत आपला नंबर येताच- साखर व धान्य संपण्याचा दु:खद निराशेचा क्षण अनुभवण्यातले थ्रिल काही वेगळेच ! नेहमी नापास होणाऱ्याला, एखादेवेळी पास होण्याचा आनंद अनुभवल्याखेरीज पुढे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली गवसणार नाही.
रुळलेल्या चाकोरीतून वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न म्हणजे " अनुभव ! " धाडसाने अनुभव येतात आणि अनुभव आले की माणूस धाडसी बनू शकतो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा