थोबाड


जबडा, चेहरा, तोंड, मुख, मुखचन्द्र - वगैरे वगैरे जबरदस्त शब्दानी अभिप्रेत असणारा,
 सर्वात सोपा शब्द म्हणजे  " थोबाड ! "

धिंगाणा असो, मारामारी असो अथवा दंगामस्ती असो - फोडण्यासारखी , निदान  तसा दम देण्यासारखी, शिवी म्हणजे  " थोबाड फोडीन ! "  समस्त साहित्यप्रकारात हा वाक्प्रचार वापरला जातो. ' थोबाड ' या शब्दात काहीतरी आगळीवेगळी जादू आहे. हा  शब्द उच्चारताच- आपल्याला विद्रूप, वेडावाकाडा, भलामोठा, प्रशस्त जबड्याचाच 'चेहरा' आठवतो..


'थोबाड' हा शब्द नुसता उच्चारा की हाताच्या मुठी लगेच वळल्याच म्हणून  समजा ! ज्याला घरातला साधा लाडू फोडता येणार नाही, असा खत्रूड इसमदेखील गुद्दागुद्दीवर  येताच, 'थोबाड फोडण्या'ची भाषा बोलू लागतो. थोबाडाच्या  अंगी वीररस उत्पन्न करण्याची शक्यता असावी .


आपला तो सुरेख  'तोंडावळा' आणि दुसर्‍याचे ते "थोबाड''- अशीच  सुरेख समजूत, भूतलावरचा मनुष्यप्राणी करून घेत असतो. प्रियकर आणि प्रेयसी प्रेमभंगाआधी गुलुगुलू   गप्पागोष्टी करीत असतात. एकमेकांच्या  मुखकमलाशी चुम्बाचुंबी करत  असतात. पण प्रेमभंगानंतर तेच युगुल शाब्दिक झोंबाझोंबी करून एकमेकांचे 'थोबाड' जन्मात कधीच न पहाण्याची प्रतिज्ञा  करतात !

 
'थोबाडा'चा सर्वत्र संचार असतो. 

रामायण काळातहि  राम-रावणाच्या युद्धात वानर आणि राक्षसानी एकमेकांची थोबाडे फोडल्याचा दावा केला.  रामाने ( का  लक्ष्मणाने ? -) शूर्पणखेचे नाक तोडून, तिचे थोबाड विद्रूप केल्याचे सांगतात.  वास्तविक, त्याला हात -पाय-गळा तोडता येत होते, तरी पण त्याने कटाक्षाने  'थोबाड' विद्रूप करण्याचाच का बरे प्रयत्न केला असावा ? 
कारण 'थोबाडा'चे महत्व !

रामायण काळातलाच दाखला कशाला हवा !  हल्लीच्या स्टंटपटात देखील खलनायक नायकाला (जादूगाराप्रमाणे-) ' इकडचे थोबाड तिकडे' करण्याचीच भाषा बोलत असतो ! तुम्ही जरा बारकाईने विचार कराल तर असे आढळून येईल की, 'थोबाड' हा खरोखरच एक भारदस्त शब्द आहे !  भांडणात एखाद्याला तुम्ही नुसतेच म्हणा - 

" काय समजलास साल्या, थोबाड सडकीन ! "  तुमचा प्रतिस्पर्धी, नामोहरम झालाच समजा.

मराठी भाषेत ह्या शब्दाचे अनन्यसाधारण महत्व आहे. 'थोबाड हिंग खाल्ल्यासारखे करणे' हा वाक्प्रचार  'दुर्मुखले  दिसणे 'ला किती समानार्थी आहे ?  खरपूस मार देणे- या वाक्याचे ' थोबाड रंगविणे ' हे किती सुटसुटीत रूप आहे ना ! येता-जाता दुसऱ्याला हिणवण्यास्तव किंवा दुसर्‍याचा वरचष्मा सहन होत नसल्यास, अथवा एखाद्याला गुर्मीत  बोलायचे झाल्यास- तुम्ही फक्त 'आरशात पहा जरा थोबाड ' असे म्हणा.  दुसर्‍याचे तोंड खाली झालेच समजा !


आपण सांगितलेल्या एखाद्या घटनेवर कुणाचा विश्वास नसला किंवा आपल्याच सत्यतेचा तिसर्‍याला दाखला द्यायचा असला की आपण म्हणतो-  " वाटल्यास त्याच्या थोबाडावरच रुजूवात करून देतो ".  हा सूर्य, आणि हा जयद्रथ म्हणण्यापेक्षा, हे असे म्हणणे किती सोप्प आहे ना !


तुम्ही कधी डिटेक्टिव्ह कथा वाचता का ?  वाचत नसल्यास, वाचून पहा-  त्यातले हिरो प्रतिस्पर्ध्याला इतके बदड बदडतात की  त्याचा चेहरा नेमका 'थोबाड वेडेवाकडे' होण्याकडेच वळतो !  यावरून- फोडता येण्यासारखा, रंगवता येण्यासारखा,  वेडावाकडाही करता येण्यासारखा-  असा जो अवयव आपला आहे, त्यालाच थोबाड म्हणतात आणि तो अवयव कितीही कठीण असला तरी लवचिकच असल्याचे सिद्ध  होते !


बाप कितीही प्रेमळ असला तरी तो चिरंजिवाचे लाड किती काळ सहन करील हो ?  चिरंजीव आवरेनासे झाले , भोकाड पसरून कंठशोष करू लागले की, बाप ऊर्फ पित्यामधला 'माणूस' जागा होतो आणि तो ह्मखास गराजतो - ' कार्ट्या, गप्प बसतोस का  फोडू थोबाड आता ! "


दिवाळी दोन दिवसावर आली, फराळाची जय्यत तयारी झाली की, घरात आनंदाचे भरते येते. अशावेळी आपल्याला, अगांतुक पाहुण्यांचे पत्र  (सहकुटुंब सहपरिवार-) येत असल्याबद्दल  आले की, सर्वांची 'थोबाडे' कशी 'पाहण्या'लायक दिसतात !  महिना अखेरचा दिवस आला की, एखादा सेवक हमखास लाचार बनतो आणि अजीजीने  आपल्यापुढे थोबाड वेन्गाडून उसन्या पैशांची मागणी करतो !  शिक्षक वर्ग न ऐकणार्‍या मुलाच्या तोंडात नक्कीच थोबाडीत देतात !  काही जणांना फारच लोचट शेजारी भेटतात. ते काळवेळ पहात नाहीत, लाज लज्जा  शरम बाळगत नाहीत-  वाट्टेल त्या वेळी, वाट्टेल त्या वस्तुसाठी, ते  'थोबाड पसरतात.'


ह्या "थोबाड पुराणा"मुळे मला मात्र फक्त  दोघांचेच कौतुक वाटते... 

पहिला आपला नापित  आणि दुसरा मेकप करणारा ! जगात ह्या दोनच वल्ली  अशा आहेत की, त्या 'मी मी' म्हणणाऱ्याचे 'थोबाड' (आरशात ) पहायला' लावतातच; आणि 'थोबाड' अक्षरश: रंगवतातच !

सुट्टी आहे म्हणून दिवाळी आहे. दिवाळी आहे म्हणून फराळ आहे. आणि फराळ आहे, म्हणून चांगल आहे. तद्वतच शरीर आहे म्हणून अवयव आहे, अवयव आहे त्यापैकी एक थोबाड आहे .. 
आणि ते आहे म्हणूनच, हे "थोबाड पुराण" वाचून आपल्याला आनंद मिळत आहे... नाही का  !
.  
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा