संसार ...तुझा नि माझा !



दोन दिवसांचा धुणी-भांड्यांचा हा ढीग साठलेला. वीज बंद पडलेली. 
येते म्हणून...ऐनवेळी, सकाळी धुणी-भांडीवाल्या मोलकरणीने दांडी मारली. 
मग नोकरीवाल्या बायकोचीही नाइलाजाने एक दिवस दांडीच !
बायकोचा राग त्या बिचाऱ्या धुण्यावर ! 
सात्विक संतापाने ती जोरजोरात एक पिळा आपटत म्हणाली,
" इकडची काडी तिकड उचलून द्यायला नको. 
इथलही काम करा- तिथलही करा, घरी तेच दारी, मदतीच्या नावाने बोंबच ! "

तिच्या रागाकडे दुर्लक्ष करून, शक्य तितके गोड हसत, मी म्हणालो,
" हे बघ, आता चिडचिड करून उपयोग आहे का ? 
मी काय म्हणतो, ते ऐक जरा शांतपणे- "

धुणे थांबवत, तिने होकारार्थी मान डोलावून पुढे बोलायला परवानगी दिली.

मी म्हणालो, 
" हे बघ ! तू ही धुणी-भांडी पटापट आटपेपर्यंत, मी पेपरवाचन संपवतो.
नंतर मी तुला ग्यास पेटवून देतो, तू तेवढं स्वैपाकाचं बघ.
स्वैपाक झाला की मला सांग, मी तांब्या-पेला-पाण्याचे बघतो.
तू पानं वाढून घे. दोघं निवांत जेवण करू. कसं ? "

बायकोने नकळतच आपली मुंडी हलवली . 
एक हात स्वैपाकघराकडे दाखवत, मी म्हणालो, 
" तुझी उष्टीखरकटी काढून होईपर्यंत, 
मी फेसबुकातलं माझं काम आटपून घेतो.
सगळी आवराआवरी झाल्याबरोब्बर मला बोलाव.
चट्कन येऊन मी खट्कन ग्यास पेटवतो, 
तू झट्कन चहा केलास की दोघं मिळून पट्कन तो पिऊन टाकू- 
तेवढाच आपल्या दोघांच्याही जिवाला विरंगुळा. होय की नाही ? " 

उत्तरादाखल बायकोचे चेहऱ्यावरचे बदलते भाव मी पहात होतोच.
 बोलणे रेटत मी म्हणालो, 
"अग, आपला संसार आपण दोघांनी मिळून नीट करायचा नाही- तर कुणी ?
हं , आत्ता मला काही सांगत बसू नकोस बरं का. 
आटप लौकर. तुझं झालं की सांग मला-
हा पेपर वाचून काढतो आणि ग्यास पेटवतो की नाही, बघच तू ! "

माझी 'तडजोडीची अजब भाषा' ऐकत, सगळा राग विसरून-
हातात धुण्याचा पिळा तसाच धरून बायको घरभर हसत सुटली झालं !
.

२ टिप्पण्या: