मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी


(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी 
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... | धृ |

नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा 
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती

भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....

तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..

का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा