माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे
प्रसंग कधी येतच नाही......
धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही
शहरात राहिला मामा आता
त्याला नोकरी मिळत नाही ...
वेळ नसल्यामुळे तो
मला कधी बोलवत नाही
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही...
वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे -
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...
मामाची रंगीत गाडी नाही
मामाची उंचउंच माडी नाही
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....
माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहातच नाही !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा