" शुभ हस्ते - "गेल्या महिन्यात, मी माझ्या एका मित्राबरोबर पैज लावली. पैज तशी साधीच होती. 

संपूर्ण महिन्यातले कुठलेही एका दिवसाचे वर्तमानपत्र घ्यायचे आणि,
 त्यात " xxxxxx यांचे शुभ हस्ते xxxxxx चा समारंभ उत्साहाने पार पडला "--- असे वाक्य छापून  आलेले नाही, असे मित्राने मला दाखवून द्यायचे !

अर्थात परवाची पैज मीच जिंकली-  आणि मित्राच्याच "शुभ हस्ते " मी पैजेची रक्कम स्वीकारली, हे वेगळे सांगणे नलगे !

माझी ती  रोजचीच सवय आहे म्हणा ना ! सकाळी चहाच्या कपाबरोबर,  हातात वर्तमानपत्र " डोळी  लावायला " (- 'तोंडी लावायला'च्या धर्तीवर) हवेच असते. अधाशीपणाने मी प्रथम कुठे काय कार्यक्रम-समारंभ-उद्घाटन झाले आहे, ते पहातो आणि नंतर ज्या व्यक्तीच्या 'शुभ हस्ते' तो कार्यक्रम आहे, त्या व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा पाठ करत  राहतो.
 येथे एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो की,  मी 'विष्णूसहस्रनामाचा' जप बहुतेक विसरतच  असतो ! कारण सध्या  परिस्थिती अशी आहे की, स्वर्गातल्या व्यक्तीपेक्षा भूतलावरील व्यक्तीनाच आवाहन केलेले स्वहितकारक ठरते !  परमेश्वरापेक्षा पुढारी लवकर पावतो,  हा सामान्य जनतेचा विश्वास आहे. म्हणून ' पती हाच परमेश्वर'च्या चालीवर 'पुढारी हाच परमेश्वर'चा कानमंत्र  आम्ही नेहमी जपतो.

प्रत्येक मातेला आपले रडके पोर प्यारे असते, तद्वतच प्रत्येकाला आपला हात 'शुभ हस्त' वाटत असणारच. असे  असतानाही, सर्वानी मिळून "अमूक यांचे शुभ हस्ते" म्हणणे, हे आपले हात 'अशुभ' असल्याचे सिद्ध करणे नव्हे काय ?

एखाद्या खिसेकापूचे हात इतरेजनाना 'अशुभ' वाटत असले, तरी  ते त्याला स्वत:ला 'लक्ष्मी प्राप्त करून देणारे'च वाटत असतात, म्हणजे पर्यायाने 'शुभ' वाटत असतात ! एकीकडे खिसेकापूच्या हस्तलाघवाचे  कौतुक करायचे आणि दुसरीकडे वर्तमानपत्रात बातमी छापताना  मात्र त्याच्या 'शुभ हस्ते' हे शब्द गाळायचे , हा काय न्याय झाला ?

हल्ली कितीतरी सहकारी संस्थांचे 'गोंधळ-व्यवहार' चालू  असल्याचे उघडकीस येत आहे.  'विना  सहकार नाही अपहार' हे पदोपदी घडत आहे, तेव्हां या संस्थांचे  उद्घाटन ज्या सन्माननीय xxxxxx रावजी साहेबाचे 'शुभ हस्ते' झालेले असते, त्या हस्तांची  सांगड या गोंधळाशी कशी बरे घालावी ? एखाद्या प्रसंगी, 'शुभ हस्ते' फुटणारा नारळही नासका निघतो, त्यावेळी ते हात 'शुभ' असतात काय !

या सर्व गोष्टीवरून- एकच सिद्ध होते की सत्ताधारी, वजनदार, श्रीमंत व्यक्तींचेच हात नेहमी 'शुभ हस्त' असतात; इतरांचे फक्त  कार्यक्रमानंतर टाळ्या बडवण्यापुरते असतात !

एखाद्या केश कर्तनालयाचे उद्घाटन असो, एखाद्या साडीसेंटरचे ओपनिंग असो किंवा बांगड्यांच्या कारखान्याचा रौप्यमहोत्सव असो, तेथे 'शुभ हस्ता'चे आगमन ठरलेलेच असते.  हे 'शुभ हस्त' मोठे कल्पक असतात, बर का !  वारा वाहील त्या दिशेला पाठ फिरवण्यात तरबेज असतात ! समजा, एखाद्या ठिकाणी काही कारणाने नासधूस- दंगल- जाळपोळ झाली आहे,  अशा ठिकाणी (आम्ही नेहमीच्या सवयीनुसार-) वर्तमानपत्रात "xxxxxxचे शुभहस्ते सदर कार्यक्रम  व्यवस्थित पार पडला" अशी बातमी दिली की, ते शुभ हस्त गरम व्हायला तयारच ! याचा अर्थच असा की, तापलेल्या तव्यावर पोळी चांगली भाजली तर ती आमच्या 'शुभ हस्ते',  करपली तर मात्र, ती  इतरांच्या अशुभ हस्ते  ! 

सर्वांचे हात सारखेच असतात. आपले कर्तृत्व त्याना शुभ किंवा अशुभ बनवते, हे मानणारे समाजात फारच विरळ ! बहुतेक साऱ्यांची  वृत्ती अंधानुकरणाचीच   असते !
एखाद्या दुकानदाराने स्वत:च्याच हाताने  आपल्या दुकानाचे उद्घाटन करून पहावे ! एखाद्या पंगुत्व-निवारण  केंद्राने अपंग व्यक्तीच्या हाताच्या  साहाय्यानेच सुरूवात करावी. झुणका भाकर केंद्राचे  उद्घाटन एखाद्या भिकाऱ्याच्या   शुभ हस्ते करावे ! पण असे कदापि होणे नाहीच !  आमची गुलामगिरीची भावना आम्ही एवढ्या लौकर नष्ट होऊ देणार 
नाही ! आमची  चमचेगिरी, लांगूलचालन कदापि आम्ही नष्ट होऊ देणार नाही ! आमच्या साहेबांचे, आमच्या मालकांचे, आमच्या पुढाऱ्याचे  हात तेवढे 'शुभ हस्त' आहेत आणि आमचे स्वत:चे हस्त मात्र करंटे, अशुभ आहेत, हे आम्हा सर्वाना मान्यच आहे ! हे  'शुभ हस्ता'चे हांजी हांजी करणे, कधी थांबणार आहे-    कुणास ठाऊक !
  
जे हात खरोखरच शुभ असतात, ते काही न बोलता कार्य करत असतातच. पण जे हात शुभ असल्यासारखे 'वाटतात',  ते  काहीही बोलत नसतात आणि करतही  नसतात ! समाजही  ज्यांचे हात शुभ ठरवतो (- खरे तर ते वाटतही नसतात !) ते शुभ हात, प्रत्यक्ष कार्यक्षमतेच्या नावाने शून्य..
 पण  बोलबाला मात्र खूपच करतात !

ज्या व्यक्तीच्या शुभ हस्ते उद्घाटने अनेक, अगणित त्या व्यक्तीचा मोठेपणा अस्तित्वात जास्त जास्त मानला जात असतो.  अर्थात, आज शुभ असणारे उद्या असतील, याची शाश्वती नसतेच !

 एखाद्या जेलचे उद्घाटन जन्मठेपेच्या कैद्याच्या शुभ हस्ते करणे - जेवढे सयुक्तिक, तेवढेच शिमग्याच्या होळीभोवती, एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या शुभ हस्ते शंखध्वनीने  उद्घाटन करणे योग्य नव्हे काय ? पण  योजकस्तत्र दुर्लभं !  

आमच अस म्हणणे आहे की, एखादा समारंभ यशस्वी झाल्यावरच, त्याचा  उद्घाटन समारंभ साजरा करावा, म्हणजे 'शुभ हस्ते' या म्हणण्याला काहीतरी अर्थ राहील !  नाहीतर  प्रचंड धरणाचे उद्घाटन आधी करायचे -आणि त्याचे पाणी न मिळताच, लोकानी  'पाणी पाणी' करतच प्राण सोडायचे-  या असल्या 'शुभ हस्ते' झालेल्या उद्घाटनास लोकानी  अशुभच  ठरवल्यास, चुकते कोठे ?

हा लेख दिवाळी अंकात छापून  आला, तरच आम्ही म्हणणार की, संपादकाचे 'शुभ हस्ते' आमचे नाव छापून  आले म्हणून ! अन्यथा आमच्या 'शुभ हस्तां'ची आम्ही शिमग्यापर्यंत वाट पहाणारच ना !
.


२ टिप्पण्या: